जीवनशैलीचा "टर्निंग पॉईंट' !

सम्राट कदम 
Monday, 20 April 2020

कधी नव्हे ते संपूर्ण जगाने,माणसाने स्वतःच्या सवयींमध्ये इतका मोठा बदल,तोही त्याच्या मानसिकतेच्या मानाने जलद केला आहे."कोरोना'वरील औषधाची अनुपलब्धता आणि प्रादुर्भावाचा वेग यामुळे माणूस हतबल झाला आहे.

औद्योगिक क्रांतीनंतर आधुनिक जगाबरोबरच नव्या जीवनशैलीलाही सुरुवात झाली. उद्योग आणि व्यापाराने समृद्ध बनलेल्या युरोपीय देशांनी जगावर वसाहतवाद लादला. त्यातून पौर्वात्य आणि पाश्‍चात्य जीवनशैलीबरोबरच तिसऱ्या जगातील निसर्गपूजक जीवनशैलीही आमनेसामने आली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माणसाच्या अतिमहत्वाकांक्षेने जीवन सुकर झाले, पण त्याचबरोबर दोन महायुद्धेही जगावर लादली गेली. पुढे काही काळ शीतयुद्धाच्या छायेखाली सारे जग होते. या सर्व प्रवासातून माणसाची आधुनिक जीवनशैली तर विकसित होत गेली, पण त्याच अनुषंगाने पर्यावरण आणि वसुंधरेचा ऱ्हासही वाढत गेला. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला इलेक्‍ट्रॉनिक आणि इंटरनेट क्रांतीने जगाचा दरवाजा ठोठावला आणि जगाच्या आधुनिकतेचा वेग प्रकाशाच्या गतीने वाढला. आज हा सगळे मांडण्याचे कारण हे की इथपर्यंतचा हा वेगवान प्रवास "कोविड-19'मुळे लॉकडाउन झाला आहे! 

कधी नव्हे ते संपूर्ण जगाने, विशेषतः माणसाने स्वतःच्या सवयींमध्ये इतका मोठा बदल, तोही त्याच्या मानसिकतेच्या मानाने जलद केला आहे. "कोरोना'वरील औषधाची अनुपलब्धता आणि प्रादुर्भावाचा वेग यामुळे माणूस हतबल झाला आहे. जगातील सर्वांत आधुनिक आणि परिपूर्ण जीवनशैली असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रांनीही "कोरोना'पुढे गुडघे टेकल्याचे चित्र आहे. सतत हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सभा- समारंभ टाळणे असे अनेक समाजशील उपक्रम बंद करावे लागले आहेत. माणसाच्या जीवनशैलीत झालेल्या या बदलांचा अभ्यास युरोप आणि अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. "आधुनिक इतिहासातील माणसाचे वर्तन बदलणारी ही सर्वात मोठी घटना आहे', असे विश्‍लेषण स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. रॉब विलर यांनी केले आहे. या संशोधनात जगभरातील वर्तनशास्त्राच्या चाळीस शास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. संशोधकांनी माणसाच्या वैयक्तिक जीवनशैलीबरोबरच राजकीय, आर्थिक आणि माध्यमांच्या निर्णयप्रक्रियेचाही शास्त्रीय अभ्यास केला आहे. आधुनिक संसाधने आणि तंत्रज्ञानाबरोबरच पारंपरिक विश्वासाची केंद्रे "कोरोना'च्या महामारीचा प्रकोप कमी करण्यात उपयोगी आली, याबद्दलचा आढावा यात घेण्यात आला. न्यूयॉर्क विद्यापीठातील जय वॅन बावेल म्हणतात,""फेसबुक आणि ट्‌विटर यांसारख्या आधुनिक समाजमाध्यमांनी कोरोनासंबंधीची जागृती आणि महत्त्वाचे निरोप पोचविण्यात केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर राजकीय रचनेलाही मोठी मदत केली आहे.'' "कोरोना'संदर्भात गैरसमज दूर करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या सातशे जणांच्या गटाचे नेतृत्व बावेल यांनी केले होते. अमेरिकेच्या प्रशासनापासून सीरियापर्यंतच्या अस्थिर देशांतील निर्णयांचा अभ्यास यात करण्यात आला. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांना नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा तेथील लोकांच्या राजकीय दृष्टीवर अवलंबून असल्याचे यातून समोर आले आहे. समाजामध्ये जागृतीसाठी आधुनिक संसाधनांबरोबरच ज्ञाती संस्थांमधील प्रतिष्ठित लोकांच्या सहभागाचाही फायदा लोकांचे वर्तन बदलण्यासाठी झाला. भारतातही जनजागृतीसाठी चित्रपट अभिनेते, क्रिकेटपटू, राजकीय नेत्यांबरोबरच धार्मिक गुरु, सामाजिक नेते आदींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला आहे. 

अचानक थांबलेल्या या जगामुळे माणूस पुन्हा अंतर्मुख झाला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनावश्‍यक जोपासलेल्या सवयींबद्दलही तो आता विचार करत आहे. तसेच, रोजच्या जगण्यातील आणि कामांपैकी खरोखरच अत्यावश्‍यक कामे कोणती आणि त्यासाठीचे नवे पर्यायही तो शोधत आहे. राजकीय नेत्यांसह प्रशासकीय लोकांच्या ऑनलाईन बैठकी, शिक्षकांचे ऑनलाईन क्‍लास, "वर्क फ्रॉम होम', कामाची बदललेली पद्धत हे त्याचेच द्योतक आहे. "कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेला जीवनशैलीतील हा बदल माणसाच्या जगण्याचे पैलू बदलेल, हे मात्र निश्‍चित... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about turning point of a lifestyle