सर्च-रिसर्च : प्रवाळांचे अस्तित्व धोक्‍यात

सम्राट कदम
Monday, 24 February 2020

सर्वांत जास्त जैवविविधता आणि उत्पादनक्षमता असलेला घटक म्हणजे प्रवाळ. महासागरांच्या तळातील सुमारे एक टक्के पृष्ठभागावर प्रवाळांचा अधिवास आहे.

महासागरांतील पर्जन्यवने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवाळांचे अस्तित्व पुढील ८० वर्षांत जवळजवळ नष्ट होईल, असा निष्कर्ष समोर आला आहे. कॅलिफोर्नियामध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक महासागर विज्ञान परिषदेत शास्त्रज्ञांनी हे संशोधन सादर केले. जागतिक तापमानवाढ आणि महासागरांच्या वाढत्या आम्लतेचा थेट परिणाम प्रवाळांच्या अधिवासावर होत असून, पुढील वीस वर्षांत ७० ते ९० टक्के प्रवाळांचे अधिवास नष्ट होण्याचा धोका संभवतो, असा इशारा त्यात देण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

सर्वांत जास्त जैवविविधता आणि उत्पादनक्षमता असलेला घटक म्हणजे प्रवाळ. महासागरांच्या तळातील सुमारे एक टक्के पृष्ठभागावर प्रवाळांचा अधिवास आहे. मासे, खेकडे, सरपटणारे प्राणी, समुद्री साप, बुरशी आदी चार हजार समुद्री जिवांचे पोषण आणि अधिवास प्रवाळांवर अवलंबून आहे. प्रवाळ हे समुद्री जीवनासाठी ॲमेझॉनच्या जंगलाइतके महत्त्वपूर्ण आहे. जगातील शंभर देशांमधील ५० कोटी लोकांच्या अन्नामध्ये प्रवाळांचा समावेश आहे. जगात सुमारे ३७५ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था प्रवाळांच्या उत्पादनावर अवलंबून आहे. अरबी समुद्रात कच्छ, मुन्नार आखातांसह लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरात अंदमान-निकोबार बेटांजवळील समुद्रात गेल्या पाच कोटी वर्षांपासून प्रवाळांचा वैविध्यपूर्ण अधिवास आहे. प्रवाळ हे प्रशांत महासागरातील फिजी, इंडोनेशिया, फिलिपिन्स आदी देशांच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

वाढती मासेमारी आणि मासेमारीच्या चुकीच्या पद्धती, समुद्रातील बांधकाम, प्रदूषण, प्लॅस्टिक, रोगराई आणि घनकचऱ्याची समुद्रात लावलेली विल्हेवाट या मानवी ‘प्रतापां’बरोबरच त्सुनामी, अल निनो, महासागरांतील वादळे, भूकंप आदींचा परिणाम प्रवाळांवर होतो. हे सर्व परिणाम विशिष्ट प्रदेशाशी निगडित असू शकतात, त्यांचा प्रवाळांच्या अस्तित्वावर परिणाम होत नाही. महासागरांच्या वाढत्या आम्लतेमुळे संपूर्ण प्रवाळांचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. साधारणपणे २३ ते २९ अंश सेल्सिअस तापमान हे प्रवाळांच्या अधिवासासाठी योग्य आहे. एकविसाव्या शतकात जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे तापमानातील हा बदल प्रवाळांच्या काही प्रजातींसाठी धोकादायक आहे. जगभरात वाढलेले कार्बन उत्सर्जन ही प्रवाळांसाठी धोक्‍याची घंटा ठरली आहे. दिवसाला दोन कोटी वीस लाख टन कार्बन महासागर त्यांच्या पोटात घेतात. यामुळे त्यांच्यातील आम्लतेत वाढ होते. ही वाढलेली आम्लता प्रवाळांसाठी आधाराचे कार्य करणाऱ्या कॅल्शिअम कार्बोनेटच्या ‘सांगाड्या’ची झीज करण्यास सुरुवात करते. वाढत्या प्लॅस्टिक प्रदूषणामुळे सूर्यप्रकाश प्रवाळांपर्यंत पोचण्यास प्रतिबंध होतो. २०२५ पर्यंत १५.७ अब्ज प्लॅस्टिकचे तुकडे महासागरांत प्रवाळांच्या संपर्कात येतील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. समुद्रातील बुरशीसारख्या सजीवांना अन्ननिर्मितीसाठी प्रकाशसंश्‍लेषण अनिवार्य आहे. त्यासाठी आवश्‍यक कार्बन डायऑक्‍साइड आणि इतर घटक प्रवाळांच्या माध्यमातून मिळतात, तसेच ऑक्‍सिजनच्या साह्याने प्रवाळ कॅल्शिअम कार्बोनेटची निर्मिती करते. महासागरांतील जीवसृष्टी फळण्या- फुलण्यासाठी प्रवाळ हे वरदान आहे. तसेच, कर्करोगाच्या औषधांसाठी आवश्‍यक घटक प्रवाळांमधूनच मिळतात. सर्वांनीच कार्बन उत्सर्जनाला आळा घालणे आणि प्रदूषण रोखणे, यासाठी ठोस पावले टाकणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat kadam article coral is in danger