सर्च-रिसर्च : का येतो घामाचा दुर्गंध?

सुरेंद्र पाटसकर
Tuesday, 21 July 2020

घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत.घामामध्ये हवेतील जिवाणू मिसळल्यानेही दुर्गंध निर्माण होतो.आपल्या शरीरातील घामाचा दुर्गंध हा `फिश ओडर सिंड्रोम`चे लक्षण असू शकते,असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

काही जणांना इतरांपेक्षा घाम जास्त येतो. काहींच्या घामाला दुर्गंध येतो. त्या दुर्गंधांमुळे ते त्रस्त असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी विविध उपायही केले जातात. परंतु, दुर्गंधात फरक पडत नाही. घामाला येणारा दुर्गंध कशामुळे येतो? त्याला जबाबदार असणाऱ्या जनुकाचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे...

उन्हाळा सुरू झाली की घामाचा त्रास आपल्याला सर्वाधिक होतो. घामाची दुर्गंधी नकोशी होते. गर्दीमध्ये असताना तर दुर्गंधीच्या त्रास कित्येक पटींनी वाढतो. तुझ्या अंगाला घामाची दुर्गंधी येते असे दुसरे कोणी सांगण्याऐवजी आपल्यालाच त्याची ती समस्या ओळखता यायला हवी. घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. घामामध्ये हवेतील जिवाणू मिसळल्यानेही दुर्गंध निर्माण होतो. परंतु, आपल्या शरीरातील घामाचा दुर्गंध हा `फिश ओडर सिंड्रोम`चे लक्षण असू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.  विशिष्ट प्रकारच्या जनुकातील बदलांमुळे हा परिणाम झालेला असतो. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाले तर याला ट्रायमिथाइलअमिनुरिया (टीएमए) असे म्हटले जाते. `ट्रायमिथाइलअमाइन` अधिक प्रमाणात स्रवल्यामुळे हा परिणाम दिसून येत असतो. कोलाइनची मात्रा अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे टीएमए तयार होतो. सोया, राजमा, अंडी यामध्ये कोलाइनचे प्रमाण चांगले असते.  शारीरिक स्वच्छता ठेवल्यानंतरही काही जणांच्या चयापचयाच्या प्रक्रियेतील बिघाडामुळे आणि टीएमएमुळे घामाला दुर्गंध घेत असल्याचे पॉल वाइस यांचे म्हणणे आहे. वाइस हे फिलाडेल्फियातील मोनेल केमिकल सेन्स सेंटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ते अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रायमिथाइलअमिनुरिया अर्थात टीएमएचा उपचार विशिष्ट चाचणीशिवाय शक्य नाही. `एफएमओ ३` या जनुकामध्ये बिघाड झाल्याने ट्रायमिथाइलअमिनुरिया होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. टीएमएला स्वतःचा असा तीव्र गंध असतो. परंतु, ट्रायमिथाइलअमिनुरियाचा त्रास असलेल्यांपैकी केवळ १० ते १५ टक्के लोकांच्या घामाला तीव्र दुर्गंध येतो. जनुकातील बदल किंबा बिघाड हा आई-वडिलांकडून मुलांकडे येऊ शकतो. इक्वेडोर आणि न्यू गिनीमधील लोकांमध्ये `एफएमओ ३` ही जनुकांतील बदल मोठ्या प्रमाणात असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. ब्रिटिश श्वेतवर्णियांपैकी एक टक्के लोकांमध्येही हा बदल दिसून आल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जगभरातील बऱ्याच मोठ्या लोकसंख्येमध्ये हे बदल असू शकतात, मात्र त्यासाठी प्रत्यक्ष संशोधनाची गरज वाईस व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

वाइस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध गटांवर आपले प्रयोग केले. त्यांनी लोकांना पेय पदार्थांमध्ये कोलाइन मिसळून पिण्यास दिले. त्यानंतर त्यांच्या मूत्राचे नमुने तपासले. तेव्हा सुमारे साडेतीन टक्के लोकांनी माशासारखा दुर्गंध येत असल्याची तक्रार केली. 

ट्रायमिथाइलअमिनुरियाचा त्रास आहे का नाही हे  तपासण्याचे काम अमेरिकेतील काहीच प्रयोगशाळांमध्ये होते. परंतु, आपल्या शरीराला किंवा घामाला दुर्गंध येऊ नये यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे गरजेचे आहे, असे वाइस यांचे म्हणणे आहे. कोलाइन हे पेशींची वाढ, चयापचय क्रिया आदींसाठी गरजेचे असते. आपल्या यकृतातही ते काही प्रमाणात तयार केले जाते. परंतु, खाद्यपदार्थांतून ते सर्वाधिक प्रमाणात शरीरात येते. याचे प्रमाण बिघडले की दुष्परिणाम दिसून येतात, असे वाइस यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about Body odor

Tags
टॉपिकस
Topic Tags: