सर्च रिसर्च : मास्कच रोखेल फैलाव 

महेश बर्दापूरकर 
Wednesday, 13 May 2020

"कोरोना'चा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमावलीत सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापर या अनिवार्य गोष्टी आहेत. मास्कमुळे विषाणूचा फैलाव निश्‍चितपणे नियंत्रणात येईल.

जगभरात सलग दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर जनजीवन काही प्रमाणात पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. "कोरोना'चा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमावलीत सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापर या अनिवार्य गोष्टी आहेत. यातील मास्कमुळे विषाणूचा फैलाव निश्‍चितपणे नियंत्रणात येईल आणि मृत्यूदर 65 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करता येईल, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

"कोरोना'पूर्वीच्या काळात काही देशांतील लोक मास्कचा वापर करीत होते आणि जग त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहात होते. मात्र, आता विषाणूला आटोक्‍यात ठेवण्याचा तोच एक मार्ग असल्याचे समोर येते आहे. संसर्गजन्य आजारांतील तज्ज्ञ ख्रिस केन्यॉन यांच्या मते, ""सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केलेल्या देशांनी त्यांचा रुग्णवाढीचा आलेख सपाट करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये आशियातील देशांना मिळालेले यश सर्वाधिक आहे व त्याचे कारण अद्याप समजलेले नाही. "कोविड- 19' सारखे विषाणू संसर्ग झाल्यावर व्यक्तीच्या शरीरातील पेशी "हायजॅक' करून त्यांचा उपयोग आपल्या पेशी वाढविण्यासाठी करतात. हे विषाणू नंतर पेशीमधून फुटून बाहेर पडतात आणि व्यक्तीच्या फुफ्फुस, तोंड व नाकातील द्रव्यात पसरतात. व्यक्ती खोकताच या छोट्या कणांचा (एरोसोल्स) विषाणूंनी भरलेला फवारा हवेत उडतो. एकदा खोकल्यावर हवेत उडणाऱ्या कणांची संख्या तीन हजारांपर्यंत असते व नव्या संशोधनानुसार बाधित व्यक्ती बोलल्यासही हे कण हवेत पसरतात. हे कण कोणत्या पृष्ठभागावर किती काळासाठी राहतात, याबद्दल आता माहिती मिळाली आहे. हा विषाणू हवेत सोळा तासांपर्यंत जिवंत राहतो व त्या हवेत कोणीही श्वास घेतल्यास त्याला संसर्ग होऊ शकतो.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनमधील 318 ठिकाणी "कोविड- 19'चा विषाणू कसा पसरला याच्या आकडेवारीनुसार, विषाणूचा संसर्ग इनडोअर वातावरणात, म्हणजेच घरे, सार्वजनिक वाहतूक, हॉटेल, चित्रपटगृहे आणि दुकानांमध्येच झाला आहे. यातील फक्त एकाच केसमध्ये व्यक्ती रस्त्यावर असताना संसर्ग झाल्याची नोंद आहे. हवा खेळती नसलेल्या ठिकाणी शेजारी बसलेल्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग लगेचच होतो, असेही आढळले. ""गर्दीच्या ठिकाणी व विशेषतः सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी मास्कचा वापर केल्यास संसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. आदर्श सर्जिकल मास्क "कोरोना'सारख्या विषाणूच्या संसर्ग झालेल्या व्यक्तीचा खोकला अथवा श्वासोच्छ्वासाद्वारे परसरणाऱ्या विषाणूला मोठ्या प्रमाणावर रोखू शकतो,'' असा निष्कर्ष हॉंगकॉंग विद्यापीठातील संशोधक बेन काउलिंग यांनी या आकडेवारीवरून काढला आहे. 

मास्क आणि विषाणूचा आकार 
एका पाहणीनुसार, 6 ते 18 टक्के रुग्णांत "कोरोना'च्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. असे रुग्ण स्वतः आजारी पडण्याआधी अनेकांना बाधित करतात. त्यामुळे समूह संसर्ग रोखणे अवघड बनते. ""संसर्ग झालेल्या व न झालेल्यांनी घरातच बनवलेला मास्क वापरल्यास संसर्गाचे प्रमाण कमी होईल. "एन- 95'सारखे मास्क 0.3 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराचे हवेतील 95 टक्के कण रोखतात. "कोविड -19'चे विषाणू 0.07 ते0 .09 मायक्रोमीटर आकाराचे असल्याने या मास्कने सहज रोखता येतात. मात्र, "एन-95' ची उपलब्धता पाहता, ते उपचार करणारे डॉक्‍टर आणि परिचारिकांसाठी गरजेचे ठरतात. सर्वसामान्य लोकांनी चांगला थ्रेड काउंट असलेला कोणताही मास्क, ज्यात घडी घातलेल्या रुमालाचाही समावेश होतो, वापरल्यास विषाणूचा प्रसार रोखता येतो,'' असे काउलिंग सांगतात. ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या पाहणीनुसार, लोकांनी साधे, घरी बनवलेले मास्क वापरले असते, तरी न्यूयॉर्क शहरातील मृतांचा आकडा दोन महिन्यांत 17 ते 45 टक्‍क्‍यांनी कमी झाला असता. अगदी वीस टक्के परिणामकारक मास्क वापरूनही वॉशिंग्टनमधील मृतांचा आकडा 24 ते 65 टक्‍क्‍यांनी, तर न्यूयॉर्कमधील हा आकडा 2 ते 9 टक्‍क्‍यांनी कमी झाला असता. थोडक्‍यात, लॉकडाउननंतरच्या काळात मास्कचा वापर "कोरोना'ला पसरण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Search Research article about Mask will prevent corona infection