
शास्त्रज्ञांनी असा एक प्राणी शोधला आहे,ज्यामुळे शीतज्वराच्या वैश्विक साथीची पूर्वसूचना मिळेल. डुकराच्या आरोग्य तपासणीतून वैश्विक साथींची पूर्वसूचना मिळणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
पावसाची पूर्वसूचना देणाऱ्या पावशा पक्ष्याप्रमाणेच वैश्विक साथीची पूर्वसूचना देणारा एखादा प्राणी असला तर ! काय भन्नाट कल्पना आहे ना? आज "कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या वैश्विक आणीबाणीचा प्रश्नच त्यामुळे आला नसता. आता ही गोष्ट सत्यात उतरत आहे. शास्त्रज्ञांनी असा एक प्राणी शोधला आहे, ज्यामुळे शीतज्वराच्या वैश्विक साथीची पूर्वसूचना मिळेल. वराह अर्थात डुकराच्या आरोग्य तपासणीतून वैश्विक साथींची पूर्वसूचना मिळणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
डुकरांच्या माध्यमातून साथ
चीनमधील सर्व विज्ञान शाखांतील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन यासंबंधीचे संशोधन केले आहे. डुक्कर हे जवळजवळ सर्वच शीतज्वराच्या विषाणूंचे घर असल्याचे मानले जाते. त्यांच्या कळपावर योग्य देखरेख ठेवल्यास आणि त्यांची वेळोवेळी तपासणी केल्यास भविष्यात मानवी वस्तीत शिरकाव करणाऱ्या वैश्विक साथीचा अंदाज येऊ शकतो. 2009 मध्ये आलेल्या "एच1 एन1' अर्थात स्वाईन फ्ल्यूमुळे प्रकर्षाने ही बाब लक्षात आली. 1957 आणि 1968मध्येही विशेषतः चीनमध्ये डुकरांच्या माध्यमातून अशी साथ पसरली होती. 2011 ते 2018 दरम्यान शास्त्रज्ञांनी डुकरांच्या कळपाची सातत्याने तपासणी केली. त्यावरून सध्या "जीनोम टाईप-4' प्रकारातील विषाणू माणसांसाठी जास्त हानिकारक ठरू शकतात, असे स्पष्ट झाले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विषाणूंची आनुवंशिक विविधता
शास्त्रज्ञांनी सुमारे 29 हजार डुकरांची या संशोधनासाठी निवड केली होती. प्राथमिक अभ्यासातून 2013 नंतर डुकरांमधील आनुवंशिक विविधता झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. निवड केलेल्या डुकरांमध्ये तब्बल 136 प्रकारचे शीतज्वराचे विषाणू आढळले. याचवेळी श्वसनाशी निगडित आजार असलेल्या 1016 डुकरांच्या घशातील द्रव आणि फुफ्फुसाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यातील 43 डुकरांना शीतज्वराची लागण झाल्याचे लक्षात आले. या दोन्ही घटनांचा किंवा सॅंपल साईझचा शास्त्रज्ञांनी जनुक स्तरावर जाऊन अभ्यास केला. शीतज्वराला कारणीभूत ठरणाऱ्या "एच1 एन1', "सार्स' आदी विषाणूंचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. डुकरांमध्ये संसर्गजन्य आजार पसरला, तरी त्याचा माणसांमध्ये शिरकाव होण्यासाठी कोणते जनुकीय बदल अपेक्षित आहेत, त्याचा प्रादुर्भावाचा वेग काय असेल, यासंबंधीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण त्यांनी केले. "इन्फ्लुएन्झा ए व्हायरस' आणि हिमॅगुलॅटिनया प्रथिनांच्या पृष्ठभागावरील अँटिजन एकत्र आल्याशिवाय साथीची सुरुवात होत नाही. हे एकत्र आल्यावरच एका माणसाकडून दुसऱ्या माणसात विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे सिद्ध झाले आहे. येत्या काळात "जी-4 ईए एच1एन1' हा विषाणू माणसांमध्ये संक्रमित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने डुकरांवर देखरेख ठेवून योग्य उपाययोजना केल्यास ही साथ रोखता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लसीच्या संशोधनाला मिळेल गती
संबंधित संशोधनामध्ये शीतज्वराशी निगडित वेगवेगळ्या विषाणूंचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचा डुकरांमधील प्रादुर्भाव, पद्धत आणि मानवी प्रादुर्भावाचे तपशीलवार अध्ययन शास्त्रज्ञांनी केले आहे. त्यामुळे भविष्यात कोणते विषाणू डोके वर काढू शकतात, याचा अंदाज त्यांना आला आहे. डुकरांच्या देखरेखीतून वैश्विक साथीची अशा प्रकारे पूर्वसूचना मिळाली, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेळीच गती देता येईल. पण त्याचबरोबर लस आणि औषधासंबंधीच्या संशोधनालाही वेळेआधीच सुरुवात करता येईल. पर्यायाने साथ पसरल्यानंतर अल्पावधीतच लस उपलब्ध होऊन आजच्यासारखी आणीबाणीची स्थिती निर्माण होणार नाही. प्रशासनालाही जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यायला वेळ तर मिळेलच, त्याचबरोबर आर्थिक पडझडीलाही प्रतिबंध करता येईल, यात शंका नाही.