सर्च-रिसर्च : भाषांच्या लिपींना नवसंजीवनी

महेश बर्दापूरकर
Thursday, 30 January 2020

जगभरात सहा ते सात हजार भाषा आहेत आणि त्यातील अनेक भाषांना स्वतःची लिपीही आहे. मात्र, अनेक भाषांच्या लिपी लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे नवे संशोधन सांगते.

जगभरात सहा ते सात हजार भाषा आहेत आणि त्यातील अनेक भाषांना स्वतःची लिपीही आहे. मात्र, अनेक भाषांच्या लिपी लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे नवे संशोधन सांगते. मनुष्य बोलत असलेल्या भाषांतील शब्दांबरोबरच त्यांच्या लिपींच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका संशोधकांना अधिक गंभीर वाटतो. कोणतीही भाषा लुप्त होताना आपण केवळ तिच्या बोली रूपाचाच विचार करतो. मात्र, वर्णाक्षरे ती भाषा कोणत्या संस्कृतीच्या माध्यमातून उदयास आली हे सांगतात. त्यामुळे वर्णाक्षरांचे लुप्त होणे हे संस्कृतींचा इतिहास लुप्त होण्यासारखे असल्याने त्याबद्दल अधिक चिंता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘युनेस्को’ने २०१९ हे ‘स्वदेशी भाषांचे वर्ष’ म्हणून जाहीर केले होते. संस्थेने जगभरात स्वदेशी भाषांचे संवर्धन, पुनरुत्थान व प्रचारावर भर द्यावा, असे आवाहनही केले होते. मात्र, सर्वत्र बोली भाषांवरच भर दिला गेला व विविध संस्कृतीमध्ये भाषा लिहिण्याच्या पद्धती कशा आहेत, याकडे डोळेझाक केली गेली. भाषेचे ज्ञान मनुष्याला जन्मजातच मिळते, मात्र लिपींचा शोध घ्यावा लागतो आणि त्या प्रयत्नपूर्वक शिकाव्याही लागतात. मात्र, लिपी शिकण्याकडे दुर्लक्ष होत राहिले व १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत जगातील केवळ दहा टक्के लोकांना लिहिता येत होते. सध्या जगात जेमतेम १४० भाषांना स्वतःच्या लिपी आहेत व त्यातील तब्बल ८५ टक्के लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. वर्णाक्षरांच्या प्रकल्पावर काम करणारे संशोधक टीम ब्रुक्‍स यांच्या मते, ‘‘मानवाने लिखित भाषेपेक्षा बोली भाषेलाच अधिक महत्त्व दिले. लिहिणे हे भाषेचे अपघातातून जन्माला आलेले अपत्य आहे, असेच मत पहिल्यापासून बनविले गेले. बोलीभाषांचा अभ्यास हाच खरा भाषांचा अभ्यास असल्याचाही समज करून दिला गेला.’’ याच विषयावर संशोधन करणाऱ्या शीना शहा यांच्या मते, ‘‘लुप्त होणाऱ्या भाषांप्रमाणेच लुप्त होणारी वर्णाक्षरे व लिपी यांबद्दल लोकांना पुरेशा गांभीर्याने सांगण्यातच आलेले नाही.’’ वर्णाक्षरे ही भाषेपेक्षा संस्कृतीबद्दल अधिक भाष्य करतात. त्यांचे स्वरूपच त्या काळाचे वर्णन करते. उदा. दगडावर कोरलेली व खालच्या बाजूला ओढलेली ‘रुनिक’ भाषेतील अक्षरे स्कॅन्डेनेव्हिअन देशांतील अनागोंदीचे वर्णन करतात, तर गुंतागुंतीचे स्वरूप असलेली चिनी भाषा केवळ कागदाचा उदय झाल्यावर बहरली. लिपी संदेशवहनाचे काम करीत नव्हत्या, तर त्यांनी त्या वापरणाऱ्यांच्या जीवनमूल्यांतही स्थान मिळवले. काही ठिकाणी ते धर्मग्रंथ आणि पोथ्यांच्या स्वरूपात होते. मात्र, नंतरच्या काळात राष्ट्रीयत्वाच्या प्रश्‍नावरून सरकारांनी नागरिकांवर भाषा लादल्या व त्यांच्या मूळ भाषा अस्तंगत झाल्याचीही उदाहरणे आहेत. उदा. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर तेथील राज्यकर्त्यांनी बंगाली भाषा निवडली व तेथील ‘मारमा’ ही भाषा हळहळू अस्तंगत होत गेली. माउंग नायू हे ‘मारमा’चे अभ्यासक ही भाषा पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे ही भाषा शिकण्यासाठी केवळ पाच मुले येत होती, ही संख्या आता तीन हजारांवर गेली आहे. मातृभाषा शिकल्यामुळे तेथील शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाणही वेगाने घटले आहे. 

मातृभाषेत शिकल्यास विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजतात, हेच नवे संशोधन सांगते. ब्रुक्‍स यांच्या मते, ‘‘आपल्या भाषेच्या लुप्त होत चाललेल्या लिपींना नवसंजीवनी देण्यासाठी अनेक भाषातज्ज्ञ कामाला लागले आहेत. या लिपींचे डिजिटायझेशन केल्यास अरेबिक किंवा लॅटिनसारख्या इतर लिपींचा प्रभाव कमी करता येईल. लुप्त होणाऱ्या या वर्णाक्षरांचा अर्थ समजायला नव्या पिढीला अवघड गेले, तरी त्यांच्यातील नावीन्य व सुबक मांडणी त्यांना आकर्षित करीत राहील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial article Language scripts