esakal | सर्च-रिसर्च : दिवाळीचा साखरविरहित फराळ!
sakal

बोलून बातमी शोधा

सर्च-रिसर्च : दिवाळीचा साखरविरहित फराळ!

खाद्यपदार्थ रुचकर असले, तरी त्यात असलेल्या साखरेमुळे कॅलरीजचा आकडादेखील फुगत जातो. त्यामुळे ज्यांना डाएट करायचं आहे किंवा ज्यांना साखरेवर नियंत्रण ठेवायचं असतं, त्यांची कुचंबना होते.

सर्च-रिसर्च : दिवाळीचा साखरविरहित फराळ!

sakal_logo
By
डॉ. अनिल लचके

फराळ हे दिवाळीचं खास वैशिष्ट्य आहे. लाडू, करंजी, चिरोटे, शंकरपाळे असे अनेक पदार्थ दिवाळीच्या फराळात असतात. भोजनातदेखील मिष्टान्न असतंच. खाद्यपदार्थ रुचकर असले, तरी त्यात असलेल्या साखरेमुळे कॅलरीजचा आकडादेखील फुगत जातो. त्यामुळे ज्यांना डाएट करायचं आहे किंवा ज्यांना साखरेवर नियंत्रण ठेवायचं असतं, त्यांची कुचंबना होते. एक ग्रॅम साखरेमध्ये ४ आणि एक ग्रॅम स्निग्ध पदार्थात ९ कॅलरी असतात. एक लाडू खाल्ला, की सहाजिकच अडीचशे कॅलरी पोटात जातात. पोटात जास्त प्रमाणात कॅलरी जाऊ लागल्या, की मेद आणि वजनही वाढतं. एक कॅलरी ‘जाळायची’ असेल, तर २५-३० पावलं चालावं लागतं. पण, सणासुदीला गोडधोड नसेल, तर काय मजा येणार? ही अडचण लक्षात घेऊन काही महिलांनी आणि बल्लवाचार्यांनी कल्पकतेचा वापर केलाय. त्यांनी कॅलरीविरहित, गोड रासायनिक पदार्थांचा गोडवा वापरून फराळाचे पदार्थ किंवा मिष्टान्न तयार केली आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अस्पार्टेम हे अतिगोड रसायन अस्पारटिक आणि फेनिल अल्यानिन आम्लापासून तयार झाले आहे. याच्या पुडीचा रंग निळा असतो. सुक्रॅलोज हे रसायन आपल्या नेहमीच्या साखरेपासून तयार करतात. त्याची पुडी पिवळ्या रंगाची असते. काही हॉटेलमध्ये कृत्रिम गोड रसायनांच्या रंगीत पुड्या ठेवलेल्या असतात. त्याच्या रंगावरून गोड पदार्थाची ओळख पटते. ही दोन्ही रसायने साखरेच्या ३०० ते ५०० पट जास्त गोड असली, तरी त्यातील कॅलरी नगण्य असतात. अस्पार्टेम किंवा सुक्रॅलोजचा गोडवा वापरून शिरा, गुलाबजाम, रसमलाई, खीर, लाडू आणि बर्फी तयार करता येते. गरजेप्रमाणे त्यात थोडी नेहमीची साखर वापरता येते. यामुळे मिठाई गोड होते. पण, त्यात कॅलरी कमी असतात. दोन्ही रसायने कृत्रिम आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्टेव्हिया (मधुपर्णी) नावाची एक वनस्पती आहे. ही वनस्पती तुळशीसारखी दिसते; म्हणून तिला ‘मधुतुलसी’ असेही म्हणतात. स्टेव्हियाची पाने साखरेच्या ३०० पट जास्त गोड आहेत. या पानांच्या भुकटीपासून स्टेव्हिऑल नावाचे गोड रसायन अलग केले जाते. याच्या पुडीचा रंग हिरवट निळा असतो. त्याचा उपयोग ‘डाएट’ पेय गोड करण्यासाठी होतो. यात ‘कॅलरी’ नसतात. पण, ‘पोषक मूल्य’ नसल्याने त्यांना तज्ज्ञ ‘एम्प्टी कॅलरीज्‌’ म्हणतात. हे कृत्रिम गोड रासायनिक पदार्थ ‘एफडीए’ या मान्यताप्राप्त संस्थेने मंजूर केले आहेत. या रसायनांना ‘ग्रास’ (जनरली रिगार्डेड ॲज सेफ) सर्टिफिकेट मिळालेले आहे. साहजिकच, कृत्रिम गोड पदार्थांनी बनविलेल्या खाद्यपदार्थांचा प्रसंगी माफक प्रमाणात आस्वाद घ्यायला हरकत नाही. फक्त ‘फेनिल केटोन युरिया’ नामक दुर्मीळ जन्मजात विकृती असलेल्यांना अस्पार्टेम चालत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आता साखरविरहित मिठाई बाजारात मिळू शकते. आपल्याकडे खारकेची भुकटी मिळते. त्याचा वापर करता येतो. बाजारात खजूर बर्फी, खजूर मिठाई मिळते. काही गृहिणी मनुके, सुके अंजीर, खजूर, सुकामेवा वापरून घरी शर्कराविरहित किंवा थोडी साखर अथवा गूळ वापरून मिठाई तयार करतात. खजुराचा गोडवा मुख्यत्वे फ्रुक्‍टोज आणि मॅनोज शर्करांमुळे येतो. त्यात अँटिऑक्‍सिडंट रसायने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तंतुमय पदार्थ आहेत. खजुराचा ‘ग्लायसेमिक इंडेक्‍स (जी आय) कमी आहे. एखाद्या (गोड) पदार्थाची रक्तातील साखर वाढविण्याची क्षमता किती आहे, ते ग्लायसेमिक इंडेक्‍सचा आकडा सूचित करतो. यात शून्य ते शंभर आकडे असतात. ग्लुकोजचा ‘जी आय’ शंभर मानतात. खजुराचा जी आय ४२, मधाचा ६१, तर फ्रुक्‍टोजचा केवळ १५ आहे. हे पदार्थ गोड असले, तरी ते फारशी रक्त-शर्करा वाढवत नाहीत! मग कॅलरीजचा विचार थोडा वेळ दूर ठेवून ‘शुगर फ्री’ दिवाळी फराळाचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?