पर्यावरण : लक्ष्य हरित पर्यटनाचे

योगिराज प्रभुणे
Friday, 7 February 2020

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या गेल्या दशकात झपाट्याने वाढली आहे. ‘इंटरनॅशनल ट्रान्स्पोर्ट फोरम’ (आयटीएफ) आणि ‘वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन’ (डब्ल्यूटीओ) यांच्या अहवालाचा निष्कर्ष या निरीक्षणाशी मिळताजुळता आहे. पर्यटनातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतो, व्यवसायवृद्धी होते.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या गेल्या दशकात झपाट्याने वाढली आहे. ‘इंटरनॅशनल ट्रान्स्पोर्ट फोरम’ (आयटीएफ) आणि ‘वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन’ (डब्ल्यूटीओ) यांच्या अहवालाचा निष्कर्ष या निरीक्षणाशी मिळताजुळता आहे. पर्यटनातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतो, व्यवसायवृद्धी होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थव्यवस्थेला चालना मिळते. जगभरातील दहा टक्के रोजगारनिर्मिती ही फक्त पर्यटनामुळे झाली आहे. जागतिक देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) दहा टक्के वाटा पर्यटनाचा आहे. देशांतर्गत पर्यटनात मराठी माणसे आघाडीवर आहेतच; पण वेगवेगळे देश बघण्यातही मराठी टक्का सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रातून पूर्वी परदेशी पर्यटन म्हणजे मलेशिया, सिंगापूर, भूतान इथपर्यंतच मर्यादित होते. पण, गेल्या दहा वर्षांत युरोप आणि आखाती देशांकडे पर्यटनाचा कल वाढल्याचे दिसते. आता पुढील दहा वर्षांत युरोपला मागे टाकून दक्षिण आफ्रिकेसारख्या ‘ऑफबीट डेस्टिनेशन’कडे मराठी मन आकर्षित होईल. याला मुख्य कारण म्हणजे मध्यम वर्गाच्या आवाक्‍यात आलेला विमानप्रवास, दळणवळणाची वाढलेली साधने, त्यासाठी विकसित झालेल्या पायाभूत सुविधा, नवीन तंत्रज्ञानातून पर्यटकांसाठी सहज उपलब्ध झालेले सुलभ पर्याय, आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी सहजपणे मिळणारा व्हिसा, या सगळ्यांतून पर्यटन क्षेत्राच्या विकासाची गती प्रचंड वाढली. पंधरा वर्षांपूर्वी जगभरात पर्यटकांची संख्या ७७ कोटी होती. पुढे २०१५ पर्यंत ही संख्या एक अब्जाहून जास्त झाली. पुढच्या दशकभरात १.८ अब्जापर्यंत आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढेल, असा ‘आयटीएफ’चा अंदाज आहे.

पर्यटन म्हटले, की प्रवास आलाच. परदेशी जाण्यासाठी बऱ्याचदा विमानप्रवास अपरिहार्य असतो. आपल्याकडे नव्याने विमानतळ विकसित होत आहेत. असलेल्या विमानतळांवरून दिवस-रात्र विमानांची उड्डाणे सुरू आहेत. विमान प्रवाशांमध्ये पर्यटकांची संख्या मोठी आहे. भारताप्रमाणेच जगभरात पर्यटनाचा हाच कल दिसतो. विमानापाठोपाठ स्थानिक पर्यटनासाठी मोटार वापरण्यावर पर्यटकांचा भर असतो.

देशांतर्गत प्रवासासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी रेल्वेला असलेले प्राधान्य मागे पडले. आता विमानप्रवासाला प्राधान्य दिले जाते. पर्यटनस्थळी जाण्यासाठी स्थानिक बससेवेऐवजी आता मोटार वापरण्याकडे पर्यटकांचा कल आहे. या सर्वांतून कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जनाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण आहे. पर्यटनामुळे होणारे प्रदूषण हा आता आणखी एक काळजीचा विषय होत आहे. मानवामुळे होणाऱ्या कार्बन डायऑक्‍साइडच्या उत्सर्जनात पाच टक्के वाटा हा पर्यटनाचा असल्याचे समोर आले आहे. त्यात विमानप्रवासामुळे ४० टक्के, मोटारींमुळे ३२ टक्के, तर तीन टक्के इतर वाहतुकीच्या माध्यमातून कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जित होतो. पर्यटनस्थळी मुक्काम करण्याचे प्रमाण वाढत असल्याने २१ टक्के, तर इतर कारणांमुळे चार टक्के कार्बन डायऑक्‍साइड हवेत सोडला जातो. त्यामुळे पर्यटनामुळे होणारे कार्बन डायऑक्‍साइडचे उत्सर्जन हा नजीकच्या भविष्यातील चिंतेचा विषय ठरणार असल्याचे स्पष्ट मत ‘आयटीएफ’ने आपल्या अहवालात नोंदविले आहे.

हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशात सर्वत्र पर्यटन होत आहे. पर्यटनाची नवी ‘डेस्टिनेशन’ पुढे येत आहेत. पर्यटन आणि वाहतूक यांची फारकत करता येणे शक्‍य नाही. पर्यटनासाठी रात्रंदिवस रस्त्यांवर धूर ओकत फिरणाऱ्या वाहनांना आता पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः विकसित देशांमध्ये याबाबत ठोस पावले उचलण्यात आली आहेत. तेथे पर्यावरणपूरक पर्यटन ही संकल्पना रुजविण्यात येत आहे. त्यासाठी अत्यल्प कार्बन उत्सर्जन करणारे वेगळे मार्ग आहेत. आपल्या देशातही त्यादृष्टीने विचार झाला पाहिजे. पर्यटन हवेच; पण ते पर्यावरणपूरक हवे, असा आग्रह प्रत्येक पर्यटकाने धरण्याची वेळ आता आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article yogiraj prabhune