सर्च-रिसर्च : रोगप्रतिकाराला कृत्रिम बळ

Health-Dicease
Health-Dicease

कोणत्याही रोगाचा सामना करावयाचा असेल, अगर कोणत्याही शारीरिक व्यवस्थेतील बिघाडाला तोंड द्यायचे असेल, तर औषधाची गरज भासतेच. पण रोग व्हायच्या अगोदरच काळजी घेतली, तर बहुतेक वेळी तो टाळता येणे शक्‍य असते. जशी आपण बाहेरून ही काळजी घेतो तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी आपल्या शरीराला असते. खरे सांगायचे तर आपल्या शरीरात कायमस्वरूपी अशी यंत्रणा असते आणि बाहेरून येणाऱ्या शत्रूपासून वाचवण्यासाठी ती सतत तयार असते.

एखादा जंतू किंवा पदार्थ आपल्या शरीरात आला, तर त्याला ताबडतोब पळवून लावणारी ही यंत्रणा म्हणजेच आपली इम्यून सिस्टिम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती. ही ताकद प्रत्येक माणसागणिक वेगवेगळी असते. वय, हवामान, परिसर, आपल्या सवयी, आनुवंशिकता अशा अनेक घटकांवर ती अवलंबून असते. पण ही रोगप्रतिकाराची ताकद आता कृत्रिमरीत्या वाढवण्याचा पहिला यशस्वी प्रयोग शांघाय विद्यापीठातील प्रा. यीन आणि प्रा. ये यांनी 
केला आहे.

आपल्या शरीराच्या संरक्षण दलात मुख्यत: तीन प्रकारच्या पेशी असतात. (D, T, B). त्यातील डेन्ट्रायटिस सेल (डी) प्रथम आरोळी देऊन जंतूचा जो भाग त्रासदायक असतो त्या अँटिजेनला चिकटून बसतात आणि आपल्या पेशीच्या पृष्ठभागावर आणतात. त्यामुळे ‘टी’ सेलना संदेश मिळतो आणि त्या शत्रूला ठार करतात. त्याची लागण झालेल्या पेशींचाही नाश करतात. ‘बी’ सेलही अशा प्रकारच्या नाश क्रियेत भाग घेतातच; पण शत्रू परत आला तर तयार असावे म्हणून आवश्‍यक त्या प्रतिजैव किंवा प्रतिप्रथिन (अँटिबॉडी) तयार करून संरक्षणसिद्धता ठेवतात.

या नैसर्गिक सिद्धतेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रा. यीन यांनी डीएनए -सुवर्ण नॅनोकणयुक्‍त नवीन व्यवस्था (सिस्टिम) प्रयोगशाळेत तयार केली आहे. नैसर्गिक तिन्ही सेलचे काम करण्यासाठी यातही तीन (D, T, B) यंत्रणा असून त्यामधे सुवर्ण नॅनोकणाच्या पृष्ठभागावर विवक्षित डीएनए किंवा डीएनएचा छोटा लूप लावलेला आहे.

समजा एचआयव्ही-डीएनएने शरीरात प्रवेश केला, तर तिन्ही नॅनो यंत्रणा कार्यरत होतात आणि योग्य तो समन्वय राखून त्याचा नाश करतात. बावीस तासांत जवळजवळ ९३ टक्के एचआयव्हीचा नाश होतो आणि त्यानंतरही तो शत्रू परत आला तर दुप्पट वेगाने त्याचा नाश पुढच्या दहा तासांतच होतो. कारण आता ही त्रियंत्रणा सुसज्ज झालेली असते. ही यंत्रणा किती स्वनियंत्रित आणि समन्वयित असते ते आता पाहू.

येणारा एचआयव्ही-डीएनए प्रथमच अडकतो तो ‘डी’ यंत्रणेच्या लूपमध्ये आणि त्यातून सुवर्णकण-डीएनए मोकळा होतो. त्यामुळे ‘टी’ यंत्रणा कार्यान्वित होते आणि आणखी एका डीएनए संदेशाने ‘बी’ यंत्रणा चालू करते. ‘बी’ यंत्रणा जंतूरोधक प्रकारचा ‘डीएनए’ एचआयव्हीवर सोडून त्याला कायमचा निष्प्रभ करून टाकतो. परत तो एचआयव्ही आलाच तर आता तो आता थेट ‘बी’- मशीनच्या अँटिजेनलाच चिकटतो आणि मरतो.

आता त्याला त्रियंत्राची गरज नसल्याने ही प्रक्रिया जलद चालते आणि एचआयव्हीचा नाश पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने होतो. नॅनो सुवर्णकण-डीएनएच्या रचनेत फरक करून कर्करोगाच्या डीएनएचा नाश केला जातो; किंबहुना कोणत्याही रोगाचा अगर शारीरिक बिघाडाचा नेमका हानिकारक डीएनए असेल, तर त्यानुसार त्रियंत्राची रचना बदलून त्याचा बंदोबस्त करता येईल. यासाठी आवश्‍यकता आहे, सुनियंत्रित समन्वयाची आणि तो कृत्रिम बुद्धिमतेच्या साह्याने संगणकाद्वारे करणे फार कठीण नाही. कारण यात माहिती ग्रहण, माहिती संकलन / प्रक्रिया आणि अंतिम परिणाम या संगणकाला आवश्‍यक असलेत्या घटकांचा यात समावेश आहे. त्यामुळे आवश्‍यक नॅनो यंत्रमानवही लवकरच हे काम करू शकेल. नॅनो सुवर्णकण शरीरास अपायकारक नसल्याने भावी काळात या यंत्रणेचा उपयोग करून कोणत्याही रोगात औषधे नेमक्‍या लक्ष्यावर ठराविक वेळा पाठवता येतील आणि अवयवबदल प्रक्रिया सुलभ होईल. सध्या उपचार नसलेल्या अनेक रोगांवरही मात करता येईल. त्या मार्गावरील हे पहिले पाऊल वरदान ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com