सर्च- रिसर्च  :  एका माशाचा मृत्यू 

जयंत गाडगीळ
Thursday, 23 July 2020

"स्मूथ हॅंडफिश' या जातीचे मासे समुद्रात संथ ठिकाणी असत. त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या प्रजननपद्धतीमुळे त्यांना त्यांची जागा सोडून इतरत्र वावरता येत नसे. हे खोल समुद्रात तळाशी राहाणारे मासे होते.

मार्च 2020मध्ये जेव्हा जग "कोरोना'शी सामना करण्याच्या गदारोळात होते, तेव्हा एका माशाचा मृत्यू जाहीर झाला. टास्मानियाच्या समुद्रकिनाऱ्याच्या तळाशी असणारा "स्मूथ हॅंडफिश' हा "सिम्टेरिश्‍टिस युनीपेनीस' अशा शास्त्रीय नावाच्या माशातील हा शेवटचा ज्ञात मासा होता. हॅंडफिशमध्ये 14 जाती अस्तित्वात होत्या, आता 13 जाती राहिल्या आहेत. 1996मध्ये "स्पॉटेड हॅंडफिश' ही जात धोक्‍यात असलेल्या प्राण्यांच्या यादीत होती. 

"इंटरनॅशनल युनियन फॉर कॉंझर्व्हेशन ऑफ नेचर' (आययूसीएन) ही संस्था धोक्‍यात आलेल्या जिवांची यादी करीत असते. तिला "रेड लिस्ट' असे म्हणतात. "स्मूथ हॅंडफिश' या जातीचे मासे समुद्रात संथ ठिकाणी असत. त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या प्रजननपद्धतीमुळे त्यांना त्यांची जागा सोडून इतरत्र वावरता येत नसे. ते बराच काळ शांत बसल्यावर कोणाचा व्यत्यय आल्यासच उडी मारून किंवा सुळकन जाग बदलत मीटरभर लांब जात असत. एकेकाळी हे मासे इतक्‍या मुबलक प्रमाणावर होते, की ऑस्ट्रेलियाच्या परिसरात सहज सापडत. इतकेच नव्हे, तर फ्रान्स्वा पेरॉं या दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या फ्रेंच संशोधकाने ऑस्ट्रेलियाच्या सागरात शोधलेल्या पहिल्यावहिल्या माशाच्या नमुन्यात याचा समावेश होता. मात्र मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, मोठ्या प्रमाणावर यंत्राने झालेली मासेमारी अशी अनेक कारणे असली, तरी हे मासे कमी होण्याचे नेमके कारण सांगता येत नाही. मात्र गेल्या शंभर वर्षांत अनेक शोधमोहिमांमध्ये हे मासे सापडतात काय, यासाठी अनेक प्रयत्न करूनही हे मासे सापडले नव्हते. त्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय संस्थेने लावलेल्या निकषांप्रमाणे मार्च 2020मध्ये हे मासे संपूर्ण नाश पावले असे जाहीर करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे खोल समुद्रात तळाशी राहाणारे मासे होते. तेथे पाण्याचा दाब त्यांच्यावर खूप जास्त असतो. त्याहून कमी दाब असताना त्यांना जगताच येणार नाही. आणि ती पातळी सोडल्याशिवाय त्यांना जागा बदलता येत नाही. सजीवांच्या नेहमीच्या जगण्यापेक्षा टोकाच्या परिस्थितीत राहाणारे सजीव हे अभ्यासाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाचे असतात. उदा. खूप उंचावर, विरळ हवामानात किंवा अतिथंड किंवा अतिउष्ण हवेत राहाणारे जीव, कमी ऑक्‍सिजनवर जगणारे जीव, अशी काही उदाहरणे देता येतील. अशाच "अतिरेकी' परिस्थितीत राहाणारे असे हे हॅंडफिश होते. त्यांच्या अभ्यासातून आपल्याला अशा सजीवांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारे जगण्याचे मार्ग समजत असतात. मानवाच्या कक्षा रुंदावायला त्याची मदत होत असते. उदा. खूप उंचावर राहाणाऱ्या माणसांच्या व प्राण्यांच्या रक्तात तात्पुरते किंवा कायमचे कोणते बदल होतात, त्याचा अभ्यास करून अशा उंचीवर माणसाला जायची वेळ आली तर काय करायचे, याचे मार्गदर्शन होते. 

औद्योगिकरणानंतरच्या विकासाच्या झपाट्यात अनेक प्राण्यांची संख्या घटली. अनेक सजीव नष्ट झाले. भारतातही चित्ता नामशेष झाला. वाघ आणि हत्ती यांची भारतातील संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यात या माशाच्या नष्ट होण्याचा शोक करायचे कारण काय, असे आपल्याला वाटेल. पण अशी एक सजीवांची जात नष्ट होण्यामुळे जैववैविध्याला धोका पोहोचतो. तरीही विकासासाठी पर्यावरणाला ढळ लागला तरी चालेल असे वाटणारी अनेक माणसे आणि सरकारे आहेत. त्यांना या माशाच्या मृत्यूने एरवी वाईट वाटायचे कारण नव्हते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र या माशाचे वैशिष्ट्य लक्षात घेता त्याच्या नष्ट होण्याने माणसाचे काय नुकसान झाले आहे, हे स्पष्ट होईल. काय होते हे वैशिष्ट्य? या जातीच्या माशामध्ये एक विशिष्ट विकर (एन्झाईम) असते. त्याचा वापर करूनच "कोविड-19'चे निदान करणारी चाचणी करतात. ऐन समरप्रसंगी असे महत्त्वाचे अस्त्र निकामी होऊन चालणार नाही. या माशाच्या इतर जातीही धोक्‍यात आल्या आहेत. त्या वाचविण्यासाठी तरी आटापिटा करायला पाहिजे, असे सांगणारी ही धोक्‍याची घंटा जनतेला काही प्रमाणात तरी ऐकू जायलाच हवी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Gadgil writes article about smooth handfish