सर्च-रिसर्च : लाल शेवाळाची सागरी शेती

डॉ. अनिल लचके
Thursday, 24 December 2020

तमिळनाडूमधील रामेश्वरम्‌जवळ मनिकाडू नावाचे बेट आहे. तेथील सागरी किनाऱ्यावरील मच्छीमारांना नित्यनेमाने रोजगार मिळवून देणारा व्यवसाय मिळालेला आहे. तो म्हणजे लाल रंगाच्या शेवाळाची शेती. या शेवाळाला शास्त्रीय नाव आहे - ‘कप्पाफायकस अल्वारेझाय’ (रेड अल्गी). यासाठी शेत लागत नाही, कारण ही शेती सागरातच केली जाते.

तमिळनाडूमधील रामेश्वरम्‌जवळ मनिकाडू नावाचे बेट आहे. तेथील सागरी किनाऱ्यावरील मच्छीमारांना नित्यनेमाने रोजगार मिळवून देणारा व्यवसाय मिळालेला आहे. तो म्हणजे लाल रंगाच्या शेवाळाची शेती. या शेवाळाला शास्त्रीय नाव आहे - ‘कप्पाफायकस अल्वारेझाय’ (रेड अल्गी). यासाठी शेत लागत नाही, कारण ही शेती सागरातच केली जाते. या प्रकल्पाला ‘ॲक्वा ॲग्रिकल्चरल सोल्युशन प्रकल्प’ म्हणतात. हा प्रकल्प ‘इंडो-यूएस सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी एन्डॉव्हमेन्ट फंड’म्हणून ओळखला जातो.  

लाल शेवाळे उगवण्यासाठी बांबूचा उपयोग करून चौकोनी बांध तयार करतात. त्याला सर्व बाजूने जाळी बांधलेली असते. हा तरंगणारा बांध शेतकरी सागरात नेऊन तरंगत ठेवतात. या नंतरचे काम महिलावर्गाकडे असते. त्या किनाऱ्यावर बसून शेवाळाची लागवड करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेवाळ्यांची सफाई करतात. यामुळे त्यांनादेखील रोजगार मिळतो. साधारण ६० किलोग्रॅम शेवाळाची बांबूंच्या बांधामध्ये लागवड केली जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही दिवसांतच त्यापासून २६० किलो शेवाळी वाढतात. कोणतेही वेगळे खत वापरावे लागत नाही. शेवाळे वाढण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे घटक सागरी पाण्यामार्फत मिळतात. या शेवाळापासून निर्यातक्षम ‘अक्वासॅप’ नावाचा द्रवरूप माल, म्हणजे अर्क तयार करण्यासाठी जवळच्या लघु उद्योगांमध्ये पाठवले जाते. या अर्कात पुरेसा नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. त्यात पोलिसॅखराईडस्‌, कायटोसॅन्स आणि प्रथिनांचे छोटे तुकडे (प्रोटिन हायड्रोलिसिट) असतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्काची अमेरिकेला निर्यात
हा अर्क उत्तम पॅकिंग करून अमेरिकेतील सात राज्यांकडे निर्यात होतो. तो सेंद्रिय ‘जैवउत्तेजक’ म्हणून ओळखला जातो. हा घटक निसर्गतःच वनस्पतीची वाढ होण्यासाठी विविध रसायने सूक्ष्म प्रमाणात पुरवत असतो. यामुळे शेतातील पिकांना जोम धरतो. शेतातील माल उठावदार दिसतो आणि काहीसा टिकाऊ बनतो. त्याचा दर्जा वाढतो. उभी पिके बऱ्याचदा अनेक प्रतिकूल परिस्थितीत वाढत असतात. उदाहरणार्थ ओला किंवा कोरडा दुष्काळ, कडक थंडी किंवा तीव्र उष्मा, धुके, गारपीट, कीड-किटकांचा प्रादुर्भाव आदी. अशा प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्यासाठी बायो- स्टिम्युलंटचा वापर केला तर बराच फायदा होतो. एवढेच नव्हे तर पिकांना कमी पाणी लागते, असा अनुभव आहे.    

कॅलिफोर्निया आणि ‘वॉशिंग्टन स्टेट डिपार्टमेंट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर’ या दोन संस्थांनी लाल शेवाळापासून तयार झालेल्या या मालाला ‘ऑरगॅनिक सर्टिफाईड प्रॉडक्‍टिव्हिटी इन्हान्सर’ म्हणून मान्यता दिलेली आहे. या जैवउत्तेजकामध्ये वनस्पतींना वाढीसाठी लागणारे घटक आहेत. त्यात सोडियमचे प्रमाण नगण्य असते, पण पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते. तसेच ऑक्‍झिन, सायटोकायनिन आणि जिबरेलीन ही संप्रेरके (हॉर्मोन) असतात. सायटोकायनिन हे वनस्पतींच्या पेशी विभाजनाला मदत करते आणि ऑक्‍झिन वनस्पतीच्या वाढीवर नियंत्रण करते. जिबरेलीन खोडाची लांबी वाढायला मदत करते. बायो-स्टिम्युलंटमध्ये ह्युमिक आम्ल आणि फल्व्हिक आम्लदेखील असते. त्यात वनस्पतींच्या उत्तम वाढीसाठी पोषक द्रव्ये असतात. बायो-स्टिम्युलंटची तुलना जीवनसत्वांबरोबर करता येईल. कारण त्यांचा वापर केल्यावर पिकाच्या दर्जाबरोबर त्याचे उत्पादनही बरेच वाढते. खतांसाठी पूरक रसायने पुरवल्यामुळे बायो-स्टिम्युलंटचे महत्त्व वाढत आहे, कारण हा घटक पूर्णतः नैसर्गिक आहे आणि याचा वापर केला तर रासायनिक खतांचा वापर कमी होईल. सेंद्रिय शेतीचे फायदे आहेतच. ग्राहक ‘ऑरगॅनिक’ मालाची मागणी करत असतात. साहाजिकच पुढील पाच वर्षांमध्ये या मालाची निर्यात सध्यापेक्षा अडीच पटीने वाढणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write dr anil lachake on red moss