सर्च-रिसर्च : कोरोनावर ‘ड’ची मात्रा

डॉ. अनिल लचके
गुरुवार, 2 जुलै 2020

आहारात दूध,चीज,संत्री,अनेक प्रकारची धान्ये, मशरुम्स,अंडी यांचा समावेश केला पाहिजे.त्यात जीवनसत्त्व ‘ड’आहे.म्हणूनच ‘कोरोना’च्या संकट काळात विषाणूचा बीमोड करण्यासाठी‘ड’चा डंका सध्या जोरात पिटला जातोय!

सध्या जगभर धुमाकूळ घालत असलेल्या ‘कोरोना’ रोगावर हमखास उपयोगी पडतील अशी औषधे अजून सापडलेली नाहीत. लक्षणांवर उपयुक्त असणारी औषधे आहेत. हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्वीन (एचसीक्‍यू) किंवा क्‍लोरोक्वीन ही औषधे हिवतापासाठी गुणकारी आहेत. पण ‘कोरोना’साठी ‘एचसीक्‍यू’ काही वेळा उपयुक्त ठरले आहे.

रासायनिकदृष्ट्या दोन्ही अत्यंत क्रियाशील आहेत. त्याचे काही विपरित परिणाम असू शकतात. रेमडेसेवीर हे न्यूक्‍लिओसाइडवर्गीय औषध परीक्षा नळीतील प्रयोगात विषाणूरोधक असल्याचे लक्षात आले. मात्र ते सर्वच विषाणूंविरुद्ध परिणामकारक नाही. ते ‘कोविड-१९’ बाधा झालेल्यांना काहीसे लागू पडतेय; पण सध्या पुरवठा मर्यादित आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच या औषधांची योजना करावी लागते. ‘कोविड-१९’करिता लस तयार झालेली नसल्याने काही औषधांचा उपयोग केला जातोय.         

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

‘कोविड-१९’च्या रुग्णाला बरे वाटावे म्हणून ऑक्‍सफर्ड आणि एडिन्‌बरो युनिव्हर्सिटीच्या डॉक्‍टरांनी डेक्‍सामेथॅसोन हे कॉर्टिको-स्टिरॉइडवर्गीय आणि तुलनेने स्वस्त असलेले औषध वापरलेय. ते ‘रामबाण’ नाही. ते इतर व्याधींसाठीही वापरात आहे. रुग्ण गंभीर अवस्थेत असेल तरच डेक्‍सामेथॅसोन वापरावे, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. विषाणूरोधक रसायने ‘कोविड-१९’साठी उपयुक्त ठरतील म्हणून प्रयत्न केले जात आहेत. फ्ल्यूसाठी उपयुक्त असलेले फ्लॅविपिरॅविर (फॅबिफ्ल्यू) औषध वापरून रशियात बरेच रुग्ण बचावले आहेत. तथापि अपवादात्मक परिस्थितीत ते वापरण्याचे आदेश आहेत. 

जगातील हजारो रुग्णालयांमध्ये ‘कोरोना’ रुग्णांवर विविध औषधोपचार करून त्यांना बरे करण्याचा प्रयत्न होतोय. त्याचे यशापयश शास्त्रोक्त पद्धतीने तपासण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ‘सॉलिडॅरिटी’ नामक मोहीम सुरू केली आहे. ही आंतरराष्ट्रीय व्यापक चाचणी आहे. यातून मिळालेल्या माहितीची ‘सॉलिडॅरिटी’मार्फत चिकित्सकपणे छाननी होईल. मग योग्य त्या पद्धतीने ‘कोरोना’साठी औषधोपचार होईल. पण तोपर्यंत सर्वसामान्य लोकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा? त्यासाठी जाणकारांनी उत्तम उपाय सुचवले आहेत. मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, हात-पाय-तोंड वारंवार धुणे, प्रत्यक्ष संपर्क टाळणे वगैरे. ‘कोरोना’चा धोका टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला गेलाय, तो म्हणजे व्हिटॅमिन ‘डी ३’चा!  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग कोणाला होऊ शकतो? कोणाच्या बाबतीत तो गंभीर किंवा प्राणघातक स्वरूप धारण करतो? या प्रश्नांसंबंधी काही संशोधकांनी माहिती गोळा केली आहे. तेव्हा विषाणूंचा संसर्ग झाल्यास रुग्णाला जीवनसत्त्व ‘डी ३’मुळे बऱ्यापैकी संरक्षण मिळते, असे त्यांच्या लक्षात आले. अमेरिका आणि युरोपमधील इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंडमधील वयस्कर रुग्णांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी ३’चे प्रमाण खूपच कमी होते. त्यातील बरेच रुग्ण दगावले. उत्तरेकडील युरोपीयन देशांतील रुग्णांमध्ये योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ‘डी ३’ होते. तेथे प्राणहानी तुलनात्मक कमी झाली. श्‍वसनसंस्थेचे कार्य चांगले चालण्यासाठी व्हिटॅमिन ‘डी ३’चे कार्य महत्त्वाचे आहे. तसेच रुग्णांच्या प्रतिकारशक्तीला सकारात्मक प्रतिसाद व्हिटॅमिन ‘डी ३’कडून मिळतो. प्रतिकारशक्तीशी संबंधित (सायटोकाईनवर्गीय) प्रथिने कधी कधी वाजवीपेक्षा अधिक सक्रिय होतात. याला ‘सायटोकाईन स्टॉर्म’ म्हणतात. या परिस्थितीत विषाणूवरील चालू असलेल्या हल्ल्यामध्ये अडथळा निर्माण करते. अशा प्रसंगी व्हिटॅमिन ‘डी ३’ची योग्य मात्रा शरीरात असेल तो अडथळा दूर व्हायला मदत होते. सूर्याच्या प्रकाशात २८० ते ३२० नॅनोमीटर लांबीच्या अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेवरील पेशींमध्ये असलेल्या डी-हायड्रोकोलेस्टेरॉलचे रूपांतर व्हिटॅमिन ‘डी ३’(कोलेकॅल्सिफेरॉल)मध्ये होते. तेव्हा १०-१५ मिनिटे सूर्यस्नान घेणे उपयुक्त आहे. आपण डोळसपणे आहारात दूध, चीज, संत्री, अनेक प्रकारची धान्ये, ओट, मशरुम्स, अंडी यांचा समावेश केला पाहिजे. त्यात जीवनसत्त्व ‘ड’ आहे. म्हणूनच ‘कोरोना’च्या संकट काळात विषाणूचा बीमोड करण्यासाठी ‘ड’चा डंका सध्या जोरात पिटला जातोय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Anil Lachke article about vitamin-D