esakal | सर्च-रिसर्च : अंटार्क्टिकातील वर्षावन

बोलून बातमी शोधा

German

पश्चिम अंटार्क्टिका तब्बल नऊ कोटी वर्षांपूर्वी दाट झाडी असलेल्या वर्षावनाचा होता. तेथे सापडललेल्या जीवाश्मांवरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. क्रेटाशियस कालखंडामध्ये म्हणजे सुमारे १४.५ कोटी ते ६.५ कोटी वर्षांच्या कालखंडात पृथ्वीवर डायनासोर मुक्तपणे संचार करत होते. समुद्राची पातळीही ५५८ फूट म्हणजे आताच्या पातळीपेक्षा अधिक होती. तसेच समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान उष्ण कटिबंधात साधारणतः ३५ अंश सेल्सिअस होते.

सर्च-रिसर्च : अंटार्क्टिकातील वर्षावन
sakal_logo
By
सुरेंद्र पाटसकर

पश्चिम अंटार्क्टिका तब्बल नऊ कोटी वर्षांपूर्वी दाट झाडी असलेल्या वर्षावनाचा होता. तेथे सापडललेल्या जीवाश्मांवरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. क्रेटाशियस कालखंडामध्ये म्हणजे सुमारे १४.५ कोटी ते ६.५ कोटी वर्षांच्या कालखंडात पृथ्वीवर डायनासोर मुक्तपणे संचार करत होते. समुद्राची पातळीही ५५८ फूट म्हणजे आताच्या पातळीपेक्षा अधिक होती. तसेच समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान उष्ण कटिबंधात साधारणतः ३५ अंश सेल्सिअस होते. भाजून टाकणारे हे तापमान वर्षावनांच्या वाढीसाठी उपयुक्त होते. त्यातून अंटार्क्टिकाच्या प्रदेशात वर्षावनांनी मूळ धरले.  आताच्या न्यूझीलंडमध्ये ज्या प्रमाणे वने सध्या अस्तित्वात आहेत, त्या प्रमाणे अंटार्क्टिका प्रदेशात वृक्षराजी वाढली असावी, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्चिम अंटार्क्टिकामधील पाइन आयलंड ग्लेशियरच्या खाली २०१७मध्ये संशोधकांना पुरातन वर्षावनांचे अवशेष जीवाश्मांच्या स्वरुपात मिळाले आहेत. सुरवातीला हे अवशेष नेहमीपेक्षा वेगळे आहेत, याची खात्री संशोधकांना होती. मात्र त्याचा अभ्यास केल्यानंतर नऊ कोटी वर्षांपूर्वीच्या वर्षावनांच्या माहितीचा जणुकाही खजिनाच शास्त्रज्ञांसमोर खुला झाला. जर्मनीतील ‘अल्फ्रेड वेंगेनर इन्स्टिट्यूट हेल्मोल्टझ सेंटर फॉर पोल अँड मरीन रिसर्च’मधील  संशोधक जॉन क्लागेस यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने हे उत्खनन केले. अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली मिळालेल्या नमुन्यांचे संशोधकांनी सीटी स्कॅन केले. त्यातून जमिनीच्या थराखाली झाडाच्या मुळांचे दाट जाळे त्यांना आढळून आले. जीवाश्मालाला लागलेल्या मातीतून अतीप्राचीन परागकण, बीजाणू आणि पुष्पवनस्पतींचे अवशेषही आढळून आले. हे सर्व अवशेष क्रेटाशियस कालखंडातील असल्याचा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला. सापडलेले परागकण, बीजाणू यांच्या अभ्यास इंग्लंडमधील नॉर्थंब्रिया विद्यापीठातील संशोधक उलरिचसाल्झमन यांनी केला. सध्या न्यूझीलंडमध्ये असलेल्या वृक्षराजीशी त्या अवशेषांचे साधर्म्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

अर्थात त्याकाळात अंटार्क्टिका प्रदेश आतासारखा बर्फाळ प्रदेश नव्हता, तर वर्षावनांचा प्रदेश होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या काळात अंटार्क्टिकातील हवेचे सरासरी वार्षिक तापमान १२ अंश सेल्सिअस असावे. तर उन्हाळ्यातील सरासरी तापमान १९ अंश सेल्सिअस असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या भागात भरपूर दलदल असावी, तसेच नद्याही वाहत असाव्यात. वाहत्या नद्यांतील पाण्याचे तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत असावे. तसेच त्याकाळात तेथे पडणारा पाऊस हा आताच्या वेल्समधील पावसाप्रमाणे असावा, असाही संशोधकांचा अंदाज आहे. अंटार्क्टिकामध्ये चार महिने रात्र असते, याचा विचार केला तर १९-२० अंश सेल्सिअस तापमान हे चांगलेच उबदार म्हणावे लागेल. त्याकाळी संपूर्ण पृथ्वीचे तापमानही आतापेक्षा जास्त असावे, कारण त्याकाळी हवामानातील कार्बन डायऑक्साईडची घनता (प्रमाण) जास्त होती, असा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी गाळाच्या अभ्यासातून काढला आहे. कार्बन डायऑक्साईडचे हवेतील प्रमाण त्याकाळी ११२० ते १६८० पीपीएम (पार्टस पर मिलियन) असावे, असा अंदाज या प्रकल्पातील संशोधक व अल्फ्रेड वेंगेनर इन्स्टिट्यूटमधील हवामानशास्त्रज्ञ ग्रीट लोहमन यांनी व्यक्त केला. 
(‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.)