
अत्यंत थंड प्रदेशातील अनेक प्राणी थंडीच्या काळात शीतनिद्रा (हायबरनेशन) घेतात. या काळात त्यांच्या शारीरिक क्रिया जवळजवळ थांबलेल्या असतात. या काळात ते प्राणी काहीही खात-पितही नाहीत. थंडी संपली की ते पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येतात. मात्र, अशा प्रकारची क्षमता मानवासह अनेक सस्तन प्राण्यांना नसते. या आपल्या माहितीला धक्का देणारे निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आले आहेत.
अत्यंत थंड प्रदेशातील अनेक प्राणी थंडीच्या काळात शीतनिद्रा (हायबरनेशन) घेतात. या काळात त्यांच्या शारीरिक क्रिया जवळजवळ थांबलेल्या असतात. या काळात ते प्राणी काहीही खात-पितही नाहीत. थंडी संपली की ते पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येतात. मात्र, अशा प्रकारची क्षमता मानवासह अनेक सस्तन प्राण्यांना नसते. या आपल्या माहितीला धक्का देणारे निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आले आहेत.
शीतनिद्रा घेण्याची क्षमता मानवामध्ये कधीकाळी होती, असे निष्कर्ष नव्या संशोधनातून मिळाले आहेत. अर्थात हे प्राथमिक निष्कर्ष आहेत. मात्र इतर प्राण्यांप्रमाणे ही क्षमता पूर्ण विकसित नसल्याचेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अस्वल जेव्हा आपल्या सुस्तीतून जागे होते, (या अवस्थेला इंग्रजीत टोर्पोर म्हटले जाते. शीतनिद्रेसारखीच ही स्थिती असते), पुन्हा आपले खाद्य शोधण्यासाठी आणि खाण्यासाठी सज्ज होत असते, त्यावेळी त्याच्या शरीरातील स्नायू आणि हाडे थंडीच्या आधी जशी होती, तशीच असतात.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कडाकाच्या थंडीपासून त्यांचा बचाव झालेला असतो. यासाठी त्यांची चयापचय क्रिया एका विशिष्ट पद्धतीने सुरू असते. परंतु, थंडी सुरू होण्यापूर्वी योग्य आणि पुरेसे अन्न प्राण्यांना मिळालेले नसले, तर शीतनिद्रेनंतर काही प्राण्यांना अनेक रोगांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शीतनिद्रा ही प्रत्येक प्राण्यासाठी, प्रत्येकवेळी आरोग्यदायी ठरत नाही. शीतरक्ताच्या प्राण्यांमध्ये शीतनिद्रेची क्षमता असते. मानवासारखे प्राणी बाहेरच्या तापमानानुसार शरीराचे तापमान बदलू शकत नाहीत.
सुमारे चार लाख वर्षांपूर्वीच्या मानवाने अत्यंत तीव्र हिवाळ्याचा सामना केला असावा. त्यावेळी त्यांनी आपली चयापचय क्रिया अत्यंत हळू केली असावी आणि शीतनिद्रेत ते काही महिने होते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. स्पेनचे पुरामानवशास्त्रज्ञ जुआन -लुईस अर्सुगा आणि ग्रीसमधील थ्रेस विद्यापीठातील अँटोनिस बार्टसिओकास यांनी हे संशोधन केले आहे. `ल अँथ्रोपोलॉजी` या नियतकालिकात ते प्रसिद्ध करण्यात आले आहे. उत्तर स्पेनमधील अॅटाप्युएर्कामधील सिमा डे लोस ह्युसोस या ठिकाणच्या उत्खननात सुमारे चार लाख वर्षांपूर्वीची जीवाश्म सापडली आहेत. त्यात मानवाची हजारो हाडे व दात सापडले आहेत. या हाडांची वाढ एकसारखी झालेली नसल्याचे अभ्यासातून दिसून आले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शीतनिद्रा घेणाऱ्या प्राण्यांची हाडे ज्या प्रकारे विकसित होतात, त्याच प्रकारे ही हाडे विकसित झाल्याचे दिसून आले. त्यातून आपले पूर्वज असलेले निआंडर्थल मानव किंवा त्यापूर्वीच्या मानवात शीतनिद्रेची क्षमता विकसित झाली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आपला सर्वांत जवळचा पूर्वज असलेला ‘होमो सेपियन’ मानव चालायला सुरुवात करण्यापूर्वीच्या मानवाच्या हाडांची ही जीवाश्म आहेत. ज्या भागात ही हाडे आढळून आली, त्या भागात आपल्या पूर्वजांना हिवाळ्याच्या काळात पुरेशा प्रमाणात स्निग्ध पदार्थ मिळाले नसावेत, असेही संशोधनात दिसून आले आहे. कडाक्याच्या थंडीतून वाचण्यासाठी `शीतनिद्रा` हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर राहिला असावा, असे संशोधकांना वाटते.
संशोधकांचे निष्कर्ष प्राथमिक आहेत. त्या भागात यापूर्वी सापडलेल्या आणि आताही सापडलेल्या हाडांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर अंतिम निष्कर्ष सांगता येणार येतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात चरबी नसल्यास शीतनिद्रेनंतर अस्थिदाह, मुडदूस, पॅराथायरॉईड ग्रंथींचा अतिस्राव अशा प्रकारचा त्रास शीतनिद्रेनंतर होऊ शकतो, असे संशोधकांचे निरीक्षण आहे.
Edited By - Prashant Patil