सर्च रिसर्च :  तुफान समझ पाओगे? 

सम्राट कदम 
Monday, 25 May 2020

जागतिक तापमानात जशी वाढ होत राहील तसे चक्रीवादळाचे रौद्र रूपही वाढत जाणार आहे.संशोधनातून हा धोका भविष्यात किती वाढत जाणार आहे,हे स्पष्ट होत नसले.चक्रीवादळांना समजून घेण्यासाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे.

तोड मरोड विटप लतिकाएँ, 
नोच सखोट कुसुम कलिकाएँ, 
जाता है अज्ञात दिशा को, हटो विहंगम उड जाओगे! 
तुम तुफान समझ पाओगे? 

चक्रीवादळांच्या परिणामाचे यथोचित वर्णन करणारे हे कडवे प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या  कवितेतील आहे. कवितेच्या शेवटी "अशी वादळे तुम्हाला समजणार तरी कशी?", असा प्रश्न कवी विचारत  आहे. ललित साहित्याच्या दृष्टीने जरी "चक्रीवादळ" ही एक उपमा असली तरी विज्ञानाच्या दृष्टीने ती एक  नैसर्गिक -भौतिक प्रक्रिया आहे. त्यामुळे विज्ञानाच्या कसोट्यांवर अशा चक्रीवादळांना समजून घेण्याचा प्रयत्न  शास्त्रज्ञांनी निश्‍चितच केला आहे. मागील चाळीस वर्षांपासून महासागरांमध्ये तयार होणाऱ्या आक्राळविक्राळ चक्रीवादळांचा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले आहे की, वर्षागणिक चक्रीवादळांची तीव्रता  आणि रुद्रावतार वाढत चालला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या "अम्फान' चक्रीवादळाने  ओडिशा आणि पश्‍चिवम बंगालच्या किनारपट्टीवर घातलेले थैमान आपण नुकतेच पहिले. 

"प्रोसिडिंग ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस'च्या शोधपत्रिकेत हे संशोधन नुकतेच प्रकाशित झाले आहे. मागील चाळीस वर्षामध्ये उपलब्ध उपग्रहांच्या चित्रफिती आणि माहितीच्या आधारे जगभरातील चक्रीवादळांचा अभ्यास यात करण्यात आला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आणि महासागरांचे वाढते तापमान  चक्रीवादळाच्या "आगी"त तेल ओतण्याचे काम करत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या संशोधनातील  शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्व करणारे डॉ. जेम्स कोस्सीन म्हणतात,""उपलब्ध मॉडेलिंग आणि सिम्युलेशनच्या  आधारे हवामानशास्त्राचा अभ्यास करताना जे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्यातून सतत तप्त होणाऱ्या पृथ्वीवर दुसरं काय घडणार, असा प्रश्न्‌ उभा राहतो.'' डॉ.कोस्सीन यांनी 2013मध्येही अशा प्रकारचे संशोधन केले होते. त्यावेळी त्यांनी 28 वर्षातील चक्रीवादळांचा अभ्यास केला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्याच्या संशोधनात 1979-2017 मध्ये महासागरांत तयार झालेल्या चक्रीवादळांचा अभ्यास केला आहे.  "इन्फ्रारेड इमेजेस"च्या आधारे चक्रीवादळ तयार होताना आणि नंतरच्या तापमानाचे विश्‍लोषण करण्यात आले. तापमानाचा चक्रीवादळाच्या तीव्रतेशी थेट संबंध असल्याचे लक्षात आले. त्यावरून चाळीस वर्षातील  चक्रीवादळांची तीव्रता तपासण्यात आली. चाळीस वर्षांपूर्वीच्या उपग्रहांची कार्यक्षमता आणि उपलब्ध माहितीचे योग्य संस्करण आणि पृथ्थकरण करण्यात शास्त्रज्ञांना थोडी जास्त डोकेफोड करावी लागली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दशकभराच्या अंतराने चक्रीवादळाच्या वर्तनामध्ये झालेला बदलही त्यांनी टिपला. म्हणजे 2014मध्ये  चक्रीवादळाचा प्रवास हा ध्रुवांकडे जास्त प्रमाणात होत होता. म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशात विकसित  झालेले चक्रीवादळ दक्षिण किंवा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करत होते. पूर्वी किनारपट्टीचे नुकसान तुलनेने  कमी होत होते. आता ते वाढले आहे. तसेच किनारपट्टीवर वाढत चाललेली मानवी वस्ती हेही यामागचे  मुख्य कारण आहे. जमिनीवर प्रवास करताना चक्रीवादळाचा वेग जरी कमी झाला असेल तरी त्यांची तीव्रता वाढलेली दिसते. वेळ जसा वाढत जाईल, तशी चक्रीवादळाची तीव्रताही अधिक वाढत जाते.  त्यामुळे शहरे आणि इतर व्यवस्थांना त्याचा धोका जास्त वाढला आहे. विशेष म्हणजे हे निष्कर्ष फक्त  जागतिक किंवा मोठ्या चक्रीवादळांसाठी नाही, तर छोट्यामोठ्या चक्रीवादळांना आणि स्थानिक पातळीवरही लागू होत आहे. जागतिक तापमानात जशी वाढ होत राहील तसे चक्रीवादळाचे रौद्र रूपही वाढत जाणार आहे. संशोधनातून माणसासाठी हा धोका भविष्यात किती वाढत जाणार आहे, हे स्पष्ट होत नसले. तरी,  चक्रीवादळांना समजून घेण्यासाठी हे एक मोठे पाऊल ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Search research article about Tropical cyclone

Tags
टॉपिकस
Topic Tags: