उत्खनन उद्याचे, आजच्या जगाचे!

सम्राट कदम
Monday, 13 January 2020

जमिनीखाली सापडलेले जीवाश्‍म, घरांच्या संरचना, भांडी, नाणी, मूर्ती, रस्ते आदींच्या निरीक्षणातून त्या कालखंडाच्या इतिहासाचा आढावा घेतला गेला. पण, दुर्दैवाने भविष्यात आजचे जग जमिनीखाली गाडले गेले, तर हजारो वर्षांनी त्याचे उत्खनन होईल काय?

हडप्पा- मोहेंजोदडो म्हटलं की डोळ्यांसमोर उत्खननात सापडलेले हजारो वर्षांपूर्वीचे सिंधू संस्कृतीतील प्रगत शहर उभे राहते. पण त्या कालखंडाची कोणतीही लिखित माहिती उपलब्ध नाही. जमिनीखाली सापडलेले जीवाश्‍म, घरांच्या संरचना, भांडी, नाणी, मूर्ती, रस्ते आदींच्या निरीक्षणातून त्या कालखंडाच्या इतिहासाचा आढावा घेतला गेला. पण, दुर्दैवाने भविष्यात आजचे जग जमिनीखाली गाडले गेले, तर हजारो वर्षांनी त्याचे उत्खनन होईल काय? उत्खनन झाले तर त्यात काय सापडेल? बरं, हे उत्खनन नक्की माणूस करणार की परग्रहावरून आलेले परग्रहवासी? असे अनेक प्रश्न आज पडले आहेत. यावर काही वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, त्याविषयीचे अंदाज त्यांनी मांडले आहेत. ‘आन्थ्रोपोसेन’ या शोधपत्रिकेत या संदर्भात नुकतेच काही संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यात जीवाश्‍माशी निगडित दोनशे शोधनिबंधांचा अभ्यास करण्यात आला आहे. लाखो वर्षांनंतरही मानवजात जिवंत असेल काय? याबद्दल मात्र शास्त्रज्ञांना शंका वाटते. तेव्हा उत्खनन करण्यात आले, तरी त्या वेळचा माणूस आपल्या पूर्वजांना कोणत्या कारणासाठी जाणून घेऊ इच्छितो, यावर उत्खननाची दिशा आणि दशा ठरेल! परग्रहवासी हे उत्खनन करतील काय, याबद्दल शास्त्रज्ञ मात्र साशंक आहेत. वर्तमान जगात प्रत्येक घटनेच्या, समस्येच्या, मानवी हालचालींच्या मोठ्या प्रमाणावर नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे उत्खननानंतर तेव्हाच्या माणसांना आपल्या जीवाश्‍मातून संशोधन करण्याची गरज नाही. मिळालेल्या नोंदीवरूनच त्यांना सर्व माहिती मिळेल, असे आपल्याला वाटते. पण, तेव्हाच्या माणसांना ही भाषा ज्ञात असेल काय? भाषा माहीत असली तरी आपण जे काही किचकट अथवा ‘कोडिंग’च्या स्वरूपात लिहिले आहे, ते त्यांना ‘डिकोड’ करता आले पाहिजे. कारण, आजही हडप्पा- मोहेंजोदडोतील सिंधू संस्कृतीतील लिखाणांचा अर्थ लागू शकलेला नाही. आजचे संगणक ज्या भाषेत माहितीचा संचय करतात, त्या भाषेला भविष्यातील सुपरफास्ट संगणक जाणून घेऊ शकतील काय हा मोठा प्रश्न आहे. कारण पुढील हजारो वर्षांत तंत्रज्ञानात अफाट प्रगती झालेली असेल.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्याप्रमाणे आज डोंगरात, गुहेमध्ये, नदीकिनारी, तळ्याकाठी किंवा जंगलात जीवाश्‍म सापडतात, त्याप्रमाणे लाखो वर्षांनी अशा ठिकाणी आपले जीवाश्‍म सापडणार नाहीत. कारण आपण पारंपरिक राहण्याचे ठिकाण बदलले आहे. तसेच माणूस मेल्यानंतर विशिष्ट ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. (भारतात काही ठिकाणी दहन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्या लोकांचे जीवाश्‍म मिळणार काय?) भविष्यात दफनभूमीचे उत्खनन झाले, तर एकाच ठिकाणी विशिष्ट पद्धतीत पुरलेले मृतदेह बघून तेव्हाचा माणूस प्रचंड गोंधळात पडेल. तसेच त्याला त्यातून कोणताही अर्थबोध होणार नाही. कारण, आज वर्तमानात सापडणाऱ्या जीवाश्‍मांद्वारे भूतकाळातील नागरी जीवन कसे होते, त्या काळातील अन्न, वस्त्र, निवारा आदींबद्दल माहिती मिळते. पण दफनभूमीच्या उत्खननात ही माहिती मिळणार नाही. २१व्या शतकात मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविके, औषधे वापरण्यात आली. त्यामुळे लाखो वर्षांनी उत्खनन झाल्यावर जीवाश्‍मांतून रासायनिक पद्धतीने योग्य माहिती मिळेलच असे नाही. परिणामी भविष्यातील जीवाश्‍म अभ्यासकांपुढील हे सर्वांत मोठे आव्हान असेल. एकंदरीत आज तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली असली, तरी लाखो वर्षांनंतर तेव्हाच्या माणसांना आजच्या कालखंडाची माहिती सहज मिळेल, असे नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samrat kadam article exhumation