सर्च-रिसर्च : मास्कमागील विज्ञान

mask
mask
Updated on

मराठीत मास्क शब्दाचा अर्थ मुखवटा असा आहे. पण संसर्गजन्य रोगाची साथ पसरू नये म्हणून कोणी मुखवटा घालून बाहेर पडत नाही. ‘कोविड- १९’ या श्वसनेंद्रियाशी संबंधित असलेला रोगप्रसार रोखण्यासाठी लोकांनी मास्क वापरणे आवश्‍यक आहे, असे ‘युएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने म्हटलेय. डोळ्यांमार्फतदेखील संसर्ग होऊ शकतो म्हणून चष्मा उपयुक्त आहे. मास्क वापरणे आता लोकांच्या ‘मुखवळणी’ पडलेय. मास्कसंबंधीचे शोधनिबंध वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. अमेरिकेच्या ‘एफडीए’ (फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन)तर्फे बरीच माहिती प्रकाशित केलेली आहे. मास्कचे विविध प्रकार आहेत. कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा याबद्दल संशोधकांनी मार्गदर्शन केलेय. एन- ९५ मास्क सुरक्षित, लवचिक आणि टिकाऊ आहे. तो पॉलिप्रोपिलिनपासून तयार केलेला असून ०.३ मायक्रॉनचे सूक्ष्मकण निदान ९५ टक्के थोपवून धरतो. एक मायक्रॉन म्हणजे एक हजार नॅनोमीटर. कोरोना विषाणूचा आकार १२५ नॅनोमीटर इतका लहान आहे. पण कोरोनाचे विषाणू सहसा स्वतंत्र नसतात, तर ते रुग्णाच्या खोकल्यात किंवा शिंकेच्या अतिसूक्ष्म तुषारात असतात. त्यांचा आकार दहा मायक्रॉनपेक्षा जास्त असतो. एन- ९५ मास्क हा तुषारांबरोबर आलेल्या विषाणूंना सहज अडवू शकतो. धूलिकण, जिवाणू, अतिसूक्ष्मकण मास्कला चिकटतो. कारण त्यांच्यावर काहींना काही तरी विद्युतभार असतो. विषाणू आणि रसायने मास्कमध्येच अडवण्यासाठी स्थिरविद्युत किंवा व्हन डर वाल्स बंधने कारणीभूत असतात.  संसर्गजन्य रोग झालेल्या रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी एन-९५ मास्क योग्य ठरतो. मास्क तयार करण्यासाठी सुती, नायलॉन, पॉलिप्रॉपिलिन, रेशमी किंवा पॉलिएस्टरचे धागे वापरण्यात येतात.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मास्क घातल्यावर काही जणांना नाकातून फुफ्फुसात पुरेसा ऑक्‍सिजन जाईल काय? किंवा बाहेर पडणारा कार्बन डायॉक्‍साईड लवकर बाहेर पडेल काय, अशी शंका वाटते. तथापि, श्वसनाशी संबंधित असणारे हे रेणू जिवाणू आणि विषाणूंबरोबर तुलना केली तर नगण्य आकाराचे (०.३ नॅनोमीटर) असतात. मास्कमधून त्यांची सहज जा-ये होत असते. परिणामी श्वसनक्रियेला अडथळा होत नाही. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे ‘नोबेल’ विजेते स्टीव्हन चू आणि यी कुई यांनी मास्कवर संशोधन केलेय. त्यांनी घरगुती कापडांचे निरनिराळे नमुने घेतले. सुती, रेशमी, रेयॉन, नायलॉन वापरून मास्क तयार केले. ते संसर्ग रोखण्यासाठी उत्तम असल्याचे निरीक्षण त्यांनी केलेय. त्यांच्या मते तीन प्रकारच्या कापडांचे नमुने एकावर एक ठेऊन मास्क तयार करावेत. बाह्य-आवरण जलरोधक असावे. रेशमाच्या किंवा कृत्रिम धाग्याच्या कापडांमध्ये स्थिर-विद्युत (स्टॅटिक इलेक्‍ट्रिसिटी) निर्माण होते. अनेक प्रकारचे तुषार आणि कण त्यामध्ये आकर्षित होऊन मधेच अडकले जातात; आरपार जात नाहीत. बॅडमिंटन खेळताना शटल नेटमधेच अडकते त्याप्रमाणे! घराबाहेर पडण्याच्या आधी असा मास्क एखाद्या रबरावर, चामड्यावर किंवा रेशमी कापडावर हलकेच घासला तर त्यात स्थिर-विद्युत तयार होते. मास्कच्या मध्यभागी दुसरे आवरण पॉलिप्रॉपिलिनचे असावे. तिसरे नाकाजवळचे आवरण मऊ आणि सुती असणे आवश्‍यक आहे. कारण त्वचेला येणारा घाम-बाष्प शोषून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अशा सर्वसाधारण रचनेचा मास्क घरगुती असला, तरी तो वापरायला सुलभ असतो आणि संसर्गजन्य रोग दूर ठेवण्यासाठी सक्षम असतो. घरच्या घरी तो पाण्याने धुता येतो. असा मास्क जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलाय. मास्क घातल्यामुळे गर्दीमध्ये संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com