पर्यावरण : भीती बिनपक्ष्यांच्या आकाशाची!

Bird
Bird

झाडाच्या गर्द हिरव्या पानांनी लगडलेल्या फांदीवरून पंख पसरून क्षणार्धात आकाशात उंच भरारी घेणारे विविधरंगी पक्षी हा मानवाचा अनादिकालापासून कुतूहलाचा विषय आहे. लहानपणी घराच्या अंगणात बागडणारी, आरशात स्वतःच्या प्रतिबिंबावर चोचीनं टोच मारणारी चिऊताई हे आपलं पहिलं पक्षिनिरीक्षण. घराच्या कौलांमध्ये, एखाद्या कोपऱ्यात चार काड्या जमवून केलेल्या तिच्या इवल्याशा घरट्यातही आपलं बालमन अडकायचं. पण, गेल्या तीन दशकांमध्ये फक्त पुण्या-मुंबईचंच नाही; तर गोदातीरावरच्या नाशिकचं, कृष्णेच्या काठावरच्या सांगलीचं, पंचगंगेच्या तीरावरच्या करवीरनगरीचं वेगानं शहरीकरण झालं. त्याचबरोबर औरंगाबाद, नागपूर अशी राज्यातील अनेक शहरं बेसुमार वेगानं वाढली.

माणसांना राहण्यासाठी झाडं तोडली गेली अन्‌ त्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यात इवलीशी चिऊताई दिसेनाशी झाली. हे सगळं घडलं आपल्या डोळ्यांदेखत. चिऊताईप्रमाणंच वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या असंख्य पक्ष्यांची संख्या वेगानं कमी होत आहे. ही फक्त पक्ष्यांवर ओढवलेली आपत्ती, इतक्‍या मर्यादित दृष्टिकोनातून याचा विचार करता येणार नाही; किंबहुना तो तसा करूही नये. कारण, अनंतकालापासून चालत आलेल्या जैवसाखळीतील पक्षी हा महत्त्वाचा घटक आहे.

मानवानं निसर्गात केलेल्या निरंकुश हस्तक्षेपामुळे ही जैवसाखळी दिवसेंदिवस खिळखिळी होताना दिसते. त्यामुळं भविष्यात मानवावर कोसळणाऱ्या नैसर्गिक संकटांची ही नांदी असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. पण, त्याकडं अद्याप आपण फारसं गांभीर्यानं पाहिलेलं नाही, ही बाब ‘स्टेट ऑफ इंडियाज्‌ बर्ड २०२०’च्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या अहवालातून समोर आली आहे. आकाशात विहरणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी झाल्यानं ‘बिनपक्ष्यांचं आकाश’ अशा अवस्थेकडं आपण वाटचाल करत आहोत काय, अशी शंका यातून डोकावते.

आपल्या देशातील पक्ष्यांची संख्या प्रचंड वेगानं कमी होत असल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदविलेला आहे. देशात सहज दिसणाऱ्या ८६७ पक्ष्यांच्या प्रजातींच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष पुढे आला. त्यापैकी १०१ पक्षी तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या पक्ष्यांचं पृथ्वीवरील अस्तित्व कायम राहावं, यासाठी त्यांचं तातडीनं संवर्धन करणं, हा आणि हाच एकमेव मार्ग आहे. अर्थात, नष्ट होणाऱ्या प्रत्येक पक्ष्याच्या प्रजातींची सखोल शास्त्रीय कारणमीमांसा आवश्‍यक आहे. त्यानंतर संवर्धनाचा शाश्‍वत मार्ग सुरू होतो. देशातील ८६७ पैकी ३१९ प्रजाती या मध्यम संवर्धनाची गरज असणाऱ्या वर्गवारीत येतात. या पक्ष्यांच्या संवर्धनाचं आव्हान पेलत असताना परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, हा एक आशेचा किरणही या अहवालात दिसतो. विश्‍लेषण केलेल्या ८६७ पैकी १२६ पक्ष्यांच्या प्रजाती कमी झालेल्या नाहीत.

तसेच, त्यापैकी काही पक्ष्यांची संख्या वाढलेली आहे. मानवी वस्तीमुळे बदलणाऱ्या अधिवासाशी जुळवून घेतल्यानं कबुतरांसारख्या काही पक्ष्यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवल्याचं दिसतं. बहुतांश शहरांमध्ये त्यांची संख्या वेगानं वाढल्याचं दिसतं. उर्वरित प्रजातींचे पक्षी इतक्‍या सहजतेनं स्वतःत बदल करू शकले नाहीत. त्यामुळे मानवानं स्वतःमध्ये बदल करून नामशेष होण्याच्या मार्गावरील पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावलं टाकण्याची वेळ आता आली आहे. पक्षिसंवर्धनासाठी निश्‍चित धोरण आखणं हे त्या दिशेनं टाकलेलं पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. सर्वांत वेगानं नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनाला अग्रक्रम देणं, याप्रमाणं प्राधान्यक्रम निश्‍चित करणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्‍यक संशोधन आणि व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. या सगळ्या पातळ्यांवर लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी लोकजागृती, लोकशिक्षण आणि जनसंवाद, ही त्रिसूत्री उपयुक्त ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com