अतिसूक्ष्म कणांचा उतारा

राहुल गोखले
Thursday, 16 January 2020

जैववैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी क्षेत्रांत कार्यरत युरोपच्या काही संशोधकांनी आता तांब्याच्या ऑक्‍साईडचे अतिसूक्ष्मकण (नॅनोपार्टिकल्स) कर्करोगावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा दावा केला आहे.

कर्करोगावर उपचारांसाठी सातत्याने संशोधन सुरू असते. त्यातील एक पद्धत म्हणजे इम्युनोथेरपी - म्हणजे रुग्णाची प्रतिकारशक्ती शरीरातच उत्पादन होणाऱ्या किंवा प्रयोगशाळेत उत्पादन केलेल्या पदार्थांच्या साह्याने वृद्धिंगत करून कर्करोगाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य निर्माण करणे. मात्र सर्वच बाबतीत ही उपचारपद्धती यशस्वी होते असे नाही. जैववैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी क्षेत्रांत कार्यरत युरोपच्या काही संशोधकांनी आता तांब्याच्या ऑक्‍साईडचे अतिसूक्ष्मकण (नॅनोपार्टिकल्स) कर्करोगावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा दावा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तोच पदार्थ अतिसूक्ष्म स्तरावर नेला की वेगळे गुणधर्म प्रदर्शित करतो हे सिद्ध होऊन आता बराच काळ लोटला आहे. या बाबतीत त्याच सिद्धान्ताचा उपयोग करण्यात आला आहे. प्रा. स्टीफन सोयेनेन आणि डॉ. बेला मेंशियान यांनी या समस्येवर एकत्रित काम केले. धातूंची संयुगे तशी शरीराला घातक असतात; परंतु तीच संयुगे नियंत्रित प्रमाणात आणि मुख्य म्हणजे अतिसूक्ष्म कणांच्या स्वरूपात शरीरात पुरविली जातात, तेव्हा मात्र ती हितकारक सिद्ध होतात. या संशोधकांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगांतून असे आढळून आले की लोहाच्या ऑक्‍साईडपासून बनवलेल्या तांब्याच्या ऑक्‍साईडची सूक्ष्मकणांची संयुगे शरीराला पुरविली गेली, तेव्हा त्या संयुगांनी कर्करोगाच्या पेशी मारण्याचे काम केलेच; पण निकोप पेशींना मात्र या संयुगांनी नष्ट केले नाही. अर्थात हा अर्धाच भाग झाला. केवळ तांब्याच्या ऑक्‍साईडच्या सूक्ष्मकणांच्या संयुगांनी उपचार केले, तेव्हा कर्करोग पुन्हा उलटला. मग संशोधकांनी या उपचारपद्धतीबरोबरच इम्युनोथेरपीची मदत घेतली. तेव्हा मात्र त्याच तांब्याच्या सूक्ष्मकणांच्या संयुगांनी कमाल केली; त्यांनी कर्करोगाच्या पेशी मारण्याची कामगिरी बजावलीच; पण त्या पलीकडे जाऊन शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करणाऱ्या यंत्रणेतील अशा पेशींना साह्य पुरविले, ज्या पेशी ट्यूमरच्या पेशींसारख्या बाह्य गोष्टींशी मुकाबला करतात. प्रयोगांतून असे आढळले, की अतिसूक्ष्मकण आणि इम्युनोथेरपी यांच्या मिलाफाने ट्युमर नाहीसा झालाच; पण हे उपचार दिलेल्या उंदरांमध्ये पुन्हा ट्यूमर पेशी घालण्यात आल्या तेव्हा त्यांचाही लगेचच शरीरातील यंत्रणांनी खात्मा केला. याचाच अर्थ प्रतिकारशक्ती इतकी प्रबळ झाली, की ट्यूमर पेशींना वाढू देण्यापासून प्रतिबंध करण्यात आला. स्तनाचा, फुफ्फुसाचा आदी साठ टक्के कर्करोग या उपचारपद्धतीने बरे करता येतील असा दावा या संशोधकांनी केला आहे. कारण पी-५३ या जनुकामधील उत्परिवर्तन (म्युटेशन) कर्करोग उद्‌भवतात. पुन्हा कर्करोग उद्‌भवण्यापासून या सामायिक उपचारपद्धतीने मज्जाव केल्याने एका प्रकारे लसीकरणाचा परिणाम यातून साध्य होईल, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे केमोथेरपीचा वापर न करता या उपचारपद्धतीने कर्करोगावर मात करता आली. केमोथेरपी कर्करोगाच्या पेशी अवश्‍य मारते; पण ही उपचारपद्धती निकोप पेशींवरही हल्ला करते आणि एकूणच प्रतिकारशक्ती दुर्बल करते. याला पर्यायी उपचारपद्धती शोधण्याचे प्रयत्न सर्वच स्तरांवर सुरू आहेत. प्रस्तुत प्रयोगांनी नवी दिशा दाखविली आहे आणि धातूच्या सूक्ष्मकणांचा उपयोग यासाठी करण्याची आणि त्यातही प्रतिकारशक्ती दीर्घकाळासाठी सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने त्यांची सांगड इम्युनोथेरपीशी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता तांब्याच्या व्यतिरिक्त इतर धातूंची सूक्ष्मकणांची संयुगे हे संशोधक तपासणार आहेत आणि मुख्य म्हणजे विशिष्ट कर्करोगावर कोणत्या धातूंची संयुगे अधिक परिणामकारक ठरतात यावरही ते संशोधन करणार आहेत. तूर्तास हे प्रयोग उंदरांवर होणार असले, तरी पुढची पायरी म्हणजे कर्करोगाच्या रुग्णाच्या पेशींवर प्रयोगाची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanoparticles of copper oxide have been claimed to be useful in cancer prevention

Tags
टॉपिकस
Topic Tags: