सर्च-रिसर्च : मंगळावर प्राणवायूची ‘पेरणी’

perseverance-baggi
perseverance-baggi

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने पर्सिव्हरन्स नावाचे यान नुकतेच मंगळाच्या दिशेने सोडले आहे. नवे अनेक प्रयोग या मंगळ मोहिमेत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या महिनाभरात जगभरातील अवकाश स्पर्धा तीव्र झाल्याचे दिसून आले. अमेरिका, चीन या दोन्ही देशांनी मंगळावर आपापली याने पाठविली, तर सौदी अरेबियाही या स्पर्धेत उतरला असून त्यांनीही जपानमधून आपले यान मंगळ मोहिमेसाठी पाठविले आहे. सध्याचा काळ मंगळ मोहिमेसाठी शास्त्रीयदृष्ट्या अनुकूल आहे. मंगळाचे सूर्यापासूनचे साधारण अंतर साडेबावीस कोटी किलोमीटर आहे. तर, पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर आहे. पण दर २६ महिन्यांनी हे अंतर कमी होते. हे अंतर साधारण दोन-अडीच कोटी किलोमीटरने कमी होते. हा काळ मंगळ मोहिमांसाठी योग्य मानला जातो.

इंधन वाचविण्यासाठी हे अंतर महत्त्वाचे असते. अमेरिकेने ‘पर्सिव्हरन्स’ हे यान ३० जुलै रोजी मंगळमोहिमेवर पाठविले ते पुढील वर्षी १८ फेब्रुवारीला मंगळावर उतरणार आहे. निरो नावाच्या खळग्यात हे यान उतरेल. या यानावर २३ कॅमेरे आणि दोन सूक्ष्मदर्शक यंत्रे आहेत. ‘पर्सिव्हरन्स’ यानाने आपल्यासोबत इनजेन्युइटी नावाचे छोटेखानी हेलिकॉप्टर नेले आहे, तसेच इतर महत्त्वाची उपकरणे नेली आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचे उपकरण म्हणजे ऑक्सिजनची निर्मिती तयार करण्यासाठीचे उपकरण.

मंगळाच्या वातावरणात (वायूमंडळात)  प्राणवायूचे प्रमाण ०.२ टक्क्यांहून कमी आहे. तेथील कार्बन डाय ऑक्साईडचे रूपांतर प्राणवायूत (ऑक्सिजन) करण्याचा प्रयत्न या मोहिमेत केला जाणार आहे. एका अर्थाने प्राणवायूच्या पेरणीचा प्रयोग या मोहिमेत करण्यात येणार आहे. भविष्यातील मानवी मोहिमांसाठी प्राणवायू तयार करण्यासाठीची ही चाचणी असणार आहे. 

प्राणवायू देणार ‘मॉक्सी’
मार्स ऑक्सिजन इन सितू रीसोर्स युटिलायझेशन एक्सपिअरीमेंट अर्थात मॉक्सी (MOXIE) हे एखाद्या मोटारीच्या बॅटरीच्या आकाराचे उपकरण पर्सिव्हरन्स यानातून नेण्यात आले आहे. हा एक छोटा रोबोच आहे. एखाद्या झाडाप्रमाणे मॉक्सी कार्बन डाय ऑक्साईड घेईल व त्यापासून ऑक्सिजन तयार करेल. मंगळावरील विरळ वातावरणात टिकू शकेल अशीच याची रचना केली आहे. 

असा तयार होईल ऑक्सिजन
कार्बन डाय ऑक्साईड वायू मॉक्सी उपकरणात घेतला जाईल. आत त्याचे विघटन ऑक्सिजन आणि कार्बन मोनोऑक्साईडमध्ये होईल. यातून ९९.२ टक्के शुद्ध ऑक्सिजन तयार होईल. त्यानंतर तो ऑक्सिजन बाहेर सोडला जाईल. भविष्यातील मोहिमांमध्ये ऑक्सिजन तयार करण्यासाठी मोठे उपकरण मंगळावर नेण्याचा प्रयत्न असेल, त्या उपकरणातून तयार केलेला ऑक्सिजन साठवला जाईल व यानात आणि अंतराळवीरांसाठी तो वापरता येऊ शकेल. सध्या पाठविलेल्या उपकरणाने पूर्ण क्षमतेने काम केले तर एक तासात दहा ग्रॅम ऑक्सिजन तयार होईल. पुढील वर्षी १८ फेब्रुवारी रोजी मंगळावर उतरल्यानंतर मॉक्सी आपले काम सुरू करेल. कार्बन मोनॉक्साईड पुन्हा वातावरणात सोडल्यानंतर तो घातक ठरू शकतो, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु, शिल्लक ऑक्सिजनबरोबर त्याचे पुन्हा कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात हे सर्व प्रयोगाच्या पातळीवर आहे, ते यशस्वी झाल्यानंतर पुढील पावले टाकली जातील मात्र भविष्यातील मोहिमांसाठी ऑक्सिजनच्या पेरणीचा प्रयोग या निमित्ताने केला जाईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com