सर्च रिसर्च :  ...हर एक विषाणू जरुरी होता है! 

Microorganisms
Microorganisms

कोरोनाच्या विषाणूने सर्व जगाला वेठीस धरले असून, तो लाखो लोकांसाठी जीवघेणा ठरला आहे. त्यावर लस शोधण्यासाठी, तो कायमचा नष्ट होण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्नशील आहेत. या परिस्थितीत एखादी जादूची कांडी फिरावी आणि जगातील सर्व विषाणू नष्ट व्हावेत, असे कोणालाही वाटू शकते. मात्र, संशोधकांच्या मते सर्व विषाणूंचे नष्ट होणे मानवजातीसाठी आपत्ती ठरेल. ""हे जग विषाणूविना एक ते दीड दिवसांसाठी स्वर्गासमान असेल, मात्र त्यानंतर कोणीही जिवंत नसेल'', असा इशारा टोनी गोल्डबर्ग हे विस्कोसीन-मेडिसन विद्यापीठातील संसर्ग आजारांचे तज्ज्ञ देतात. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विषाणू मानवासाठी अनेकदा जीवघेणे ठरले आहेत. सध्या "कोविड-19'चा संसर्ग वाढत चालला असून, विषाणूंचे असे हल्ले भविष्यातही होत राहणार आहेत. मात्र, विषाणू अशा वाईट गोष्टींबरोबरच मानवजातीसाठी अगणित चांगल्या गोष्टीही करतात. बहुतांश विषाणू मानवासाठी रोगजनक नसतात, उलट ते परिसंस्थेच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, तर काही विषाणू हे बुरशी आणि झाडांपासून कीटक आणि मनुष्यापर्यंतच्या सजीवांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी कार्यरत असतात! ""आपण एका समतोल, परिपूर्ण वातावरणात राहतो. विषाणू त्याचाच एक भाग आहेत. त्यांच्याशिवाय आपले अस्तित्व अशक्‍य आहे'', असे मेक्‍सिकोमधील राष्ट्रीय विद्यापीठातील विषाणूतज्ज्ञ लोपेज चॅरिटॉन सांगतात. संशोधक आता मानवाला पूरक अशा विषाणूंचाही अभ्यास करीत आहेत. त्यातील हजारोंचे वर्गीकरण झाले आहे, मात्र लाखोंचे बाकी आहे. सांख्यिकीच्या आधारे विचार केल्यास यांतील घातक विषाणूंची संख्या जवळपास शून्य येते. ""जीवाणूंना संसर्ग करणारे विषाणू खूप महत्त्वाचे ठरतात. ते विषाणूंचे सर्वांत मोठे भक्षक ठरतात व तसे न झाल्यास मनुष्य संकटात येऊ शकतो. समुद्रात अस्तित्वात असलेले 90 टक्के सूक्ष्मजीव पृथ्वीसाठी आवश्‍यक 50 टक्के ऑक्‍सिजनची निर्मिती करतात. ही प्रक्रिया विषाणूंमुळे शक्‍य होते. हे विषाणू रोज समुद्रातील 20 टक्के सूक्ष्मजीव व 50 टक्के जीवाणू नष्ट करतात. सूक्ष्मजीव नष्ट झाल्याने पाण्यात तरंगून ऑक्‍सिजनची निर्मिती करणाऱ्या "प्लॅंक्‍टोन'ना प्रकाश संश्‍लेषणाच्या क्रियेसाठी पुरेसे खाद्य मिळते व परिणामी पृथ्वीवरील जीवसृष्टी शाबूत राहते. मृत्यू नसेल, तर जीवनही नसेल. जीवनचक्र पुनर्निर्मितीवर चालते व त्यात विषाणू महत्त्वाची भूमिका बजावतात,'' असे गोल्डबर्ग स्पष्ट करतात. 

किटाणूंचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना अनेक प्रजातींच्या नियंत्रणासाठी विषाणू महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे लक्षात आले आहे. ""एखाद्या प्रजातीची संख्या प्रमाणाबाहेर वाढल्यास एखादा विषाणू येतो आणि त्यांना संपवून टाकतो. हा परिसंस्थेतील अत्यंत नैसर्गिक भाग आहे. या प्रक्रियेला "किल द विनर' असे म्हणतात. ही प्रक्रिया मानवासह अनेक प्रजातींमध्ये घडत असते आणि सध्याची महामारी त्याचेच एक उदाहरण आहे. लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यास विषाणूंच्या आवृत्त्या वेगाने तयार होतात आणि लोकसंख्या कमी करून इतरांना जिवंत राहण्यासाठी जागा तयार करतात. विषाणूच नष्ट झाल्यास प्रतिस्पर्धी प्रजाती वेगाने वाढतील व बाकीच्यांचे मोठे नुकसान करतील. आपण पृथ्वीवरील जैवविविधता वेगाने नष्ट करीत आहोत. त्यामुळे केवळ काही प्रजातीच इतरांचा ताबा घेण्याची भीती निर्माण झाली आहे'', असे पेन स्टेट विद्यापीठातील विषाणूतज्ज्ञ मर्लिन रोसिन्क सांगतात. 

काही प्रजाती जिवंत राहण्यासाठी किंवा स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी विषाणूंवर अवलंबून असतात. मनुष्य आणि इतर प्राण्यांच्या शरीराला पूरक सूक्ष्मजीवांसाठी विषाणू महत्त्वाचे असतात, असेही संशोधकांना वाटते. ही बाब अद्याप नीट लक्षात आलेली नसली, तरी विषाणू मानवी परिसंस्था व पर्यावरणातील अविभाज्य घटक असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. रोसिन्क आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गवतावर वाढणारी बुरशी व तिला संसर्ग करणाऱ्या विषाणूचा शोध लावला. बुरशी, विषाणू व गवत एकत्र असल्यामुळेच उष्ण जमिनीवर गवत उगवू शकले, केवळ बुरशीमुळे ते शक्‍य नव्हते असा निष्कर्ष त्यांनी काढला. थोडक्‍यात, परिसंस्था सुरू राहण्यासाठी विषाणू महत्त्वाचे आहेत, अगदी "कोरोना'सुद्धा... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com