सर्च-रिसर्च :  तुटलेल्या हाडांचा आधार

bone
bone

अपघातात हाडाला इजा पोहोचणे म्हणजे आयुष्यभर पुरणारी दुखापत. तुटलेल्या हाडांची झीज भरून निघावी आणि त्यांच्यातील जोड टिकावा यासाठी शस्त्रक्रियेद्वारे हाडांना धातूच्या सळईचा किंवा जाळीचा आधार देण्यात येतो. कालांतराने हाडे एकसंध झाल्यानंतर त्यांच्यामधून धातूची सळई बाहेर काढावी लागते. त्यासाठी पुन्हा एकदा शस्त्रक्रियेचा घाट डॉक्‍टरांना घालावा लागतो. सळई किंवा धातूची जाळी कायमस्वरूपी शरीरातच ठेवायची असेल, तर त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. जंतूसंसर्ग, फिजिओथेरपी, औषधे आणि शरीराच्या प्रतिक्रियांचा सामना वेळोवेळी रुग्णाला करावा लागतो. तुटलेल्या हाडांचे हे दुखणे कायमस्वरूपी बरे करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी एक तोडगा काढला आहे. तेही आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण खनिज असलेल्या मॅग्नेशियमपासून विकसित केलेल्या मिश्र धातूपासून !

मानवी शरीरामध्ये मॅग्नेशियमचे विशेष स्थान आहे. कारण शरीरातील ३०० च्या वर रासायनिक अभिक्रिया त्याच्याशिवाय अपूर्ण आहेत. याच मॅग्नेशियमपासून बनलेली सळई हाडांच्या जोडणीसाठी उत्तम आधाराचे काम करते. तसेच, शरीरात राहिल्यानंतर काही दिवसांनी तिचे विघटनही होते. पर्यायाने रुग्णाला जंतूसंसर्ग आणि पुन्हा शस्त्रक्रियेची भीती राहत नाही. परंतु, हे सगळे माहिती असूनही मॅग्नेशियमचा वापर टाळण्यात येतो. कारण त्यातून निर्माण होणारी विषारी रसायने शरीरासाठी घातक ठरतात. गेल्या कित्येक वर्षांपासून शास्त्रज्ञ मॅग्नेशियमचे असे मिश्रण शोधत आहेत, की ज्यामुळे शरीराला अपाय होणार नाही आणि त्याचबरोबर हाडांसोबत त्याची ‘मैत्री’ही जास्त काळ टिकेल. चेन्नईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधील (आयआयटी) शास्त्रज्ञ डॉ. मुकेश डोबाल यांनी मॅग्नेशियम नॅनोपार्टिकल्सच्या वापरातून एक मिश्र धातू तयार केला आहे. जो हाडांसाठी शाश्‍वत आधार तर आहेच, पण त्याचबरोबर त्याचे विलग होणारे अणू हाडांच्या मजबुतीचेही काम करतात. ‘आयआयटी’तील शास्त्रज्ञांचे हे संशोधन ‘जर्नल ऑफ नेनोमेडिसीन’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मानवी शरीरातील हात, पाय, मांडी आणि पाठीच्या हाडांची लांबी एक फुटांपेक्षा जास्त असते. पाच सेंटिमीटरपेक्षा जास्त लांबीचे फ्रॅक्‍चर भरून काढण्यासाठी वेळेबरोबरच आधाराचीही गरज असते. जोडलेल्या हाडांची हालचाल होऊ नये, त्यांना आधार मिळावा म्हणून टिटॅनियमपासून बनलेली जाळी वापरण्यात येते. परंतु, शरीरात जास्त काळ राहूनही तिचे विघटन होत नाही. पर्यायाने स्नायूंच्या पेशी आणि जाळीमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. शास्त्रज्ञांनी मॅग्नेशियमच्या नॅनोपार्टिकलबरोबर पॉलिकॅप्रोलेक्‍टॉन आणि हायड्रॉक्‍सिपीटाईटचे मिश्रण वापरून तयार केलेला हा नवीन पदार्थ हाडांच्या आधारासाठी शाश्‍वत उपाय आहे. ‘एझेड३१’ नावाच्या या मिश्र धातूपासून तयार केलेली जाळी लवचिक तर आहेच, पण त्याचबरोबर काही कालावधीने तिचे विघटनही होते. तसेच, त्यापासून कोणतेही विषारी रसायन तयार होत नसल्याने शरीरावरही कोणता विपरीत परिणाम होत नाही.  ‘एझेड३१’ या मिश्र धातूची चाचणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदराच्या हाडांमध्ये फ्रॅक्‍चर केले होते. त्यानंतर उपचारासाठी मॅग्नेशियमचे नॅनोपार्टिकल वापरलेली ही जाळी वापरण्यात आली. जाळीमुळे हाडांना आधार तर मिळालाच, पण त्याचा कोणताही दुष्परिणाम उंदराच्या शरीरावर जाणवला नाही. हाडे जुळण्यासाठी आवश्‍यक कालावधीपर्यंत ती जाळी टिकून होती. त्यानंतर काही कालावधीने जाळीचे विघटन होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे तुटलेली हाडे भरून निघण्यासही मदत झाली. प्रयोगशाळेत उंदरांवर झालेले हे संशोधन हाडांच्या पुनर्बांधणीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहे. आता टप्याटप्याने इतर प्राण्यांवर आणि नंतर माणसांवर प्रत्यक्ष चाचणी झाल्यानंतर हे संशोधन सर्वसामान्यांच्या थेट उपयोगात येईल. भारतीय शास्त्रज्ञांचे हे संशोधन जगभरातील मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोगी पडणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com