सर्च-रिसर्च : शरीराचे तापमान कमी होतेय!

Body-Temperature
Body-Temperature

माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट म्हणजेच ३७ अंश सेल्सिअस निश्चित करून आता सुमारे दोन शतके झाली आहेत. या तापमानापेक्षा जास्त तापमान झाले तर ताप आला, असे समजले जाते. परंतु, सुदृढ माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुदृढ मानवाच्या शरीराचे सरासरी तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट  असेल तर ते सामान्य तापमान असेल, असे जर्मनीतील डॉक्टर कार्ल वुंडरलिच यांनी सुमारे दोन शतकांपूर्वी सिद्ध केले होते. तेव्हापासून त्याच्या आधारेच जगभरातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करत आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये मानवाचे सरासरी तापमान कमी झाले असल्याचे निरीक्षणांतून दिसून आले आहे. 

ब्रिटनमध्ये २०१७मध्ये सुमारे ३५ हजार प्रौढांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर २०१९मध्येही अशीच पाहणी अमेरिकेमध्ये करण्यात आली. ब्रिटनमधील पाहणीत शरीराचे सरासरी तापमान ९७.९ अंश फॅरेनहाइट तर अमेरिकेतील पाहणीत हेच तापमान ९७.५ अंश फॅरेनहाइटपर्यंत खाली आल्याचे नोंदविले गेले. अमेरिकेतील सांता बार्बरा विद्यापीठातील मानवशास्त्र विभागातील प्राध्यापक मायकेल गुरवेन आणि त्याच विभागातील थॉमस क्राफ्ट यांनी बोलिव्हियामध्ये केलेल्या पाहणीत अशाच प्रकारचे निरीक्षण आढळून आले. बोलिव्हियातील चिमाने लोकांच्या शरीराचे सरासरी तापमान गेल्या १६ वर्षांत ०.०९ अंश फॅरेनहाइटने कमी होऊन ९७.७ अंश फॅ. झाल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. 

हजारो नमुन्यांची तपासणी
गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिकेतील नागरिकांच्या शारीरिक तापमानात अशीच घट झाल्याचे गुरवेन यांचे निरीक्षण आहे. शरीराच्या तापमानावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा विचार करून १८ हजारांहून अधिक निरीक्षणे गुरवेन यांनी नोंदविली आहेत. आपल्या आजूबाजूचे तापमान आणि वजन अशा गोष्टींचाही शारीरिक तापमानावर परिणाम होत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.  सायन्स अॅडव्हान्सेस या नियतकालिकात गुरवेन यांचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

शारीरिक तापमान कमी होण्याचे नेमके कारण अद्याप सांगणे शास्त्रज्ञांना शक्य झालेले नाहीये. परंतु गेल्या काही वर्षांपासून मानवाचे राहणीमान बदलले आहे. १९५०-६०च्या दशकापूर्वी जशी रोगराई पसरली जात असे, तशी आता पसरली जात नाही, रोगांचे योग्य वेळी निदान होणे व त्यावर औषधोपचार करणे शक्य झाले आहे, तसेच लसीकरण, चौरस आहार या सर्वांचा एकत्रित परिणाम शारीरिक तापमान कमी होण्यात झाला असू शकतो, असा एक सिद्धांत यासाठी मांडला जात आहे. संशोधकांनी आपल्या बहुतेक सर्व निरीक्षणांसाठी एकच तापमापी (थर्मामीटर) वापरला होता. त्यामुळे उपकरणातील बदलांमुळे तापमानातील बदल नोंदविला जाण्याची शक्यता नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. माहितीचे विश्लेषण कोणत्याही पद्धतीने केले तरी सुदृढ व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान कमी झाल्याचे स्पष्ट आहे. परंतु, अमेरिका आणि बोलिव्हिया अशा दोन वेगळ्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या शारीरिक तापमानात साधारण सारखाच बदल कसा दिसून आला, याच्या विश्लेषणाची गरज आहे, असे क्राफ्ट यांनी सांगितले.

बदलाचे निदर्शक 
निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट आहे. परंतु, शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीराचे तापमान ९९ अंशांपर्यंत वाढू शकते. त्याच्या प्रकृतीत कसलाही दोष नसतानाही आणि तो निरोगी असतानाही ते तापमान ९९ अंशांपर्यंत वाढू शकते. तापमान हे शरीरातील बदलाचे एक निदर्शक आहे. आजाराची सुरूवात कळण्यासाठी याचा उपयोग होता. संपूर्ण दिवसातील वेगवेगळ्या वेळी शरीराचे तापमान बदलत असते. त्यात एक अंश फॅरेनहाइट एवढा बदल होऊ शकतो. याचा विचार करून नव्या संशोधनाकडे पाहिले पाहिजे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com