‘कुंजपुरा’ ओलांडला म्हणजे काय? 

‘कुंजपुरा’ ओलांडला म्हणजे काय? 

द . मा. मिरासदारांची ‘ड्रॉइंग मास्तरांचा तास’ ही एक अप्रतिम कथा. त्यात इतिहासाच्या तासाला बदली आलेले ड्रॉइंग मास्तर इतिहास शिकवायला जातात आणि त्यांची फजिती होत राहते. पानिपतसंदर्भात एक विद्यार्थी त्यांना ‘सर, कुंजपुरा ओलांडला म्हणजे काय?’ असे विचारतो. त्यानंतरचा काही भाग द. मां.च्याच शब्दांत - ‘आता मात्र आमचे सर चांगलेच खवळले. त्यांनी रागारागाने टेबलावर हात आपटले. चेहरा भीषण केला. ‘धन्य आहे! कुंजपुरा माहीत नाही? मग शिकलात काय तुम्ही? कुंजपुरा... लक्षात आलं ना?’ मास्तरांनी हातात चेंडू धरून फिरवल्यासारखा अभिनय केला. ‘काय? - तो ओलांडला. कुंजपुरा... ओलांडला...’ बैस खाली. पुन्हा असे फालतू प्रश्न विचारत जाऊ नकोस! आता आपल्याला कुणी हवामानबदल, तापमानवाढ आणि ओझोन थर विरळ होणे म्हणजे नक्की काय? हे सर्व एकच आहे की वेगवेगळे? त्यात काही परस्परसंबंध आहे का? असे ‘कुंजपुरा’ प्रश्न विचारले तर आपला ‘मास्तर’ होऊ नये, म्हणून या संज्ञा सर्वप्रथम सोपेपणे, पण निश्‍चित समजून घेऊ.

हवामानबदल म्हणजे काय?
सूर्याची ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाला तापवते आणि पृथ्वीची हवा व हवामान त्यामुळे निश्‍चित होते. पृथ्वीचा तापलेला पृष्ठभाग सूर्याची ऊर्जा परत काही प्रमाणात अवकाशात परावर्तित करतो. वातावरणातले काही वायू (पाण्याची वाफ, कार्बन डाय-ऑक्‍साइड, मिथेन, नायट्रस ऑक्‍साइड आणि इतर) यापैकी काही ऊर्जा पकडून ठेवतात आणि हरितगृहाच्या काचांच्या तावदानाप्रमाणेच उष्णता वातावरणात साठून राहते. हाच तो सुप्रसिद्ध हरितगृह परिणाम आणि म्हणूनच या वायूंना ‘ग्रीन हाउस’ वायू म्हटले जाते. काही अंशी ही प्रक्रिया कल्याणकारी ठरते. कारण हा नैसर्गिक ‘हरितगृह परिणाम’ नसता तर पृथ्वीभोवतीचे तापमान आता आहे त्यापेक्षा किती तरी कमी असते आणि आपल्या ओळखीची, आपल्या भोवतीची सजीवसृष्टी अस्तित्वातच आली नसती. लोकसंख्येची वाढ आणि काही विशिष्ट आर्थिक घडामोडींचा परिणाम म्हणून गेल्या दोन शतकांमध्ये हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या वाढलेल्या उत्सर्जनाशी निगडित काही महत्त्वाचे उद्योग म्हणजे फार मोठ्या प्रमाणात खनिज तेलांचे, गॅसोलिनचे आणि कोळशाचे ज्वलन, जंगलतोड आणि काही विशिष्ट शेतीपद्धतींचा अवलंब. याशिवाय, गेल्या शतकभरात काही नव्या हरितगृह वायूंची भरही पडली आहे. अनेकविध मानवी व्यवहारांमुळे वाढलेले हरितगृह वायूंचे प्रमाण वातावरणाची उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता वाढवायला कारणीभूत ठरले आहे; आणि आता ही तापमानवाढ कल्याणकारी राहिलेली नाही. जागतिक तापमानात घातक वाढ झाली आहे. यामुळे हवामानात मोठे विनाशकारी बदल झाले आहेत. ढग आणि बर्फाची आच्छादने, पर्जन्यमान, वाऱ्याचे प्रवाह, समुद्री प्रवाह, वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे वितरण, ऋतुचर्या विज्ञान यांसह अनेक बाबींमध्ये हवामानबदलाचे अतिघातक परिणाम दिसू लागले आहेत. ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्‍लायमेट चेंज’ (UNFCC )नुसार मानवी व्यवहारांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम असलेला हवामानातला जो बदल हवामानाच्या संरचनेत फेरफार घडवतो, तो बदल ‘हवामानबदल’ म्हणून ओळखला जातो.

हवामानाच्या घटकांच्या (उदाहरणार्थ - तापमान, दाब, वारे) आकडेवारीत होणारा जो पद्धतशीर बदल दीर्घकाल म्हणजेच अनेक दशकांहून अधिक काळ टिकतो तो हवामानबदल, अशीही आणखी एक व्याख्या आहे. थोडक्‍यात, हरितगृह वायूंमुळे तापमानवाढ होते आणि त्यामुळे हवामानबदल होतो. ओझोन थर कुठे असतो, त्याचे विरळ होणे या बदलाला हातभार कसा लावते, त्यामुळे झालेले नुकसान, आपण त्यावर मिळवलेला विजय हे सर्व पुढील लेखांकात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com