
जर्मनीतील सारलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून आश्चर्यकारक माहिती पुढे आली आहे. काही माणसे आपल्या कानांचे स्नायू विशिष्ट पद्धतीने हालवू शकतात. प्रत्येकाला ते जमत नाही.
सळसळण्याचा, तडतडण्याचा अत्यंत बारीक आवाज जरी झाला, किंवा संपूर्ण शांतता असताना एखादी टाचणी पडल्याचा आवाज झाला, तरी निमिषार्धात श्वानांचे किंवा मांजरांचे कान त्या दिशेने वळतात. माकडांच्या काही प्रजातीही आवाजाच्या दिशेने कान वळवू शकतात. ससा २७० अंशांत कान वळवू शकतो. वटवाघळे अल्ट्रासोनिक ध्वनी ऐकू शकतात, ‘ग्रेटर वॅक्स मॉथ’ वटवाघळापेक्षा १०० हर्टझनी जास्त तरंगलांबी असलेल्या ध्वनिलहरी ऐकू शकतो. हत्ती आपल्या मोठ्या कानांनी पावसाची किंवा वादळाची चाहूल ऐकू शकतात, तर घुबडे दोन कानांनी दोन वेगवेगळे ध्वनि ऐकू शकतात. अनेक प्राण्यांमध्ये ही क्षमता असते. पण, आवाजाच्या दिशेने माणूसही कान वळवू शकतो का ? याचे सर्वसाधारण उत्तर नाही असेच आहे. पण माणसामध्येही अशा प्रकारची क्षमता असल्याचे एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जर्मनीतील सारलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून आश्चर्यकारक माहिती पुढे आली आहे. काही माणसे आपल्या कानांचे स्नायू विशिष्ट पद्धतीने हालवू शकतात. प्रत्येकाला ते जमत नाही. त्याच पद्धतीने सूक्ष्म आवाजाच्या दिशेने कान वळविण्याचे कसब माणसामध्ये अद्याप शिल्लक आहे. आपले कानही सूक्ष्म आवाजाच्या दिशेने वळू शकतात आणि ही प्रक्रिया नकळत, सहजपणे घडते. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे हे झालेले असते. ही क्रिया सूक्ष्म असते व दिसून येत नाही. कोणताही वेगळा आवाज आला की आपल्या कानाच्या आजूबाजूचे स्नायू सक्रिय होतात. संपूर्ण लक्षही त्या आवाजाकडे जाते. मेंदूकडून आलेल्या संदेशाप्रमाणे हे घडत असते. कानाच्या हालचालीसाठी शरीरातील विद्युत-रासायनिक क्रियांसाठी कारणीभूत असते, असे सारलँड विद्यापीठातील `सिस्टिम्स न्यूरोसायन्स अँड न्यूरोटेक्नॉलॉजी युनिट`चे प्रमुख प्रा. डॅनियल स्ट्रॉस यांनी स्पष्ट केले. स्ट्रॉस यांच्याच नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. कानांची लहानातील लहान हालचाल टिपण्यासाठी संशोधकांनी विविध सेन्सरचा वापर केला. त्यातून स्नायूंमधील विद्युत हालचाली नोंदविण्यात आल्या. बाह्य कानाच्या आकारातील बदल किंवा हालचाल त्याद्वारे टिपण्यात आली. तसेच याचे व्हिडिओ चित्रिकरणही करण्यात आले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
``कानांची (बाह्य कानांची) हालचाल करण्याची क्षमता मानवाने अद्याप टिकवून ठेवली असावी. अशी क्षमता अडीच कोटी वर्षांपूर्वी मानवाला पूर्णत्वाने होती. ही क्षमता का व कशामुळे लोप पावली हे मात्र कळालेले नाही,`` असे स्ट्रॉस यांनी म्हटले आहे. हे संशोधन ‘इ-लाइफ’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. एका प्रयोगात एका लयीतील वाचन करण्यास काही जणांना सांगण्यात आले. ते सुरू असताना विविध दिशांनी वेगवेगळे पण, वैशिष्ट्यपूर्ण आवाज ऐकविण्यात आले. त्यानुसार कानांच्या स्नायूंची होणारी प्रतिक्षिप्त क्रिया नोंदविण्यात आली. याशिवाय काही जणांना एक गोष्ट मोठ्या आवाजात वाचण्यास सांगण्यात आले, तर त्याचेवेळी त्यांच्या दुसऱ्या बाजूला दुसरी गोष्ट दुसऱ्याला मोठ्या आवाजात वाचण्यास सांगण्यात आले. त्या दुसऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाते का? कशा पद्धतीने केले जाते? त्यावेळी कानाच्या स्नायूंच्या हालचाली कशाप्रकारच्या असतात हे नोंदविण्यात आले. यातून लक्ष्याधारीत सजगता तपासण्यात आली. दोन्ही चाचण्यांच्यावेळी कानातील स्नायू आवाजाच्या दिशेने वळल्याचे दिसून आले. कानांच्या स्नायूंचा विकास कसा झाला याचा मूलभूत अभ्यास यातून करण्याची प्रेरणा संशोधकांना मिळाली. त्याचबरोबर या अभ्यासाचा उपयोग ऐकू येण्यासाठीची यंत्रे तयार करण्यासाठी होऊ शकेल, असा विश्वास संशोधकांना वाटतो. कानाच्या स्नायूंमधील हालचाली मिलिसेकंदात नोंदविणारी आवाज कोणत्या दिशेने येत आहे, याचा वेध घेणे नव्या यंत्रांमध्ये घेणे शक्य होऊ शकेल. ही यंत्रे संगणकीकृत करता येऊ शकतील.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा