सर्च-रिसर्च : चुंबकीय बलात सूर्य डावाच...

Sun
Sun

जीवसृष्टीचा पालनकर्ता असलेल्या सूर्याबद्दल मानवाला प्राचीन काळापासून आकर्षण आहे. दिवसभर क्षितिजावर तळपणारा सूर्य मानवाच्या दैनंदिन जीवनाचा एकमेव साक्षीदार आहे. वेदांतील ऋचांपासून आधुनिक कवीच्या रचनांमध्ये सूर्याचे अस्तित्व ठळक दिसते. अर्थात विज्ञानालाही सूर्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. आर्यभटांच्या सूर्यसिद्धांतापासून सुरू झालेला शोध ‘आदित्य एल-१’ या मोहिमेपर्यंत येऊन थांबतो. आपल्या सूर्याबद्दल नवीन माहिती शास्त्रज्ञांच्या हाती लागली आहे. ब्रह्मांडात सूर्यासारखेच वस्तुमान, आकारमान असलेले अनेक तारे आढळतात. त्या ताऱ्यांपेक्षा सूर्याची चुंबकीय ताकद आणि सक्रियता कमी असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. 

अधिक प्रकाशमान करण्याचे काम
सर्वच बाबतीत प्रतिभावान असलेला सूर्य नेमका चुंबकीय बलाच्या बाबतीत कमी का, याचे कोडे मात्र शास्त्रज्ञांना अजून उमगलेले नाही. जर्मनीतील ‘मॅक्‍स प्लॅंक इन्स्टिट्यूट ऑफ सोलर सिस्टिम रिसर्च’मधील संशोधकांनी यासंबंधी शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर अंतरावर स्थित हिरण्यगर्भाची चुंबकीय शक्ती अप्रत्यक्षरीत्या आपल्या जीवनाशी संबंधित आहे. ४.६ अब्ज वर्षे वयाच्या सूर्याच्या अस्तित्वाबरोबरच त्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या अस्तित्वाचा संबंधही या चुंबकीय बलाशी येतो. सूर्यावर दिसणारे काळे आणि पांढरे डाग हे चुंबकीय बलाचेच द्योतक आहे. १६१० पासून आपल्याकडे सूर्यावरील डागांची माहिती आहे. त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा ‘पॅटर्न’ही शास्त्रज्ञ अभ्यासत आहेत. जेणेकरून अवकाशातील हवामानाचा (स्पेस वेदर) अंदाज घेता येईल. सूर्याला अधिक प्रकाशमान करण्याचे कामही हे चुंबकीय बल करते. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या सौर वादळांबद्दल आपण सर्वच परिचित आहोत. 

शोध सूर्याच्या भावंडांचा 
सूर्याबद्दलचे वेगळेपण अभ्यासण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘नासा’च्या हबल टेलिस्कोपच्या मदतीने ऐन ‘तारुण्या’त असलेल्या सुमारे दीड लाख ताऱ्यांचा अभ्यास केला. २००९ ते २०१३ दरम्यान यासंबंधीची निरीक्षणे घेण्यात आली.

सूर्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी २४. ५ दिवसांचा कालवधी लागतो, त्या आधारावर निरीक्षण घेतलेल्या असंख्य ताऱ्यांपैकी २० ते २३ दिवस लागणाऱ्या ताऱ्यांची निवड पुढील संशोधनासाठी करण्यात आली. त्याही पुढे जात शास्त्रज्ञांनी युरोपियन गाया स्पेस टेलिस्कोपच्या साह्याने सूर्याशी साम्य असलेल्या ३६९ ताऱ्यांची अंतिम निरीक्षणासाठी निवड केली.

संशोधनामध्ये ताऱ्यावरील सौरडागांच्या सक्रिय आणि असक्रिय कालावधीचा अभ्यास करण्यात आला. सूर्यामधून या दोन्ही स्थितीतील सोलर इर्ररेडिएशनमधील (सूर्याच्या पृष्ठभागावरील विकीरणाच्या विरुद्ध स्थिती) फरक फक्त ०.०७ टक्के आहे, तर सूर्यासमान असलेल्या ताऱ्यांमध्ये हाच फरक पाच पटीने जास्त आढळून आला आहे. डॉ. अलेक्‍झांड्रा शॅपीरो म्हणतात,‘‘सोलर इर्ररेडिएशनमधील हा फरक बघता, आपल्या सूर्यापेक्षा त्याच्याशी साम्य सांगणारे हे जुळे भाऊ जास्त सक्रिय आहेत.’’ सूर्यासंबंधीची नव्याने मिळालेली ही माहिती ताऱ्यांच्या वर्तनासंबंधीच्या मूलभूत सिद्धांतांवर प्रकाश टाकत आहे. ताऱ्यांच्या स्वतःभोवती फिरण्याच्या ज्ञात आणि अज्ञात गतीसंदर्भातील मूलभूत प्रश्‍न या संशोधनामुळे उपस्थित झाले आहेत. तसेच ताऱ्याचा सर्वाधिक प्रकाशमान असण्याचा कालावधी आणि त्याच्या मृत्यूसंदर्भातील संशोधनातही या माहितीचा फायदा होणार आहे. ऐन तारुण्यात असलेला सूर्य हा चुंबकीय बलासंबंधीच्या संकटात असल्याचेही हे द्योतक असू शकते, असाही अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. भविष्यात अनेक नवीन निष्कर्ष समोर येत राहतील, पण आजच्या घडीला तरी सूर्याला जाणून घेण्याच्या आपल्या जिज्ञासेत शास्त्रज्ञांनी आणखी भर टाकली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com