सर्च-रिसर्च : फास्ट फूड स्टॉल... २००० वर्षांपूर्वीचा!

पॉम्पेईमध्ये सापडलेल्या फूड स्टॉलचे अवशेष.
पॉम्पेईमध्ये सापडलेल्या फूड स्टॉलचे अवशेष.

एखादा खाद्यपदार्थ खावासा वाटला, की आपण लगेच जवळच्या दुकानात जाऊन तो पदार्थ विकत घेतो. काही विशिष्ट पदार्थ विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात. खवय्यांची गर्दी त्या दुकानात कायम असते. खाद्यपदार्थ दुकानात जाऊन विकत घेण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण, ही पद्धत किमान दोन हजार वर्षे जुनी आहे, असे म्हणता येईल, असे पुरावे सापडले आहेत.

इटलीमधील पॉम्पेई येथे केलेल्या उत्खननात दोन हजार वर्षांपूर्वीचा फास्ट फूड स्टॉल सापडला आहे. जुन्या काळातील रोमन लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर यामुळे प्रकाश पडू शकतो. माऊंट व्हेसुव्हिअसमधील बाहेर पडलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात पॉम्पेई हे शहर इसवी सन ७९मध्ये बेचिराख झाले होते. लाव्हारस संपूर्ण शहरात पसरल्याने सुमारे १५ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. या लाव्हारसाच्या खाली गाडल्या गेलेल्या अनेक गोष्टी आता उघड होत आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे `थर्मोपोलियम`. थर्मोपोलियम हा ग्रीक-रोमन शब्द आहे. याचा शब्दशः अर्थ गरम पदार्थ विकण्याची व्यावसायिक जागा. पॉम्पेईमधील थर्मोपोलियमच्या जागेचा शोध खरे तर गेल्यावर्षी लागला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र त्या जागेचे पूर्ण उत्खनन करण्यात आले नव्हते. ते यावर्षी करण्यात आले. त्यात आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी आढळून आल्या. थर्मोपोलियम म्हणजे एक प्रकारच्या फास्ट फूडचा स्टॉल असल्याचे दिसून आले. अनेक प्रकारची मातीची भांडी ठेवण्याची आणि त्यातील पदार्थ तेथेच गरम करण्याची सोय आढळून आली. ज्या ठिकाणी हे दुकान थाटण्यात आले होते, त्या दुकानाच्या भिंतींवर रंगीत चित्रे काढण्यात आली होती. इतकेच नव्हे तर थर्मोपोलियमच्या कट्ट्यावरही विविध प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आढळून आली.

बदकाची हाडे, तसेच डुक्कर, शेळ्या, मासे इतकेच नव्हे तर गोगलगाईचे अवशेष आढळून आले. रोमन काळातील पाएला प्रमाणे  काही घटक एकत्रितपणे शिजविण्यात आले असल्याचे संशोधकांना आढळून आले. पाएलामध्ये तांदुळाच्या बरोबरीने कोंबडीचे मांस किंवा मासे किंवा इतर प्राण्यांचे मांस एकत्र शिजवले जाते आणि ते पसरट भांड्यात वाढले जाते. काही भांड्यांमध्ये द्विदल धान्यांचे (फावा बिन्स, शास्त्रीय नाव व्हिसिया फाबा) काही तुकडेही आढळून आले. वाईनचा स्वाद वाढविण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत होता, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

ज्वालामुखी बाहेर पडायला लागल्यानंतर अत्यंत घाईगडबडीने हे दुकान बंद केले असावे आणि काही काळातच ते लाव्हारसाच्या खाली गाडले गेले असावे, असा अंदाज या प्रकल्पातील एक संशोधक  व पॉम्पेई येथील अर्किओलॉजिकल पार्कचे महासंचालक मासिमो ओसान्ना यांनी व्यक्त केला.

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर काही ज्येष्ठ नागरिक मागे राहिले असावेत, काही मुलेही तेथेच अडकली असावीत. काही ज्येष्ठ नागरिकांची हाडेही सापडली आहेत. एका पाण्याच्या टाकीचे आणि कारंज्याचेही अवशेष या परिसरात सापडले आहेत. यातील एका भागात भिंती रंगवलेली काही चित्रेही आढळून आली आहेत. त्या चित्रांमध्ये खाद्यपदार्थांची चित्रे आहेत. एखाद्या मेन्यू कार्डप्रमाणे ही चित्रे रंगविलेली आहेत. त्याबरोबर मद्याची चित्रेही भिंतीवर रंगविल्याचे दिसून आले आहे. एकूण ११० एकर क्षेत्रात उत्खनन करण्यात आले आहे. रोम साम्राज्याचे वैभवशाली अवशेष या परिसरात विखुरलेले आहेत. अनेक वास्तू ज्वालामुखीच्या राखेखाली गाडल्या गेल्या आहेत. त्यातील काही भाग आता सर्वांसमोर आला आहे. रोम मधील कोलेसियम खालोखाल गेल्या वर्षभरात सर्वाधिक पर्यटकांनी पॉम्पेईला भेट दिली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com