
शास्त्रज्ञ आता या सूर्यमालेवर लक्ष ठेवणार असून,दोन नवग्रहांमध्ये होणारी अभिक्रिया अभ्यासण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.अर्थात यामागे आपल्या सूर्यमालेच्या उत्क्रांतीचे कोडे सोडविण्याचा प्रयत्ननक्कीच आहे
खगोलशास्त्राच्या इतिहासात प्रथमच ताऱ्याभोवती फिरणाऱ्या दोन ग्रहांची थेट प्रतिमा मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘युरोपीयन सदर्न ऑब्झर्वेटरी’च्या शक्तिशाली टेलिस्कोपच्या साह्याने ही प्रतिमा टिपण्यात आली. दोन ग्रह असलेल्या सूर्यमाला तशा दुर्मीळच, त्यात बहुतांश सूर्यमाला रेडिओ तरंगांसारख्या इतर दुर्बिणीच्या साह्याने टिपल्या जातात. पण प्रथमच अवरक्त किरणांच्या (इन्फ्रारेड) साह्याने थेट प्रतिमा शास्त्रज्ञांनी प्राप्त केली आहे.
पृथ्वीपासून ३०० प्रकाशवर्षे दूर असलेली ही सूर्यमाला उत्क्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ नवनवे ग्रह शोधतात. परंतु, त्यातील फार थोडे ग्रह आपल्या सूर्यमालेसारखे त्यांच्या ताऱ्याभोवती फिरताना आढळतात. बहुतेक ताऱ्यांना एकच ग्रह असतो, तर काहींना तो नसतोही. दोन ग्रह असलेले तारे दुर्मीळच. तसेच थेट पृथ्वीवरून अभ्यासता येतील, अशा सूर्यमालांची संख्याही कमी आहे. आजवर अशा दोनच सूर्यमाला शास्त्रज्ञांना ज्ञात आहेत. अशा पार्श्वभूमीवर या संशोधनाचे महत्त्व अधिकच वाढते. ‘‘ताऱ्याभोवती ग्रह कसे विकसित होतात, त्यांची उत्क्रांती कशी होते, एवढेच काय तर आपली सूर्यमाला कशी विकसित होत गेली, अशी रहस्ये उलगडण्यासाठी आपल्या सूर्यमालेशी साम्य सांगणारी आणि अवरक्त किरणांनी सहज अभ्यासण्यात येणारी ही सूर्यमाला निश्चितच महत्त्वपूर्ण आहे,’’ असे मत प्रमुख संशोधक नेदरलॅंडमधील लेडेन विद्यापीठाच्या डॉ. अलेक्झांड्रा बोहन यांनी व्यक्त केले आहे.
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप
या सूर्यमालेतील दोन्ही महाकाय ग्रह वायूंनी बनलेले आहेत. तसेच त्यांचा ताराही जरा तरुणच आहे. सुरुवातीला या दोन ग्रहांतून उत्सर्जित होणाऱ्या अवरक्त किरणांद्वारे प्रतिमा मिळविण्यात आली. त्यांची दोन वेळा प्रतिमा घेतल्यावर शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले, की ते कोणत्यातरी ताऱ्याभोवती फिरत आहेत. त्यानंतर शास्त्रज्ञांना त्यांचा तारा दिसला. या ताऱ्यापासून पहिल्या ग्रहाचे अंतर हे पृथ्वी आणि सूर्य यांच्या अंतराच्या १६० पट आहे, तर दुसरा ग्रह ताऱ्यापासून ३२० पटीने दूर आहे. म्हणजेच आपल्या सूर्यमालेचा विचार केल्यास वायूंपासून बनलेल्या गुरू किंवा शनी ग्रहापेक्षा कितीतरी जास्त अंतरावरून ते ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. तसेच त्यांच्या वस्तुमानाची तुलना केल्यास अंतरग्रहाचे वस्तुमान हे आपल्या गुरू ग्रहाच्या १४ पट आहे, तर बाह्यग्रहाचे वस्तुमान १६ पटींपेक्षा जास्त आहे. हा तारा ज्याला ‘टीवायसी- ८९९८-७६०-१’ म्हणून ओळखले जाते, त्याचे वय फक्त १.७ कोटी वर्षे आहे. म्हणजेच आपल्या सूर्यापेक्षा तो खूपच तरुण आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शास्त्रज्ञांनी या ग्रहांना टिपण्यासाठी ‘स्फेअर’ नावाचे विशेष संयंत्र वापरले, की जे ताऱ्यांच्या देदिप्यमान प्रकाशाला प्रतिबंध करते. पर्यायाने त्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांमधून बाहेर पडणारे अवरक्त किरणांना टिपणे शक्य होते. जे तारे अजून विकसित होत आहेत, त्यांचे तापमान प्रचंड असते, अशांना सहज टिपता येते. पण ज्यांचे तापमान खूप कमी आहे, अशा ताऱ्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या अवरक्त किरणांना टिपण्यासाठी हे संयंत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. शास्त्रज्ञ आता या सूर्यमालेवर लक्ष ठेवणार असून, दोन नवग्रहांमध्ये होणारी अभिक्रिया अभ्यासण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. अर्थात यामागे आपल्या सूर्यमालेच्या उत्क्रांतीचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच आहे.