सर्च रिसर्च  - गटाने प्रश्न सोडवण्याचा सुवर्णमध्य ! 

महेश बर्दापूरकर 
Wednesday, 3 June 2020

 काही संशोधनांद्वारे आता हे सिद्ध झाले आहे, की एखाद्या प्रश्नावर गटामध्ये चर्चा करणे उत्तमच, मात्र प्रत्येकाला वेगळा विचार करून तो मांडू दिल्यास प्रश्नाची उत्तरे अधिक परिणामकारपणे मिळतात.

"एक रुका हुआ फैसला' हा हिंदी चित्रपट तुम्हापैकी अनेकांनी पाहिला असेल. एखादा निर्णय घेताना गटामधील सर्वांच्या विचारांपेक्षा एकेकट्याची हुशारी किती महत्त्वाची असते, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट. काही संशोधनांद्वारे आता हे सिद्ध झाले आहे, की एखाद्या प्रश्नावर गटामध्ये चर्चा करणे उत्तमच, मात्र प्रत्येकाला वेगळा विचार करून तो मांडू दिल्यास प्रश्नाची उत्तरे अधिक परिणामकारपणे मिळतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनमुळे तुम्ही सध्या तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी एखाद्या कॉन्फरन्स कॉलपुरते एकत्र येत असाल. मात्र, सतत संपर्कात राहण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने प्रश्नांवर विचार केल्यास व दिवसातून एकदाच मर्यादित आदानप्रदान केल्यास गटाचा प्रश्न सोडवण्याचा वेग व सर्जनशीलताही वाढते. गटात होणाऱ्या संज्ञापनाबद्दल (कम्युनिकेशन) 2015मध्ये बोस्टन विद्यापीठातील जेसी शोअर यांनी संशोधन केले होते. त्यांनी 16 सदस्य असलेले 51 गट तयार केले व त्यांना दहशतवादी हल्ला शोधण्याचा ऑनलाइन गेम खेळण्यास दिला. निम्म्या गटांतील सदस्यांना त्यांच्याकडील माहिती सहकाऱ्यांबरोबर शेअर करण्याची परवानगी होती, तर बाकीच्यांना काही सदस्यांनाच व ठराविक माहिती देण्यास सांगितले गेले. सर्वांकडून माहिती मिळत असलेल्या गटाला दहशतवादी हल्ल्याबाबतचा सुगावा लवकर लागू शकला. मात्र ही माहिती एकत्र करून हल्ला कोठे होणार या निष्कर्षावर पोचताना गोंधळ उडाला. दुसऱ्या गटांना सुगावा लावणे कठीण गेले, मात्र प्रत्येकाने हल्ल्याच्या योजनेवर उत्तर शोधले असल्याने त्यातील सर्वोत्कृष्ट उत्तरावर एकमत घडवून आणणे त्यांना सोपे गेले. त्यावरून "टीमच्या सदस्यांत थोडा विचारविनिमय योग्य आहे, मात्र प्रत्येक सदस्य काय करत आहे याची माहिती सतत तुमच्यापर्यंत येणे गरजेचे नसते,' असा निष्कर्ष शोअर यांनी काढला. 
या निष्कर्षांपासून प्रेरणा घेऊन शोअर यांनी आणखी एक प्रयोग केला. सहभागींना 25 विविध शहरांचे नकाशे देऊन त्या सर्वांतून जाणारा सर्वांत जवळचा रस्ता शोधण्याचा "ट्रॅव्हलिंग सेल्समन' हा गेम खेळण्यास दिला. सहभागींना तीन गटांत विभागले गेले. पहिल्याला सतत संपर्काची, दुसऱ्याला मर्यादित संपर्काची, तर तिसऱ्या गटाला संपर्काची कोणतीही परवानगी नव्हती. प्रत्येक गटाची सरासरी कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या सदस्यांची कामगिरी मोजली गेली. सतत संपर्कात असलेल्या गटांची सरासरी कामगिरी चांगली होती, तर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या सदस्यांची कामगिरी खराब होती. कोणताही संपर्क नसणाऱ्या गटांत अनेकांची वैयक्तिक कामगिरी चांगली होती, मात्र संपर्काअभावी वाईट कामगिरी करणाऱ्यांमध्ये सुधारणा झाली नाही व त्यामुळे गटाची सरासरी खालावली. मर्यादित संपर्क असणाऱ्या गटात मात्र सुवर्णमध्य साधला गेला. गटाची सरासरी कामगिरी उत्कृष्ट होती व त्याचवेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांवर दुष्परिणाम झाला नाही. "तिसऱ्या गटातील प्रत्येकाने उत्कृष्ट कल्पना सुचवल्या व त्या व्यवस्थित एकत्र करून "जवळचा मार्ग' शोधला,' असे शोअर नमूद करतात. कार्निज मिलॉन विद्यापीठातील अनिता विल्यम्स वुल्ये यांनीही 260 सॉफ्टवेअर इंजिनिअरवर दहा दिवसांच्या एका स्पर्धेच्या माध्यमातून असाच प्रयोग केला, तेव्हाही मर्यादित स्वरूपात संपर्कात असणाऱ्यांनी स्पर्धेत यश मिळवल्याचे दिसून आहे. वुल्ये यांच्याही मते, "मर्यादित संपर्कामुळे प्रश्न सोडवण्याचा वेग व प्रेरणा वाढते. प्रत्येक जण स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतो व त्याला आवश्‍यक सूचनाही मिळत राहतात. अर्थात, यात तुम्हाला कोणता प्रश्न सोडवायचा आहे त्यानुसार थोडा बदल संभवतो. या माहितीचा उपयोग तुम्हाला लॉकडाउनच्या काळात होईलच, त्याचबरोबर भविष्यात काम करताना "टीम टाइम'पेक्षा "टाइम'ला अधिक वेळ देता येईल.' एकंदरीतच, तुम्ही टीमच्या सतत संपर्कात राहण्याची गरज नाही, संपर्काचे छोटे डोसही पुरेसे ठरतात आणि कोणताही फैसला "रुका हुआ' राहत नाही! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research mahesh bardapurkar article about group discussion