सर्च-रिसर्च : कॅफीन वाढवेल एकाग्रता!

caffeine
caffeine

कॉफी पिण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना असेल. अनेकांच्या दिवसाची सुरवात कदाचित कॉफीनेच होत असेल. आपल्या आवडत्या कॉफीचे अनेक उपयोगही माहिती असतील. तरतरीतपणा येण्यासाठी, सौंदर्य खुलविण्यासाठी, उन्हामुळे पडणारे डाग आणि सुरकुत्या घालविण्यासाठी, चेहऱ्याला लावण्यासाठी स्क्रबर असे अनेक उपयोग आहेत. यात आता आणखी एकाची भर पडली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉफीमध्ये असलेल्या कॅफीन या द्रव्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांमधील एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे नवे संशोधन सांगते. एक्सपिअरीमेंटल अँड क्लिनिकल सायकॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. कॅफीनमुळे तरतरीतपणा येतो तसेच आळस झटकला जातो असे आतापर्यंत म्हटले जात होते. मात्र त्यासाठीचे प्रयोगात्मक पुरावे सादर केले गेले नव्हते अथवा जो अभ्यास केला गेला तो थोडा अपूर्ण होता. आतामात्र सर्वव्यापी निरीक्षणांतून नवे निष्कर्ष मांडण्यात आल्याचा दावा बफेलो विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.  कंटाळा आला की ताजेतवाने होण्यासाठी कॉफी नियमितपणे प्यायली जाते. खूपवेळ काम केल्यानंतर किंवा वर्गात काम केल्यानंतर मी आणि माझी मित्रमंडळीही कॉफी पितात. खूपवेळ चाललेली मीटिंग किंवा लाँग ड्राईव्ह केल्यानंतर आलेला थकवा कमी करण्यासाठीही कॉफी घेतली जाते. कॉफी आणि कॅफीनबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. परंतु, पौगंडावस्थेतील मुलांसाठी याच्या उपयोगाबद्दल काहीच संशोधन झालेले नव्हते, अशी माहिती या संशोधनाचे प्रमुख लेखक रॉबर्ट कूपर यांनी म्हटले आहे. 

पौगंडावस्थेतील मुलांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास महत्त्वाचा असतो. अशा मुलांना कॅफीनचा उपयोग एकाग्रतेसाठी, जास्तवेळ लक्ष केंद्रित होण्यासाठी करता येऊ शकतो, असे संशोधकांचे मत आहे. संशोधकांनी मुलांचा दोन गट केले. त्यातील एका गटाला प्रतिकिलोमध्ये एक मिलीग्रॅम किंवा प्रतिकिलोमध्ये तीन मिलिग्रॅम एवढे कॅफीन विविध पदार्थांमध्ये मिसळून पिण्यासाठी दिले. तर दुसऱ्या  गटाला कॅफीनचा भास होईल (प्रत्यक्ष कॅफीन नसलेले) असे द्रव्य पिण्यासाठी दिले. या दोन्ही गटांनी काही गोष्टी करण्यास सांगण्यात आले. दोन्ही गटांना चार आकडी संख्यांची मालिका दाखविण्यात आली. त्यातील एकसारख्या अंकांच्या जोड्या त्यांना ओळखायच्या होत्या.

त्यासाठी त्यांना तीस मिनिटे देण्यात आली. ही चाचणी करण्यापूर्वी २४ तास आधीपासून चहा- कॉफी असे कोणतेही पेय न पिण्यास त्यांना सांगण्यात आले होते. प्रयोगाच्यावेळी कॅफीनचे प्रमाण बदलण्यात आले.  याही प्रयोगाला काही प्रमाणात मर्यादा आहेत. कॅफीनचे प्रमाण वाढले तर त्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. मानसिक उपचारांसाठी काही वेळा कॅफीनचा उपयोग केले जातो. आपण अनेकदा म्हणतो की चहा किंवा कॉफीची तलफ आली आहे. या तलफ येण्याचा संबंध मानसिक आहे की शारीरिक याचाही शास्त्रीय शोध घेणे गरजेचे आहे. तसेच सवय, तलफ आणि व्यसन यातील फरक कळण्यासाठी मेंदूत होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत रॉबर्ट कूपर यांनी व्यक्त केले. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने ती वजन कमी करण्यासाठीदेखील फायदेशीर ठरते, असे निरीक्षण आहे. परंतु, त्याचे अतिसेवन करणे उपयुक्त ठरत नसल्याचे संशोधकांचे मत आहे.

निरीक्षणे

  • सुरवातीच्या काळातील दोन्ही गटांची कार्यक्षमता सारखीच होती
  • जसजसा वेळ वाढत गेला, तसतशी एकाग्रतेच्या पातळीत फरक पडत गेला. 
  • ज्यांना प्रयोगापूर्वी कॅफीन देण्यात आले होते, त्यांची एकाग्रता चांगली होती 
  • कॅफीनचा डोस थोड्या प्रमाणात वाढविल्यास त्याचाही उपयोग झाल्याचे दिसून आले. 
  • कॅफीनचा जास्त वापर केल्यास त्याचा झोपेवर परिणाम होण्याची शक्यता
  • माणसाची जाण, झोप आणि कॅफीन यांचा संबंध शोधण्यासाठी अधिक संशोधनाची गरज

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com