सर्च-रिसर्च : शुक्रावरील फॉस्फाईनचे गूढ

डॉ. अनिल लचके
Friday, 9 October 2020

आपल्याला शुक्र ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर, तर कधी संध्याकाळी पश्‍चिम क्षितिजावर दिसतो. तो ठळक आणि तेजस्वी असल्यामुळे नजरेस सहज दिसून येतो. पृथ्वीप्रमाणेच शुक्राचा पृष्ठभाग घन आणि खडकाळ आहे. शुक्र साधारण पृथ्वीएवढा आहे, पण त्याचा व्यास ६६० किलोमीटरने लहान आहे. स्वतःच्या आसाभोवती एकदा फिरण्यासाठी शुक्राला २४३ दिवस लागतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला शुक्राला २२५ दिवस आणि पृथ्वीला ३६५ दिवस लागतात.

आपल्याला शुक्र ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर, तर कधी संध्याकाळी पश्‍चिम क्षितिजावर दिसतो. तो ठळक आणि तेजस्वी असल्यामुळे नजरेस सहज दिसून येतो. पृथ्वीप्रमाणेच शुक्राचा पृष्ठभाग घन आणि खडकाळ आहे. शुक्र साधारण पृथ्वीएवढा आहे, पण त्याचा व्यास ६६० किलोमीटरने लहान आहे. स्वतःच्या आसाभोवती एकदा फिरण्यासाठी शुक्राला २४३ दिवस लागतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला शुक्राला २२५ दिवस आणि पृथ्वीला ३६५ दिवस लागतात. याचा अर्थ शुक्रावरील वर्ष लहान आहे आणि दिवस मात्र मोठा आहे. शुक्राच्या सूर्याकडील बाजूचे सरासरी तापमान ४६२ अंश सेल्सिअस असते. शुक्रापेक्षाही बुध ग्रह सूर्याला जवळ असून बुधाच्या पृष्ठभागावरील तापमान ४०० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. सौरमालेतील कोणत्याही ग्रहावर एवढे जास्त तापमान नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फॉस्फाईन वायूचे अस्तित्व
शुक्रावर मंद वारा नाही! उलट सर्वात जास्त वारा वाहणारा ग्रह म्हणजे शुक्र आहे. शुक्राच्या उंचीवरील वातावरणात ताशी साडेसातशे कि. मी. वेगाने वारे वाहतात. शुक्राच्या वातावरणात बहुतांशी कार्बन डायॉक्‍साईड असून अत्यल्प नायट्रोजन आहे. तेथे कार्बन आणि सल्फर डायॉक्‍साईड, सल्फ्युरिक आम्ल असल्यामुळे त्याचे ५० ते ८० कि.मी. उंचीवर जाड ढग तयार झाले आहेत. त्यावर पडलेला ६० टक्के सूर्यप्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे शुक्र ग्रह तेजस्वी दिसतो. शुक्रावर वातावरणाचा दाब पृथ्वीपेक्षा ९२ पट जास्ती आहे.

अशा अतिदाट वातावरणात उल्का किंवा अशनीपात झाला तर वातावरणात शिरताक्षणीच त्याच्या ठिकऱ्या उडतात. त्यामुळे शुक्रावर मोठी विवरे दिसून आलेली नाहीत. पृष्ठभागावरचे तापमान तर शिसे किंवा कथिल  वितळेल एवढे गरम आहे! सत्तर कोटी वर्षांपूर्वी शुक्रावर जीवसृष्टीला अनुकूल वातावरण होते.

आता मात्र अत्यंत प्रतिकूल आहे. तरीही शुक्राचा जीवसृष्टीशी संबंध आहे काय, म्हणून संशोधन होत आहे. आंतरराष्ट्रीय खगोल संशोधक शुक्राचे वर्णपटामार्फत  निरीक्षण करताना त्यांना फॉस्फाईन वायूचे अस्तित्व जाणवले. तीन हायड्रोजन आणि एक फॉस्फरसच्या अणूने तयार झालेल्या या वायूला उग्र वास येतो आणि तो विषारी आहे. शुक्रावरील ढगांच्या सान्निध्यात किंवा बाह्यभागात असलेल्या फॉस्फाईनमुळे संशोधक चक्रावून गेले आहेत.  

‘व्हेरिटास’चे संशोधन         
‘नासा’ संस्थेचा ‘व्हेरिटास’ नामक एक प्रकल्प आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वीचा आणि आजचा शुक्र यात काही बदल झाला आहे काय, तिथे पाणी आहे काय, पृष्ठभाग कसा असेल, तिथे कोणती रसायने असतील - अशा समस्यांवर ‘व्हेरिटास’चे संशोधक काम करतात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शुक्र-भूमीचे नकाशे करणे, हेही या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. पृथ्वीवर फॉस्फाईन वायूची निर्मिती सूक्ष्मजीव करतात. त्याप्रमाणे काही विलक्षण जीवाणू शुक्रावरदेखील कदाचित अतिसूक्ष्म प्रमाणात फॉस्फाईनची निर्मिती करत असतील. यावर परिसंवाद करण्यासाठी देशोदेशीचे खगोल(जीव)शास्त्रज्ञ एकत्र आले होते.

शुक्रावरील वातावरण, ढग, प्रकाश, जमीन, ज्वालामुखी, उल्का आणि अशनीपात या सगळ्यांचा अभ्यास करूनही फॉस्फाईन वायू तेथे अजैविक पद्धतीने कसा तयार झालाय, ही समस्या संशोधकांना भंडावून सोडत आहे. हे कोडे सोडवण्यासाठी शुक्रावरील फोटोकेमिस्ट्री, जिओकेमिस्ट्रीचा देखील त्यांनी आधार घेतला होता. ढग विशिष्ट उंचीवर असताना, विशिष्ट अक्षांशावर, काहीशा कमी तापमानात उष्मागतिकीच्या सिद्धांतानुसार जैविक पद्धतीने फॉस्फाईन तयार होणे शक्‍य आहे, असे लक्षात आले. याचा अर्थ कदाचित तेथे सूक्ष्मजीव फॉस्फाईन तयार करत असावेत किंवा काही अज्ञात रासायनिक प्रक्रिया घडत असाव्यात. यासाठी जैविक पद्धतीने फॉस्फाईन कसे तयार झाले असावे, त्याचे संशोधन करायला बराच वाव आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dr anil lachake