
अशी केली पाहणी
न्याहारीच्यावेळी किंवा दुपारच्या जेवणाच्यावेळी योग्य प्रमाणात प्रथिने असलेल्या आहाराचे सेवन केल्यास ज्येष्ठ वक्तींच्या स्नायूंचे वस्तूमान (मसल मास) टिकून राहण्यास मदत होते. परंतु, बहुसंख्य जण दिवसभर थोडे थोडे खातात, त्याचा शरीराला फारसा उपयोग होत नाही, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नवे स्नायू तयार करण्याच्या शरीराच्या व्यवस्थेमध्ये ऊर्जा आणि उत्तेजनेची नियमितपणे गरज असते. जेव्हा प्रथिनांचे सेवन केले जाते, तेव्हा ही उत्तेजना व ऊर्जा मिळते. नवे स्नायू तयार करण्याची कार्यक्षमता ज्येष्ठांमध्ये कमी प्रमाणात असते. त्यामुळे ही कार्यक्षमता वाढविण्यासाठी जास्त प्रथिनांचे सेवन करणे गरजेचे ठरते.
पंरतु, केवळ प्रथिनांचे जास्त सेवन करणे हा त्याचा उपाय नाही. योग्य वेळी प्रथिनांचे सेवन आवश्यक असते.बर्मिंगहॅम विद्यापीठातील स्कूल ऑफ स्पोर्ट, एक्झरसाईज अँड रिहॅबिलिटेशन सायन्समधील संशोधकांनी युवक, मध्यम वयीन आणि ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यास केला. हे सर्वजण कधी व किती प्रमाणात प्रथिनांचे सेवन करतात याचा अभ्यास केला. प्रथिनांच्या सेवनाचे जे प्रमाण मान्य करण्यात आले आहे, त्या प्रमाणएवढे किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात सर्वच वयोगटातील नागरिक प्रथिनांचे सेवन करत असल्याचे आढळून आले. परंतु, त्यांच्या खाण्याच्या वेळा, तसेच न्याहारी आणि दुपरच्या जेवणातील प्रथिनांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचेही संशोधकांना आढळून आले. तसेच अनेक जण दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्रथिने असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करत असल्याचेही दिसून आले. दुपारच्या जेवणात पुरेशा प्रमाणत प्रथिने नसल्याने ज्येष्ठांच्या स्नायूंच्या ताकदीवर आणि त्यांच्या वस्तूमानावर परिणाम होत असल्याचे संशोधकांना दिसून आले.
त्यामुळे हे प्रमाण वाढविण्याची गरज या संशोधनातील प्रमुख संशोधक डॉ. बेनॉईट स्मेयूनिंक्स यांनी व्यक्त केली. प्रथिनांच्या योग्य प्रमाणाबरोबर योग्य व्यायाम केल्यानेही ज्येष्ठांच्या स्नायूंची ताकद टिकून राहू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘फ्रंटिअर्स इन एक्झरसाईज अँड स्पोर्टस न्यूट्रीशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिवसभरातील प्रथिनांच्या सेवनाचे एकूण प्रमाण हे ठरवून दिलेल्या मानकांएवढे असले तरी योग्यवेळी त्यांचे सेवन केले नसल्याने फायदा होत नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवसातील वेळेनुसार आहारातील प्रथिनांचे प्रमाण नव्याने ठरविले पाहिजे, असे मतही संशोधकांनी व्यक्त केले.