सर्च रिसर्च : अंतराळ प्रवास आणि रक्ताच्या गाठी 

blood-clothing
blood-clothing

तुम्ही घरात किंवा एखाद्या जागी अडकून पडले आहात. दररोज एक तास व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तुमच्या सगळ्या नातेवाईंकापासून तुम्हाला वेगळे राहावे लागते आहे. कोणाशी भेटीगाठी नाहीत. कदाचित पुढचे काही महिने असेच राहावे लागणार आहे. हे वर्णन ओळखीचे वाटततेय का? सध्याच्या लॉकडाउनला लागू होणारे हे वर्णन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील अवकाशवीरांनाही लागू पडते. प्रत्यक्षात विचार करायचा झाला तर अवकाशातमध्ये शारीरिक इजा होण्याचा धोका अधिक असतो. या वर्षाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये असलेल्या एका अंतराळवीराच्या शरीरात रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या. अवकाशात अशा प्रकारचा शारीरिक त्रास होण्याची ही पहिलीच वेळ होती. पृथ्वीवर एक हजार लोकांमध्ये एकाला अशा प्रकारचा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. अवकाशात असताना रक्तात गाठी होण्याचा त्रास पुन्हा उद्‍भवू शकतो, असे नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ‘एरोस्पेस मेडिसिन अँड ह्युमन परफॉरमन्स’ या नावाने केलेल्या अभ्यासात याबाबतचे तपशील नोंदविण्यात आले आहेत. तसेच हा धोका कमी कसा करता येऊ शकेल, याबाबतही त्यात निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. लंडनमधील किंग्ज कॉलेजमधील वर्षा जैन, आर. प्लोउट्झ-सिंडर, एम. यंग, जे.एम. चार्व्हेट, व्ही. ई. वोटरिंग यांनी हा अभ्यास केला आहे. 

पृथ्वीवर असताना रक्तात गाठी निर्माण झाल्या की त्याचा परिणाम फुप्फुसांवर (पल्मनरी एम्बोलिझम) मोठ्याप्रमाणावर होतो. त्यामुळे श्वासोच्छ्वासाला त्रास होतो किंवा पायांना (डीप व्हेन थ्रोंबोसिस) होतो. त्यामुळे पाय सुजतात, दुखतात. अवकाशामध्ये अंतराळवीराला हा त्रास झाला तो मानेमध्ये. त्याच्या मानेमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या. पृथ्वीवरील डॉक्टरांनी इंजेक्शन आणि तोंडाने घेण्याची औषधे कोणती वापरायची हे सांगितले. त्यामुळे जीवाचा संभाव्य धोका टाळता आला. 

रक्तात गाठी होणे हे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात येऊ शकतो. यावर उपचार आहेत. लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, अतिधूम्रपान अशा गोष्टींमुळे रक्तात गाठी होण्याची शक्यता वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अवकाशात असताना एका अवकाशवीराला रक्तात गाठी झाल्याने हा त्रास कसा रोखता येईल, याचा विचार सुरू झाला आहे. मंगळ किंवा त्यापुढील अंतरासाठी मानवी मोहिमा आखायच्या असतील, तर रक्तात होणाऱ्या गाठींवरील अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक महिला अंतराळवीर मासिकपाळी रोखण्यासाठी आणि हार्मोनमध्ये बदल होऊ नयेत म्हणून गोळ्यांचा वापर करतात. अशा गोळ्यांमुळे महिला अंतराळवीरांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शास्त्रज्ञांनी २००० ते २०१४ या कालावधीत अंतराळात गेलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी केली, तसेच त्यांच्या आधीच्या वैद्यकीय अहवालांचा अभ्यास केला व अवकाश भरारीनंतर त्यांच्या शरीरात कोणते बदल झाले व त्यांचा परिणाम म्हणून त्यांच्या रक्तात गाठी निर्माण होऊ शकतात का याचा अभ्यास केला. ज्या महिला दीर्घकाळ अवकाशात राहून आल्या होत्या, त्यांचे सरासरी वय ४४.६ वर्षे होते. या वयामध्ये पृथ्वीवर असताना महिलांना मासिक पाळी रोखण्यासाठी गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण त्यामुळे रक्तात गाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. केवळ अवकाश प्रवास केल्याने रक्तात गाठी होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. 

कोणत्याही अवकाश मोहीमेपूर्वी पुरुष व महिला अंतराळवीरांना कोणतीही शारीरिक इजा होऊ नये यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाचा कालावधी व वारंवारिता यांचा आढावा घेण्याची शिफारस शास्त्रज्ञांनी केली आहे. तसेच महिला अंतराळवीरांनी ऑस्ट्रेजेन आणि प्रोजेस्टीन या घटकांचा समावेश असलेल्या गोळ्या घेऊ नयेत असेही सुचविण्यात आले आहे. भविष्यातील मोहिमांसाठी विशेषतः महिला अंतराळवीरांसाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com