सर्च-रिसर्च : प्रेमाच्या नात्यातील ‘एक्‍स’ फॅक्‍टर!

Love
Love

प्रेमिकांमधील ब्रेकअप आणि पॅचअप ही सामान्य गोष्ट. मात्र, काही जण ब्रेकअपनंतरही आपला प्रियकर अथवा प्रेयसीला पुन्हा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात, तर काही जण सर्व विसरून नव्याने सुरुवात करतात. असे का घडते, याचा शोध संशोधकांनी घेतला आणि प्रेमाची विझलेली ‘शमा’ पुन्हा चेतवण्याची मनीषा प्रत्येक ‘परवान्या’च्या मानसिकतेत खोलवर रुजलेली असते, असा निष्कर्ष काढला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका पाहणीनुसार कॉलेजमध्ये जाणाऱ्या ६६ टक्के मुला-मुलींत नातेसंबंध जुळतात आणि तुटतातही. विशेष म्हणजे, त्यातील ५० टक्के जणांत ब्रेकअपनंतर नाते पुन्हा जोडले जाते. नात्यांत असलेल्या ३३ टक्के व लग्न झालेल्या ५० टक्के जोडप्यांत ब्रेकअपनंतर पॅचअप झाल्याचे दिसून येते.

मात्र, एकदा मोडलेले नाते लोक पुन्हा का जोडू पाहतात, हा खरा प्रश्‍न. किन्से इन्स्टिट्यूटमधील मानसशास्त्रज्ञ हेलन फिशर यांनी यावर संशोधन केले. त्यांनी नुकतीच ब्रेकअप झालेल्या पंधरा जणांची निवड केली आणि त्यांच्या मेंदूचे ‘फंक्‍शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ (एफ-एमआरआय) विश्‍लेषण केले.

त्यांच्या निष्कर्षानुसार, ‘‘ब्रेकअप झालेली व्यक्ती निषेधाच्या (प्रोटेस्ट) काळातून जाते. यादरम्यान ती सोडून गेलेल्या व्यक्तीचा ध्यासच घेते आणि त्याला पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करू लागते. त्यांना माजी प्रियकर, प्रेयसीची छायाचित्रे दाखवल्यावर त्यांच्या मेंदूतील यश आणि अपयश, तसेच भावना नियंत्रित करणारे भाग उत्तेजित झाले. त्याचबरोबर रोमॅंटिक प्रेम व ओढीची भावनाही जागृत झाली. त्यावरून नकार मिळाल्यानंतर व्यक्ती प्रेम करणे सोडत नाही, उलट तुम्ही त्या व्यक्तीवर अधिकच प्रेम करू लागल्याचे दिसले. नकार मिळालेल्या व्यक्तीच्या शरीरातील डोमामाइन व नोरेपिनीफ्रिन या न्यूरोट्रान्समीटरची पातळीही खूप वाढली. यातून त्या व्यक्तीवरील ताण आणि कोणाकडूनतरी मदत मिळावी ही भावना वाढते. याला आम्ही ‘फ्रस्ट्रेशन ॲट्रॅक्‍शन’ म्हणतो.

या स्थितीत नाकारले गेल्याची भावना झालेली व्यक्ती हरवलेले प्रेम मिळवण्यासाठी अतिशय नाटकी हावभाव व कृती करते. खरेतर वेगळे झालेले जोडपे रासायनिकदृष्ट्या अद्याप एकमेकांशी बांधलेले असते व त्यांच्यातील हे व्यसन दूर होईपर्यंत ते पूर्णपणे वेगळे होऊ शकत नाही...’’

टेक्‍सास विद्यापीठातील रेने डेल्ये ब्रेकअपचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतात. त्यांच्या मते, ‘‘मेंदूतील रासायनिक अभिक्रियांप्रमाणे मनुष्याचा स्वभाव व वागणुकीचाही नात्यांवर परिणाम दिसतो. एखाद्याने ब्रेकअपनंतर नवीन जोडीदार शोधल्यास त्याच्या पहिल्या जोडीदाराविषयीच्या भावना वेगाने पुसल्या जातात व पुन्हा एकत्र येण्याची शक्‍यताही मावळते. मात्र, काहींमध्ये ब्रेकअपनंतरही ओढ काम राहते व ते माफीची भाषा बोलतात. त्याचबरोबर नात्यातील एखादीच समस्या न सुटल्याने ब्रेकअप झाला असल्यास ते दोघे नाते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असतात. ब्रेकअपचे कारण संदिग्ध असल्यासही आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून पुन्हा एकत्र येऊ शकतो, असे जोडप्यांना वाटते.’’

तुमचे बालपण कसे होते, याचाही तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होतो. लहानपणी नाकारलेपणाची भावना निर्माण झालेल्या मुला-मुलींचा स्वतःवरचा विश्वास खूप कमी असतो व त्यामुळे नाते टिकवण्यासाठी ते टोकाची भूमिका घेतात. त्याउलट सुरक्षित बालपण मिळालेले आपल्या जोडीदाराबरोबरचे भावनिक नाते चांगल्या प्रकारे जोपासतात. लहानपणी नाकारल्याची भावना असलेला आणखी एक गट कोणाशीही जवळीक साधत नाही, भावनिक नाते निर्माण करीत नाही, एकटे राहणे पसंत करतो.

ब्रेकअपनंतरची एकटेपणाची भावनाही अनेकांमध्ये पुन्हा एकत्र येण्यासाठी गरजेची ठरते. मागील नात्यातील स्मरणरंजनही त्यांना एकत्र आणण्यात मदत करते. सोशल मीडियामुळे आपल्या ‘एक्‍स’चे सारखे होणारे दर्शनही अनेकांना नात्याची पुन्हा आठवण करून देत एकत्र आणते. मात्र, मागच्या पिढ्यांच्या तुलनेत ‘मिलेनिअल्स’ व ‘जेन झेड’ म्हणून ओळखली जाणारी नवी पिढी ब्रेकअपनंतर डेटिंग ॲपवर जाऊन नव्या पार्टनरचा शोध सुरू करते, असेही संशोधक स्पष्ट करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com