सर्च रिसर्च : लॉकडाउन नि वेळेचे बदललेले गणित! 

महेश बर्दापूरकर 
Thursday, 28 May 2020

लोक दोन प्रकारे वेळेचे आकलन करतात. निम्मे लोक आपण स्थिर असून, भविष्य आपल्या दिशेने येत आहे,अशी कल्पना करतात, तर उरलेले आपण भविष्याच्या दिशेने प्रवास करतो आहे, असा विचार करतात.

लॉकडाउनमुळे अनेक जण घरातच अडकले आहेत. आता यामधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरवात झाली आहे. लॉकडाउनचा सुमारे साठ दिवसांचा कालावधी अत्यंत वेगाने निघून गेल्याचे प्रत्येकालाच जाणवत असेल. मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाला आणि अत्यंत कंटाळवाणा, सहनशक्तीचा अंत पाहणारा हा काळ अगदी लवकर संपला आणि आता मे महिन्याचा शेवट आला आहे, यावर अनेकांचा विश्वासही बसत नाही. यामागचे नक्की कारण काय, यावरच्या अंतिम निष्कर्षापर्यंत संशोधक अद्याप आलेले नाहीत. मात्र काही नव्या आठवणी निर्माण न झाल्यास गेलेला काळ आपल्या लक्षात राहत नाही. लॉकडाउनमध्ये कोणत्याही नव्या व लक्षात राहणाऱ्या आठवणी निर्माण न झाल्याने हा कालावधी लगेच निघून गेल्याचे जाणवत असल्याचे संशोधकांचे मत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मानसोपचारतज्ज्ञ क्‍लॉडिया हेमंड यांच्या मते, ""मनुष्य वेळेचा विचार कॅलेंडर किंवा घड्याळापेक्षा स्वतःच्या अनुभवातून अधिक करीत असतो. तुम्ही मित्राबरोबर गप्पा मारीत घालवलेली वीस मिनिटे अगदी वेगाने निघून जातात, तर तीच वीस मिनिटे रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर वाट पाहण्यात घालवल्यास संपता संपत नाहीत. मनुष्य जाणारा वेळ दोन प्रकार मोजत असतो. प्रॉस्पेक्‍टिव्ह (वेळ आता या क्षणी किती वेगाने पुढे जात आहे.) आणि रेट्रोस्पेक्‍टिव्ह (मागील आठवड्यात किंवा गेल्या दशकात वेळ किती वेगाने पुढे गेला.) लॉकडाउनच्या काळात लोक घरात बंदिस्त होते, आपले ऑफिसचे काम, मित्र यांच्यापासून दूर होते. या काळात वेळ घालवणे अत्यंत कठीण जात होते. स्वयंपाकघरात प्रयोग करणे, बागकाम करणे, "झूम' कॉल करणे यांमध्ये लोक वेळ घालवत होते. मात्र, प्रत्येक दिवस आणि त्यातील प्रत्येक क्षण एकाच ठिकाणी, म्हणजे घरातच घालवत असल्याने सगळेच दिवस सारखेच वाटू लागतात. त्यामुळे अनेकांना कामाचे दिवस आणि आठवड्याची सुटी यातही फरक करता येत नव्हता. या काळात नव्या आठवणींची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली. वेळेची समज व अंदाज येण्यात आठवणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही एखाद्या नव्या शहरात आठवड्यासाठी सहलीला जाता व तेव्हा सर्व गोष्टी आणि अनुभवही नवे असल्याने ते दिवस अत्यंत वेगाने निघून जातात. घरी परत आल्यावर मागे वळून पाहिल्यास तुम्हाला अनेक नवीन आठवणी निर्माण झाल्याचे जाणवते व तुम्ही एक आठवड्यापेक्षा खूप अधिक काळासाठी बाहेर होता, असेच वाटते. लॉकडाउनच्या काळात नेमके याच्या उलट घडले आहे. आठवड्याच्या शेवटी मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवते, की या कालावधीत अत्यंत कमी आठवणी निर्माण झाल्या व वेळ अगदी उडून गेला! असाचा अनुभव तुरुंगात डांबले गेलेल्यांना किंवा मोठा काळ आजारपणात घालवलेल्यांनाही येतो.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

मानसोपचारतज्ज्ञ लेरा बोरोडिस्की यांच्या मते, ""आणखी काही महिन्यांनी लॉकडाउनच्या काळाचे वर्णन करायला सांगितल्यास तुम्हाला गोष्टी वेगळ्या करून सांगणे अवघड जाऊ शकते. आम्ही याला "फ्लॅशबल्ब मेमरी' म्हणतो. खूप मोठी घटना घडल्यानंतर असे घडणे स्वाभाविक असते. लोक दोन प्रकारे वेळेचे आकलन करतात. निम्मे लोक आपण स्थिर असून, भविष्य आपल्या दिशेने येत आहे, अशी कल्पना करतात, तर उरलेले आपण भविष्याच्या दिशेने प्रवास करतो आहे, असा विचार करतात. "आपली बुधवारची बैठक दोन दिवसांनी पुढे गेली आहे,' असे सांगितल्यावर पहिल्या प्रकारचे लोक "ती आता सोमवारी आहे', असे उत्तर देतील; तर दुसऱ्या प्रकारचे लोक सांगतील "शुक्रवारी'. यातील नक्की बरोबर उत्तर कोणते यावर अभ्यासाची गरज असली, तरी लॉकडाउनने अनेकांना "सोमवार' या उत्तराचे लोक बनवले आहे, हे नक्की...'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Search research article about changing time in life due to lockdown