सर्च-रिसर्च : स्मरण कल्पनेशी थांबे...

Women
Women

कोरोनाकाळात लोकांशी असलेला संपर्क, गेट टुगेदर यांचे प्रमाण कमी झाल्याने लोक एकाकी पडले असून, त्यांच्यातील नैराश्‍यात दुप्पट वाढ झाल्याचे ब्रिटनमधील ‘ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्‍स’च्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्याचबरोबर भविष्याच्या चिंतेतून लोकांच्या स्मरणशक्तीवर मोठा परिणाम झाल्याचेही समोर आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउननंतरच्या काळात तुम्ही एखादा ‘ई-मेल’ पुढे पाठवण्यास विसरत असल्यास, एखादा शब्दच आठवत नसल्यास किंवा दुकानात गेल्यावर नक्की काय आणायचे, याचा गोंधळ उडाल्यास हा त्रास होणारे तुम्ही एकटे नाहीत, हे लक्षात घ्या. हा परिणाम तुम्हाला समाजापासून दूर, एकटे राहावे लागल्याचा आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’तील संशोधकांनी एकटेपणामुळे स्मरणशक्तीवर होणाऱ्या परिणामांवर अभ्यास सुरू केला आहे. त्यांच्या मते, ‘पूर्वी खूप चांगली स्मरणशक्ती असलेले लोक आता छोट्या-छोट्या गोष्टी विसरू लागले आहेत. लोकांत मिसळण्यावर आलेल्या मर्यादांमुळे मेंदूवर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत असून, याचा सर्वाधिक फटका आधीच स्मरणशक्तीच्या समस्या असलेल्यांना अधिक बसत आहे.

‘न्यू नॉर्मल’मध्ये लोकांच्या भेटीगाठी वाढल्या असल्या, तरी ऑफिसमध्ये कुलरसमोर उभे राहून मारलेल्या गप्पा, रात्रीच्या पार्टीत एकावेळी अनेकांशी गप्पा किंवा मी सध्या काय करतो आहे याचे केलेले सविस्तर वर्णन बंद आहेत. एकच गोष्ट अनेकांना अनेकदा सांगितल्याने आपल्या आठवणी एकत्र होत राहतात, याला ‘एपिसोडिक मेमरीज’ असे म्हणतात. व्यक्ती समाजात न मिसळल्यास या आठवणी धूसर होतात. बाहेर फिरणे बंद झाल्याने, विवाह, सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडल्याने लोकांकडे बोलण्यासाठी कमी गोष्टी आहेत. लोक ऑनलाइन चॅटिंगच्या माध्यमातून ही कमतरता भरून काढत आहेत. मात्र, त्यांना थेट संवादाची सर नाही. या संवादात तुम्ही वरवरच्या गोष्टी रंगवून सांगण्यातच धन्यता मानता.’ 

लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज येथील मानसजीवशास्त्रज्ञ डेझी फॅनकोर्ट त्यांच्या मते, ‘‘लॉकडाउनच्या काळात जाणवणारी चिंता कमी झाली असली, तरी तिचे प्रमाण तरुण, एकटे राहणारे, मुलांबरोबर राहणारे, कमी उत्पन्न गट व शहरांतील लोकांत सामान्य स्थितीपेक्षा अधिकच आहे. याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर झाला आहे. तुम्ही फिरायला गेल्यास प्रवास, बदलणारा निसर्ग, भेटलेले लोक, यांमुळे तो दिवस वेगळा लक्षात राहतो व आठवणी तयार होतात. मात्र, तुम्ही घरातून काम करता, तेव्हा प्रत्येक ऑनलाइन मीटिंग एकसारखीच वाटते; कारण तुम्ही एकाच जागी व एकाच स्क्रीनसमोर बसता. त्यामुळे वेगळ्या करता येण्याजोग्या आठवणी तयार होत नाहीत. वेस्टमिनिस्टर विद्यापीठातील संशोधिका कॅथरिन लव्हरडे यांच्या मते, ‘सर्वच दिवस एकसारखे असतात.

थकवा, चिंता, एकसारखेच दिवस व समाजात मिसळणे कमी झाल्याने आपल्यापैकी काहींना स्मरणशक्तीची समस्या नक्कीच जाणवत असणार. तुम्ही घराबाहेर पडल्यावर पुन्हा घरी येईपर्यंत मेंदूमधील हिपोकॅम्पस या भागाचा वापर करीत असता. घरातून काम करणाऱ्यांनी अनोळखी रस्त्यांवरून फिरायला जाण्यासारख्या गोष्टी केल्यास हा भाग वापरात येईल. त्याचप्रमाणे सतत जागा बदलणे, घरात वेगवेगळ्या जागांवरून फोनकॉल्स घेणे, वीकएण्ड वेगळ्या पद्धतीने साजरे करणे, या गोष्टींनी फरक पडेल.’ थोडक्‍यात, कोरोना जगण्याचे वेगळे नियम घालून देणार असून, आपण त्यासाठीची तयारी सुरू करायला हवी.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com