सर्च-रिसर्च : मानवी अवकाश मोहिमांवरील प्रश्‍नचिन्ह

महेश बर्दापूरकर
Tuesday, 10 November 2020

अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यावर खर्च करण्याऐवजी आपण तो खर्च आपला विश्वाबद्दलचे मत बदलून टाकणाऱ्या रोबोटिक स्पेस सायन्स मोहिमांवर करायला हवा. अनेक अंतराळयाने मंगळाची छायाचित्रे आणि महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवत आहेत.

अवकाशातील ग्रह, ताऱ्यांबद्दल प्रत्येकाच्याच मनात सुप्त आकर्षण, उत्सुकता असते. त्यासाठी विविध देश आपल्या संशोधकांच्या मदतीने अवकाश मोहिमाही आखतात. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर (आयएसएस) जाऊन संशोधक अभ्यास करीत असतात. या केंद्राची पहिली पायरी म्हणून ‘झारिया मॉड्यूल’ २० नोव्हेंबर १९९८ रोजी अवकाशात झेपावले होते व त्यानंतर दोन वर्षांनी नोव्हेंबर २००० मध्ये ‘एक्‍स्पिडिशन-१’द्वारे मानवाने या केंद्रावर पाऊल ठेवले.  हे अवकाश केंद्र पांढरा हत्ती ठरले आहे का आणि मानवाने खरेच अवकाशात जाण्याची गरज आहे का, यावर चर्चा रंगली आहे.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘आयएसएस’चा आकार फुटबॉलच्या मैदानाएवढा असून, त्यात राहण्याची जागा ‘ ६बीएचके’ फ्लॅटएवढी आहे. हे केंद्र बनविण्यासाठी आलेला खर्च आहे  दीडशे अब्ज डॉलर असून, तो अमेरिका, रशिया, युरोप, कॅनडा व जपानमधील लोकांच्या करांतून करण्यात आला आहे. या केंद्रावर आजपर्यंत १९ देशांचे २४३ अंतराळवीर पोचले असून, त्यांनी तीन हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. मात्र, पृथ्वीवर कोरोनासारखी संकटे येत असताना व वातावरणातील बदलाचे परिणाम सातत्याने समोर येत असताना मानवाला अवकाशात पाठवण्याचा हा प्रचंड खर्च करावा का, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. ब्रिटनचे अवकाश शास्त्रज्ञ लॉर्ड रिज यांच्या मते, ‘‘या केंद्रावर केलेला  १२ आकडी खर्च मला मान्य नाही. या केंद्राला भेट दिलेल्या शेकडो शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन केंद्रावरील प्रचंड खर्चाच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे. अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यावर खर्च करण्याऐवजी आपण तो खर्च आपला विश्वाबद्दलचे मत बदलून टाकणाऱ्या रोबोटिक स्पेस सायन्स मोहिमांवर करायला हवा. अनेक अंतराळयाने मंगळाची छायाचित्रे आणि महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवत आहेत. ‘व्हायोजर’ने सौर्यमालेच्या बाहेर जात आंतरतारकीय (इंटरस्टेलर) अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू म्हणून बहुमान मिळवला आहे. आपण २०१४मध्ये पृथ्वीपासून ५६अब्ज किलोमीटर अंतरावर ५५ हजार किलोमीटर प्रतितास वेगाने जाणाऱ्या एका धूमकेतूवर बग्गी उतरवली होती. त्यामानाने ‘आयएसएस’कडून कोणतीही ठोस माहिती समोर येत नाही. त्यापेक्षा हबल दुर्बिणीकडून आलेली छायाचित्रे किंवा मंगळ, गुरू व शनीवरील मोहिमांची अधिक चर्चा होते. आयएसएसची चर्चा अंतराळवीर ख्रिस हॅडफिल्डने तेथे गाणे म्हटल्यावर किंवा तेथील स्वच्छतागृह तुंबल्यावरच होते. ‘आयएसएस’ लोकांच्या पैशावर चालते, मात्र मानवी अवकाश मोहिमांचे भवितव्य ‘स्पेसएक्‍स’चे इलॉन मस्क व ‘ॲमेझॉन’च्या जेफ बेझॉस यांच्यावरच अवलंबून आहे.’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लिंडा बिलिंग्ज या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेसमधील संशोधिकाही मानवी अवकाश मोहिमा असाव्यात का, या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही’ असेच देतात. त्या अगदी थेट प्रश्न विचारतात, ‘मानवी अवकाश मोहिमा भारत आणि बांगलादेशातील जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या आणि जोरदार पाऊस झाल्यास त्यातच वाहून जाणाऱ्या लोकांच्या काय कामाच्या? आपण विज्ञान आणि उपग्रह तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी अवकाश मोहिमा नक्की आखू, मात्र मनुष्य पृथ्वीवरच राहणार आहे. ‘नासा’ वातावरणातील बदलांवर खूप चांगले काम करीत आहे, मात्र राजकीय नेत्यांना फक्त अवकाश मोहिमांमध्ये रस दिसतो. या मोहिमांमुळे लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न कसा सुटणार?’ अमेरिकेतील मानवी हक्कांचे पुरस्कर्ते रॉबर्ट पॅटिलो यांच्या मते, ‘आपल्याकडे २०५०पर्यंत खासगी अवकाश केंद्रे असतील व लोक तेथे सहलीसाठी जातील, मात्र ज्यांच्या कराच्या रकमेतून हे साध्य होईल त्यांना आरोग्य, स्वच्छ पाणी व शिक्षणासारख्या सुविधा कोण देणार? विरोधाभास म्हणजे, कोणताही अंतराळातून काय सर्वांत छान दिसते याचे उत्तर ‘पृथ्वी‘ असेच देतो...’ एकंदरीतच, आयएसएससारख्या प्रकल्पांवर खर्च करण्याऐवजी रोबोटिक तंत्राचा वापर करून अवकाश मोहिमा राबवाव्यात व मानवी मोहिमांसाठी केला जाणारा खर्च पृथ्वीवरील मानव जातीच्या विकासासाठी करावा, असा सूर संशोधकांकडून लावला जातो आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article Human space mission