सर्च-रिसर्च : उंची ठरविणारी जनुके

जयंत गाडगीळ
Thursday, 26 November 2020

जनुके माणसांच्या शरीराचे गुणधर्म ठरवतात. अगदी अलीकडे चालू असलेल्या अभ्यासावर एक शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे, तो जनुके आणि ते ठरवीत असणारे गुणधर्म, याबद्दल समजून घेण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठणारा अभ्यास आहे. अनेक देशांतील सुमारे ३२ संशोधक आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे संशोधन झाले आहे.

जनुके माणसांच्या शरीराचे गुणधर्म ठरवतात. अगदी अलीकडे चालू असलेल्या अभ्यासावर एक शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे, तो जनुके आणि ते ठरवीत असणारे गुणधर्म, याबद्दल समजून घेण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठणारा अभ्यास आहे. अनेक देशांतील सुमारे ३२ संशोधक आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे संशोधन झाले आहे. आपण असे मानतो, की गुणधर्म नियंत्रित करणारे एक जनुक असते. आईकडून एक व वडिलांकडून एक जनुक येऊन आपला तो तो गुणधर्म, उदा. घारे डोळे, कुरळे केस असे गुण अपत्यात कसे येतात. तसेच, नैसर्गिकरीत्या किती प्रमाणात गुण येतात आणि संगोपनातून कोणते गुण येतात, याच्याबद्दलही गेल्या काही वर्षांत माहिती झालेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता तर काय संपूर्ण मानवी जनुकांचा क्रम व जनुकांची यादी जिनोम प्रकल्पामुळे जगाला माहिती झाली आहे. माणसाच्या शरीरातील कोणता दोष किंवा विकार-आजार कोणत्या जनुकामुळे होतो, हे शोधणे व ते जनुक बदलून टाकणे व हवा असलेला गुणधर्म असणारे जनुक त्या जागी ठेवणे, एवढेच काम बाकी आहे, अशी काही लोकांची समजूत झाली आहे. असे जनुकांवर नियंत्रण मिळवणेच बाकी आहे, असे वाटून भाज्या, शेतीमाल, वगैरे हवा तसा तयार करता येईल मानणाऱ्या सर्वांना जमिनीवर आणणारे असे हे संशोधन आहे.

चाळीस लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास
बालपणी पुरेसे पोषण मिळाले, की काही प्रमाणात उंची वाढवता येते, हे गेल्या पन्नास वर्षांत प्रगत झालेल्या अनेक देशांमध्ये सिद्ध झाले आहे. तरी बराचसा (म्हणजे किती वाटा) जनुकांचा असतो, हे शोधण्यासाठी युरोपातील संशोधकांनी काम केले. आजपर्यंतचा सर्वांत जास्त लोकांचा म्हणजे ४० लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास करून त्यांनी जनुकांवरील सुमारे दहा हजार जागा शोधून काढल्या. त्यांचे उंचीवर नियंत्रण असते. मात्र, ते विशिष्ट जनुक अजून पूर्ण ओळखता आलेले नाही. हा अभ्यास सुरू झाला त्याला दोन दशके होत आली. तेव्हा पहिल्या ४० जागा अशा होत्या, की त्यांचा उंची नियंत्रित करण्यात फक्त पाच टक्के वाटा होता. पीटर विशेर या ब्रिस्बेनमधील संशोधकाला अशी आशा होती, की सुमारे ४० ते ५० टक्के नियंत्रण असणाऱ्या जागा शोधता येतील.

मात्र, जास्त अचूक आणि जास्त प्रमाणावर नियंत्रण करणाऱ्या जागा कोणत्या हे शोधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची पाहणी आणि अभ्यास करावा लागेल, हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी आणि त्यांच्या सहसंशोधकांनी सात लाख लोकांच्या डीएनएचा अभ्यास २०१८पर्यंत केला. तेव्हा उंचीमध्ये सुमारे २५ टक्के बदल करणारे किंवा नियंत्रण करणारे डीएनए किंवा जनुकांवरील जागा त्यांच्या लक्षात आल्या. मग अजून चाळीसेक लाख लोकांच्या डीएनएचा अभ्यास करून त्यांनी अजून काही उंचीचे नियंत्रण करणाऱ्या जागा शोधल्या. एकसारख्या जुळ्यांच्या अभ्यासात असे लक्षात आले, की उंचीचे नियंत्रण करण्यात ८० टक्के वाटा जनुकांचा असतो. त्यादृष्टीने अजून खूप अभ्यास व संशोधन करण्यात हे संशोधक मग्न आहेत. 

 शंभर व्यक्तींमध्ये केवळ एकाच व्यक्तीत आढळणाऱ्या गुणधर्मांचा अभ्यास करायचे या संशोधकांनी ठरविले. म्हणून उंची आणि ‘बीएमआय’ (बॉडी मास इंडेक्‍स) यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्याकरिता युरोपातील २१ हजार माणसांचा संपूर्ण जनुकांच्या क्रमाचा त्यांनी अभ्यास केला. या लोकांचे एकमेकांशी कोणतेही नातेसंबंध नव्हते. यावरून माणसाच्या उंचीवर नियंत्रण करणाऱ्या जनुकांवरील जागांचा अभ्यास करणे खूप गुंतागुंतीचे आहे, असे लक्षात आले. या साऱ्या संशोधनात केवळ युरोपातील गोऱ्या वंशातील लोकांचा अभ्यास सुरू होता. पण, अजून अशा अनेक वंशांचा अभ्यास बाकी आहे. क्षितिज गाठले, असे वाटत असतानाच पुन्हा नवी क्षितिजे दिसावीत तसे आता झाले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial Article write jayant gadgil on genes