पर्यावरण : वनस्पतींवर वक्रदृष्टी

Tree-Cutting
Tree-Cutting

आपल्या आकाशगंगेतील सजीवसृष्टी असलेल्या एकमेव ग्रहावर आपण रहातो. आपल्याबरोबरच प्राणी, वनस्पतीही वाढतात. जीवसृष्टीचा समतोल यातून टिकतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप अपरिमित वाढला आहे. विकासाच्या नावाखाली जगातील प्रत्येक देशाची मनमानी सुरू आहे. त्याचे आघात आता पर्यावरणावर होऊ लागले आहेत. त्या-त्या ठिकाणच्या परिसंस्था अक्षरशः उद्‌ध्वस्त होत असल्याचे दिसते. या संदर्भात डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा अहवाल  ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड प्लांट्‌स एंड फंगी २०२०’ प्रसिद्ध झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यानुसार ४० टक्के वनस्पतींवर नष्ट होण्याची टांगती तलवार आहे. म्हणजे जगभरातील सुमारे एक लाख ४० हजार वनस्पतींच्या प्रजाती कायमस्वरूपी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. प्रत्येक पाचपैकी दोन वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होण्याचा धोका निर्माण होतोय. जगभरात आतापर्यंत जवळपास साडेतीन लाख वेगवेगळ्या वनस्पतींचा शोध लागला. त्यांना मानवाने नावे दिली. त्यातील फुले येणाऱ्या वनस्पतींची संख्या सव्वातीन लाखांच्या दरम्यान असल्याची नोंद झाली आहे. मात्र, यातील एक लाख ४० हजार वनस्पतींचा प्रवास नामशेष होण्याच्या दिशेने सुरू झाल्याचे दिसते. याच अहवालातून २०१६ मध्ये २१ टक्के वनस्पतींचे अस्तित्व धोक्‍यात असल्याचा इशारा दिलेला होता. मात्र, तो गांभीर्याने घेतला नसल्याचे आता चार वर्षांनंतर समोर आले आहे.

औषधी वनस्पतींचा सर्वनाश
जगभरातील ४२ देशांमधील २१० संशोधक एकत्र येऊन वनस्पतींबद्दलचा हा अहवाल तयार करतात. त्यातील निष्कर्ष भावी मानवी पिढ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत. सध्या जगात ‘कोरोना’ विषाणूचा उद्रेक सुरू आहे. अशा साथरोगांच्या उद्रेकाला प्रतिबंध करण्याची क्षमता असलेल्या औषधी वनस्पतींचीही माणूस अक्षरशः कत्तल करत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या २५ हजार वनस्पती औषध म्हणून वापरल्या जातात. त्यापैकी ७२३ वनस्पतींचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. त्यामुळे उद्‌ध्वस्त अवस्थेतील वसुंधरा आपण भावी पिढीला देणार आहोत काय, हा प्रश्न संवेदनशील मनाला पडल्याशिवाय राहात नाही. औषधी वनस्पतींचे अस्तित्वच समूळ नष्ट करताना भविष्यात मानवाने कशाच्या आधारावर जगायचे, हा प्रश्न आपल्याला अस्वस्थ कसा करत नाही ? दरवर्षी नवनवीन वनस्पतींचा शोध लागतो. पण, त्याच्या कित्येक पटीने अधिक वनस्पती नामशेष होत आहेत. या प्रजातींवर आपले भविष्य अवलंबून आहे. बुरशी या परजीवी वनस्पतीच्या २२ ते ३८ लाखांपर्यंत प्रजाती आहेत. त्यापैकी सुमारे दीड लाख प्रकारच्या बुरशींचा शोध माणसाला लागला, तर ९० टक्के प्रजाती अजूनही नेमकेपणाने आढळलेल्या नाहीत.

अन्न आणि इंधनाचा स्रोत
आपल्याला अन्नासाठी वनस्पतींवरच अवलंबून राहावे लागते. दैनंदिन आहारातील प्रत्येक पोषक घटक आपल्याला त्यांच्यापासून मिळतो.

वनस्पतींपैकी मोजक्‍याच प्रजातींचा आपण अन्न म्हणून वापर करतो. अजूनही सात हजारांहून अधिक प्रजाती अन्न देऊ शकतात. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पोषक अन्न या वनस्पतींच्या माध्यमातून मिळवता येईल. त्यापैकी काही वनस्पतीतून इंधनही मिळेल. सध्या आपण फक्त ऊस, मका, सोयाबीन, पांढरी मोहरी आणि गहू यापासूनच जैवइंधन तयार करतो. ऐंशी टक्के जैवइंधन निर्माण करण्याची क्षमता असलेल्या वनस्पतीही आपल्याकडे आहेत.

इतकेच नाही तर जवळपास अडीच हजार वनस्पती या उर्जेचा शाश्वत स्त्रोत म्हणून वापरता येतील. नष्ट होणाऱ्या वनस्पतींना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या बियाणांची बॅंकही तयार केलेली आहे. पण, ज्या वेगाने जमीन सपाट करून ती शेतीखाली आणली जात आहे, त्यापुढे वनस्पती संवर्धनाचा वेग फारच मंद आहे. वनस्पतींचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com