सर्च-रिसर्च : मत्स्याहार जरा जपूनच!

महेश बर्दापूरकर
Thursday, 17 December 2020

भाज्या व इतर अन्नघटकांमध्ये पारा काही प्रमाणात असतोच; एका अभ्यासानुसार मानवी शरीरात पारा येण्याचे प्रमाण माशांमधून सर्वाधिक म्हणजे ७८टक्के असते.तो मातेच्या शरीरात गेल्यास मुलांच्या वाढीवर परिणाम होतो

आहारातील काही घटकांचे फायदे काळानुसार बदलतात, असे संशोधनांतून पुढे येते आहे. याचे आदर्श उदाहरण मासे ठरावेत. मासे खाणे तब्येतीसाठी उत्तम असल्याचे प्रत्येक जण मान्य करतो. मात्र, बदलते पर्यावरण, प्रदूषण यांमुळे माशांच्या पोटात काही रासायनिक घटक जातात व त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर होतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘फूड ॲण्ड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन’च्या अहवालानुसार माशांचा खाद्यदर्जा १९७४ मधील ९० टक्‍क्‍यांवरून आज ६६ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. समुद्रातील पारा आणि इतर प्रदूषित घटकांमुळे मासे खाणे गर्भवती व बाळांना पाजणाऱ्या महिलांसाठी घातक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

ब्रिटनमधील संशोधक जोनाथन नेपियर यांच्या मते, ‘‘पाण्यातील पॉलिक्‍लोनिरेटेड बायफिनाइलचे (पीसीबी) प्रमाण ही सर्वाधिक चिंताजनक गोष्ट आहे. या पदार्थाचा उद्योगांतील वापर १९८०मध्ये थांबविण्यात आला असला, तरी जगभरात माती आणि पाण्यात तो मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. ‘पीसीबी’ हे डेअरी उत्पादने आणि पिण्याच्या पाण्यातही आढळत असले, तरी त्याचे प्रमाण माशांत सर्वाधिक आढळते. हे प्रमाण कमी करण्याचा म्हणजे मत्स्यशेतीच्या माध्यमातून मिळवलेले मासे खाणे. या माशांचे खाद्य घातक पदार्थ काढून घेतलेले असतात. मात्र, दरवेळी असे होत नाही. त्यामुळे गर्भवती महिलांनी ‘पीसीबी’चे प्रमाण अधिक असलेले रावस, सारडिन्स, खेकडा आणि सी बास हे मासे आठवड्यातून दोनदाच आहारात घ्यावेत.’’

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पारा ही मोठी समस्या
भाज्या व इतर अन्नघटकांमध्ये पारा काही प्रमाणात असतोच; मात्र एका अभ्यासानुसार मानवी शरीरात पारा येण्याचे प्रमाण माशांमधून सर्वाधिक म्हणजे  ७८ टक्के असते. तो मातेच्या शरीरात गेल्यास मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. त्याचबरोबर कर्करोग, मधुमेह व हृदयाचे आजारही मोठ्या प्रमाणात उद्‌भवतात. त्यामुळेच अमेरिकेच्या ‘फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन’ने (एफडीए) गर्भवती महिलांनी हॅलिबूट, ट्युना आदी चविष्ट मासे आठवड्यातून एकदाच खावेत, असा सल्ला दिला आहे. नेपिअर मात्र हा मुद्दा खोडून काढतात. त्यांच्या मते, ‘‘पाऱ्याची समस्या मोठ्या कालावधीसाठी जगणाऱ्या माशांमध्येच निर्माण होते. स्वॉर्डफिश हा मासा १५ ते २० वर्षे जगतो. त्याच्या शरीरातील पाऱ्याचे प्रमाण ०.९९५ पीपीएम असते, तर रावस या चार ते पाच वर्षे जगणाऱ्या माशाच्या शरीरात ०.०१४ पीपीएम. त्यामुळे कोणता मासा खाता, हे पाहणे आवश्‍यक ठरते.’’ मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्यातील पाऱ्याचे प्रमाणही वाढत जाईल, असे काही संशोधक सांगतात.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फायदे ‘ओमेगा ३’चे
रावस, ट्युनासारख्या माशांमध्ये इकोसापेंटेनॉईक ॲसिड (ईपीए) व डोकोसाफेक्‍सॅयेनायिक ॲसिड (डीएचए) ही महत्त्वाची ‘ओमेगा ३’ ॲसिड असतात व त्यामुळे हृदयासंबंधीच्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. जवस आणि अक्रोडमध्ये या ॲसिड्‌सचे प्रमाण विपुल असते; मात्र त्यावर अद्याप पुरेसे संशोधन झालेले नाही. वरील दोन्ही ॲसिड्‌स समुद्री शैवालामध्ये अधिक प्रमाणात आढळतात. नेपियर यांच्या मते, ‘‘चयापचयामध्ये ‘ईपीए’ आणि ‘डीएचए’ची महत्त्वाची भूमिका असते; मात्र मानवी शरीर ते निर्माण करू शकत नाही. ‘डीएचए’ आपल्या मेंदू, रेटिना व इतर उतींमध्ये मोठ्या प्रमाणावर असते. ‘ईपीए’च्या जोडीने ते हृदयाचे आजार, कर्करोग व मधुमेह यांचा सामना करतात. पाऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘ओमेगा ३’ सप्लिमेंट्‌स घेण्याचा सल्ला दिला जातो; मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे संशोधक ली हूपर यांच्या मते, ‘‘लोकांना ‘ओमेगा ३’ सप्लिमेंट्‌सपासून खूपच कमी फायदा झाल्याचे आढळले आहे. आमच्या पाहणीत ३३४ जणांनी चार ते पाच वर्षांसाठी ‘ओमेगा ३’ सप्लिमेंट्‌स घेतल्या; मात्र त्यातील एकालाच हृदयाचा आजार जडला नाही. त्यामुळे मासे खाण्याला पर्याय नाही. संशोधकांनी ‘ओमेगा ३’ला पर्याय असलेले वनस्पतीजन्य खाद्यपदार्थ शोधणे ही काळाची गरज आहे.’’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about highest levels of mercury in the human body are 78percent in fish