सर्च-रिसर्च : समुद्र शोषताहेत दुप्पट कार्बन

वातावरणातील सर्वाधिक कार्बन समुद्रात शोषला जातो.
वातावरणातील सर्वाधिक कार्बन समुद्रात शोषला जातो.

पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साइडची साखळी सुरळीत ठेवण्याचे काम सर्व सागरांमार्फत केले जाते. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साइडचे सर्वाधिक शोषण जगभरातील सागरांद्वारे केले जाते. कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याचे हे प्रमाण शास्त्रज्ञांना वाटत होते, त्यापेक्षा दुप्पट असल्याचे नव्या अभ्यासात दिसून आले आहे. 

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड घेऊन त्याचे जैविक घटकांत रुपांतर करण्याचे काम विविध घटक करीत असतात. त्यांना `बायोलॉजिकल कार्बन पंप` असेही म्हटले जाते. तसेच उर्वरित कार्बनचा मोठा भाग हा समुद्रतळांशी साठविण्याचे कामही हे बायोलॉजिकल कार्बन पंप करत असतात. समुद्राच्या पृष्ठभागावर एकपेशीय फायटोप्लँकटन हे जीव असतात. ते सूर्यप्रकाशापासून ऊर्जा घेतात व आपले अन्न तयार करतात. या प्रक्रियेमध्ये ते कार्बन डायऑक्साइड घेतात व ऑक्सिजन बाहेर सोडतात.

फायटोप्लँकटन जेव्हा मरतात, तेव्हा झूप्लँकटनसारखे इतर जीव त्यांना खाऊन टाकतात. हे जीव मेल्यानंतर एकप्रकारचा जैविक कचरा म्हणून समुद्राच्या तळाशी जाऊन बसतात. हा कचरा कार्बनयुक्त असतो.

फायटोप्लँकटन जीवांची कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची क्षमता ही सूर्यप्रकाश समुद्राच्या आत किती अंतरापर्यंत पोहोचू शकतो, यावर अवलंबून असते. ‘क्लोरोफिल फ्लूरोसन्स डिटेक्शन’ पद्धतीचा वापर करून सूर्यप्रकाश समुद्राच्या पृष्ठभागापासून किती अंतरापर्यंत आत जातो, याची पाहणी शास्त्रज्ञांनी केली. जगाच्या वेगवेगळ्या भागात ही खोली वेगवेगळी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. आधीची पाहणी आणि आता केलेली पाहणी यांच्या एकत्रित अभ्यासाद्वारे शास्त्रज्ञांनी समुद्र तळाशी कार्बन साठण्याच्या प्रमाणाचे अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आधीपेक्षा दुप्पट कार्बन डायऑक्साइड दरवर्षी समुद्रतळाशी साठत असल्याचे त्यांना आढऴून आले. वूडस होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूटमधील डॉ. केन बुसेलर यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने ही पाहणी केली. त्यांचे निष्कर्ष `प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस`मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.  नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला, तर सध्या समुद्र कसे आहेत, यांची माहिती तर मिळेलच; तसेच भविष्यात कसे असतील यांचा अंदाज बांधता येईल, असे बुसेलर यांचे म्हणणे आहे. समुद्रात कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात शोषला गेला नसता, तर हवेतील त्याचे प्रमाण प्रचंड वाढले असते. 

सूर्यप्रकाश साधारणतः २०० मीटर खोलीपर्यंत पोहोचतो. यालाच युफोटिक झोन असे म्हणतात. जगभरात विविध विविध ठिकाणी या खोलीत फरक पडतो. तर २०० मीटरपासून एक हजार मीटरपर्यंत भागाला मेसोपेलाजिक झोन (किंवा ट्वायलाइट झोन) असे म्हटले जाते. या मेसोपेलाजिक झोनमधील प्रक्रियांचा अभ्यास पुढील टप्प्यात करण्यात येणार असल्याचे बुसेलर यांचे म्हणणे आहे. ट्वायलाइट झोननंतर म्हणजे एक हजार मीटर ते चार हजार मीटरपर्यंतच्या भागाला  बॅथेपेलॅजिक किंवा मिडनाइट झोन म्हटले जाते. त्यापुढे समुद्राची खोली काही ठिकाणी तब्बल २० हजार मीटरपर्यंत खोल असल्याचे आढळले आहे. परंतु, कार्बन शोषून घेण्याचे काम पहिल्या दोनशे मीटरमध्ये असलेल्या जीवाणूंमुळेच होत असल्याचे दिसून आले आहे. त्यापुढील भागाचा अभ्यास झाल्यानंतर त्या त्या भागातील सागरी प्रक्रियांची माहिती पुढे येऊ शकेल.संयुक्त राष्ट्रांनी २०२१ ते २०३० ही दहा वर्षे `सागरी दशक` म्हणून जाहीर केले आहे. या दहावर्षांत सागराच्या ट्वायलाइट झोनचा अधिक अभ्यास करण्याचे आवाहन बुसेलर यांनी जगभरातील शास्त्रज्ञांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com