सर्च रिसर्च  : नाते स्पर्श नि डोळ्यांचे 

सम्राट कदम 
Monday, 20 July 2020

या प्रयोगातून स्पर्श आणि डोळ्यांच्या हालचाली परस्परांशी संबंधित असल्याचे लक्षात आले. तसेच, सराव वाढत नेल्यास कंपनांतील फरक ओळखण्याची क्षमताही वाढत गेल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.

स्पर्श तुझ्या पायांचा हो अन्‌, 
पेटून उठली माती. 
पायतळीचे दगडही उठले, 
मिळवीत प्राणज्योती... 

वीररसाची अनुभूती देणाऱ्या या कवितेसह मानवी भावनांच्या विविध छटा दर्शविणाऱ्या सर्वच कवितांमध्ये स्पर्शाला विशेष महत्त्व दिलेले आहे. कारण स्पर्शाने भावनेच्या जिवंतपणाला परिपूर्णता येते. भवतालाची अनुभूती देणाऱ्या मानवी पंचेंद्रियांमध्ये परस्पर सहसंबंध असायलाच हवा. अशाच प्रकारचा सहसंबंध डोळे आणि त्वचेच्या स्पर्शामध्ये असल्याचे सिद्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. आजूबाजूच्या वातावरणाचे ज्ञान होण्यासाठी सारखी उघडझाप करणाऱ्या डोळ्यांच्या हालचालींमुळे स्पर्शाची अनुभूती प्रभावित होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मानसशास्त्र आणि मज्जातंतूशास्त्र विभागातील डॉ. मारिसा कॅरॅस्को यांच्या नेतृत्वाखाली झालेले हे संशोधन नुकतेच "नेचर कम्युनिकेशन' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डोळ्यांच्या हालचालींमुळे स्पर्शिका उत्तेजनांमधील फरक ओळखण्याच्या मानवी क्षमतेवर प्रभाव पडतो. तसेच, स्पर्शिका उत्तेजनामुळे डोळ्यांच्या हालचालींवरही दडपण येते. हे अभ्यासण्यासाठी शास्त्रज्ञांनी मानवी हालचालींवर नियंत्रण ठेवणारा मेंदूतील विशिष्ट भाग आणि मज्जातंतू यांच्यामध्ये स्पर्शाने आणि डोळ्यांच्या हालचालींमुळे होणारा परिणाम तपासला. यातून मानवी आकलनशक्ती, अनुभूती आणि प्रतिक्रिया यांच्या दरम्यान एक आश्‍चर्यकारक दुवा स्पर्शिका उत्तेजना आणि डोळ्यांच्या हालचालींतून स्पष्ट होत असल्याचे पुढे आले. 

त्वचेच्या स्पर्शाचा डोळ्यांशी असलेला सहसंबंध तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी कंपनांचा आधार घेतला. त्यासाठी प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींना जास्त वारंवारिता ( फ्रिक्वेन्सी) आणि कमी वारंवारिता असलेल्या कंपनांमध्ये फरक ओळखायला सांगितले. सहभागी व्यक्तींच्या बोटांना कंपने उत्पन्न करणारे यंत्र लावण्यात आले. तसेच डोळ्यांतील अगदी सूक्ष्म हालचाली टिपण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात आला. ज्याला "मायक्रो-सॅकेड' म्हणून ओळखले जाते. एका ठिकाणी टक लावून बघितले, तरी आपल्या डोळ्यांमध्ये सूक्ष्म हालचाली उत्पन्न होत असतात. अशा हालचालीही ही यंत्रणा टिपू शकत होती. प्रयोगात सहभागी लोकांना समोरच्या संगणकाच्या पडद्यावर लक्ष केंद्रित करायला लावले. त्यानंतर कंपने सुरू करण्याची सूचना दिली. ही सूचना दिल्यानंतर डोळ्यांच्या हालचालींचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. तसेच दोन सूचनांमधील वेळेचा फरकही त्यांनी सातत्याने बदलला. यामुळे काय झाले, तर पुढले कंपन केव्हा सुरू होणार याची कल्पना व्यक्तीला नसायची, अशा वेळी त्याचे डोळे बोटाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायचे. तसेच कंपनांची वारंवारिताही कमी- जास्त करण्यात आली. जास्त वारंवारितेच्या कंपनांना ओळखण्यात सहभागी व्यक्तींना काहीच अडचण आली नाही. मात्र हे करत असताना त्यांच्या डोळ्यांच्या हालचाली प्रभावित झाल्या होत्या. प्रयोगात समोरच्या पडद्यावर एकटक पाहायचे होते. त्यामुळे तुलनेने कमी वारंवारितेच्या कंपनांचे अनुमान बांधताना सहभागी व्यक्तींना कसरत करावी लागली. अशा वेळी त्यांच्या डोळ्यांच्या हालचालीवर दडपण येत, तसेच दोन कंपनांमधल्या वेळेतही डोळ्यांच्या हालचाली प्रभावित होत. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रयोगातून स्पर्श आणि डोळ्यांच्या हालचाली परस्परांशी संबंधित असल्याचे लक्षात आले. तसेच, सराव वाढत नेल्यास कंपनांतील फरक ओळखण्याची क्षमताही वाढत गेल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. भौतिक जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या पंचेंद्रियांमध्ये आत्मिक सहसंबंध असल्याचे यातून स्पष्ट होते. मानवी संवेदना, जाणिवा आणि त्यातून उत्पन्न होणारी कृती अशा भावविश्वाला परिपूर्ण करण्यात स्पर्श आणि डोळ्यांचे हे सहजीवन महत्त्वपूर्ण ठरते. मानवी पंचेंद्रियांची क्‍लिष्ट कार्यप्रणाली शास्त्रीय आधारावर समजून घेण्यासाठी हे संशोधन निश्‍चितच लक्षणीय पाऊल ठरणार आहे. 

(Edited by: Kalyan Bhalerao)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat kadam search research article about Eyes and Skin touch

Tags
टॉपिकस
Topic Tags: