
ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकतीच कृत्रिम मानवी पेशींवर "कोरोना'च्या प्रतिजैवकाची चाचणी घेतली असून,त्यातून सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत.
कोरोना ! जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी अशी जागा नाही, जिथे "कोविड-19'ची म्हणजे "कोरोना'ची सध्या चर्चा होत नसेल. "कोरोना'च्या महामारीपासून मानवाचा संहार रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. त्यावर प्रतिजैवक औषधे तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध देशांतील शास्त्रज्ञ आता संशोधनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पोहचले आहेत. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकतीच कृत्रिम मानवी पेशींवर "कोरोना'च्या प्रतिजैवकाची चाचणी घेतली असून, त्यातून सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत.
- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
डॉ. जोसेफ पेनिंन्जर यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाला "सार्स कोविड-2' (कोविड-19) या विषाणूचे पेशीय "रंध्र' बंद करण्यात यश आले आहे. "सेल' या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत नुकताच हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. "सार्स कोविड-2' हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या श्वसननलिकेच्या खालच्या भागात वास्तव्याला असतो. त्यामुळे रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडासोबतचे "सार्स कोविड-2' या विषाणूचे वर्तन शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम अभ्यासले. तसेच, या आधी आलेला "कोरोना' विषाणू म्हणजे "सार्स-1' संबंधीची माहितीही शास्त्रज्ञांकडे आहे. वैद्यकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान, डेटाचे पृथःकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे या संशोधनाला अधिक गती मिळाली आहे.
असे झाले संशोधन
मानवी पेशी आवरणावर "एसीई-2' नावाचे प्रथिन आढळते. संशोधनातून शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले, की "सार्स कोविड-2' या विषाणूला पेशीमध्ये प्रवेश देण्यासाठी "एसीई-2' हे प्रथिन कारणीभूत आहे. कोरोना विषाणूच्या शरीरावर काट्यांसारख्या भागावर ग्लायकोप्रोटिन नावाचे प्रथिन आहे. या ग्लायकोप्रोटिनला आकर्षित करण्याचे काम पेशी आवरणावरील "एसीई-2' हे प्रथिन करते. तसेच, मानवी पेशी आणि कोरोनाचा विषाणू एकमेकांमध्ये या प्रथिनांद्वारे अभिक्रिया करतात आणि याद्वारेच विषाणूचा पेशी आवरणाच्या आत शिरकाव होतो. म्हणजेच "कोरोना'च्या संसर्गासाठी मानवी पेशींमधील "एसीई-2' हे प्रथिन कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. "ह्यूमन रिकॉम्बिनेट सोल्युबल ऍन्जियोचेन्सीन कन्व्हर्टर्टिंग एन्झाईम-2' (एचआरएस एसीई- 2) नावाचे हे औषध प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. यासंबंधी युरोपीयन बायोटेक कंपनीने याआधी चाचणीही घेतली होती.
संशोधनानंतर निश्चित करण्यात आलेल्या औषधाची चाचणी घेणे हे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान होते. कारण, सुरवातीला उंदरावर प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याच औषधाची ससा, कुत्रे, घोडा, माकड आदी प्राण्यांवर चाचणी करण्यात येते. चाचणीतील सर्व निष्कर्ष योग्य असल्यावरच त्याची माणसावर चाचणी होते. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीने औषधांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येतो. एवढी सगळी प्रक्रिया पार पडण्यासाठी मोठा कालावधी लागतो. "कोरोना'च्या संसर्गाचा वेग बघता शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेत "शॉटकर्ट' शोधला. त्यांनी चक्क कृत्रिमपणे विकसित करण्यात आलेल्या मानवी पेशींवरच चाचणी घेतली. मानवी मूलपेशींच्या (स्टेम सेल्स) साह्याने रक्तवाहिनी आणि मूत्रपिंडाच्या पेशींची प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या वाढ करण्यात आली. या पेशींवर "एचआरएस एसीई-2' या औषधाचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे औषध दिलेल्या या पेशींमध्ये कोरोनाच्या विषाणूची वाढ खुंटलेली दिसून आली. यातून "एचआरएस एसीई-2' नावाचे हे औषध कृत्रिम पेशींमध्ये "कोरोना'चा संसर्ग थांबविण्यात यशस्वी ठरले यावर शिक्कामोर्तब झाले. कृत्रिम पेशींवरील चाचणी यशस्वी झाली असली, तरी आणखी काही चाचण्यांनंतरच हे औषध बाजारात येणार आहे. पण, औषध विकसित करण्याच्या या प्रक्रियेमुळे मोठा कालावधी वाचला आहे, यात शंका नाही.