सर्च-रिसर्च : ऊर्जा ऊन-सावल्यांची

Electric-Power
Electric-Power

इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्याचे आपले प्रमाण जसजसे वाढत आहे, तसतशी ऊर्जेची गरजही वाढत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याचे प्रयत्न सर्व देशांकडून होत आहेत. परंतु, सूर्यप्रकाश अपुरा असला किंवा नसला म्हणजे सौरघटांद्वारे ऊर्जा निर्माण होण्यास मर्यादा येतात. ढग किंवा सावली असेल तर त्यात आणखीनच अडचणी येतात. या अडचणीतून आता मार्ग सापडला आहे. सावलीपासूनही ऊर्जा मिळू शकेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मोबाईल, घड्याळ, टॅब, लॅपटॉप, स्मार्ट उपकरणे, त्यांचे रिमोट, डिजिटल कॅमेरा, गेम कन्सोल आणि सर्व प्रकारची वेअरेबल साधने... ही यादी अजून वाढवता येईल. ही सर्व उपकरणे चालविण्यासाठी ऊर्जा लागणारच. ऊर्जेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेच्या जास्तीत जास्त वापरावर सर्व देशांचा भर आहे. पण, ही स्वच्छ व फेरवापर करता येणारी ऊर्जा अद्याप पुरेशा प्रमाणात सर्वांना उपलब्ध नाही. सौरऊर्जेच्या वापरावर त्यामुळे भर दिला जात आहे. विज्ञान कथांमध्ये किंवा वैज्ञानिक चित्रपटांमध्ये शोभेल असाच शोध शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात आणला आहे. सावलीतूनही ऊर्जा मिळविण्याचा हा प्रयोग आहे. शॅडो इफेक्ट एनर्जी जनरेटर असे त्याचे नाव आहे. याद्वारे आपल्याला घरामध्येही ऊर्जा निर्माण करणे शक्य होणार आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.

ऊन आणि सावल्यांचा जो खेळ रंगतो, त्याचाच वापर करून ऊर्जा निर्माण करणे, असा हा प्रयोग आहे. ऊन (प्रकाश) आणि सावलीतून निर्माण होणाऱ्या विरोधाभासाचा उपयोग यात करण्यात आला आहे. लवचिक प्लॅस्टिकच्या पट्टीवर सिलिकॉनचा थर देण्यात आला. त्यावर सोन्याचा मुलामा असलेल्या पट्ट्या बसविण्यात आल्या. सर्वसामान्य सौरघटांपेक्षा या उपकरणाला कमी खर्च येतो व घरातील छोटी छोटी उपकरणे त्यावर चार्ज करता येऊ शकतात, असा दावा शास्त्रज्ञांचा आहे.

सावली ही सर्वत्र असते. अनेक वेळेला आपण ती गृहीत धरलेली असते. पारंपरिक सौरघटांचा वापर करताना (फोटोव्होल्टिक सेल) सावली ही त्रासदायक ठरते. सावली असेल, तर आपल्या ऊर्जा तयार करणाऱ्या उपकरणाची कार्यक्षमता कमी होते. नव्या संशोधनामध्ये मात्र सावली आणि प्रकाशित भाग यांच्यातील व्होल्टेजच्या फरकाचा उपयोग ऊर्जा मिळविण्यासाठी केला आहे, अशी माहिती या प्रकल्पात सहभागी झालेले सिंगापूरमधील नॅशनल विद्यापीठातील संशोधक टॅन स्वी चिंग यांनी दिली.

ज्या वेळी शॅडो इफेक्ट एनर्जी जनरेटर पूर्णपणे उन्हामध्ये किंवा पूर्ण सावलीत असते, तेव्हा त्यापासून ऊर्जा कमी मिळते. परंतु, जेव्हा ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होतो.

म्हणजेच, ढगांमुळे वारंवार सूर्यप्रकाश अडवला जातो व काही क्षणांनी पुन्हा सूर्यप्रकाश पूर्णक्षमतेने पडतो; अशा वेळी जास्त ऊर्जा निर्माण होते. एखादे डिजिटल घड्याळ चालण्याएवढी (१.२ व्होल्ट) ऊर्जा प्रायोगिक उपकरणातून निर्माण होत असल्याचे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. ऊर्जा मिळविण्याची ही क्षमता वाढवता येऊ शकेल.

हा अत्यंत प्राथमिक प्रयोग आहे. ऊन-सावल्यांच्या खेळातून ऊर्जा निर्माण होऊ शकते, एवढेच यातून शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. आता यापुढे जाऊन या उपकरणाची क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट शास्त्रज्ञांनी ठेवले आहे. तसेच, सोन्याचा मुलामा दिलेल्या पट्टीऐवजी इतर कोणत्या धातूच्या पट्टीचा वापर करता येईल का, हेही तपासून पाहण्यात येणार आहे.

आपण घरात वापरत असलेल्या उपकरणांपैकी स्मार्ट उपकरणांना लागणारी वीज जरी अशा प्रकारे निर्माण होऊ शकली, तर खनिज इंधनावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकेल. म्हणजेच, पर्यायी इंधनाच्या यादीमध्ये आता ऊन-सावलीच्या खेळाचा समावेश करायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com