सर्च रिसर्च :  त्रिमितीय कृत्रिम डोळ्याची `दृष्टी` 

सर्च रिसर्च :  त्रिमितीय कृत्रिम डोळ्याची `दृष्टी` 

मानवी डोळ्या सारखेच काम करणारा जगातील पहिला त्रिमितीय डोळा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. पूर्ण अंध किंवा अंशतः अंध असलेल्या व्यक्तींना याचा फायदा होऊ शकणार आहे. येत्या पाच वर्षांत हा डोळा प्रत्यक्ष वापरता येऊ शकेल, असा संशोधकांचा अंदाज आहे. 

हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील संशोधकांनी अमेरिकेतील संशोधकांच्या मदतीने हा कृत्रिम (इलेक्ट्रोकेमिकल) डोळा तयार केला आहे. याबाबतचे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

प्रकाशाचे ग्रहण करून त्याद्वारे माहिती मिळविणे हे डोळ्यांचे मुख्य कार्य आहे. ही माहिती मेंदूपर्यंत पोचविली जाते. डोक्याच्या कवटीतील खाचेत डोळा सात अस्थींनी वेढलेला असतो. डोळ्यांच्या खाचेमध्ये नेत्रगोलक, डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, दृष्टिचेता, डोळ्यांची हालचाल करणारे स्नायू, त्यांच्या चेता आणि संयोजी ऊती असतात. संयोजी ऊतींमधील मेदामुळे डोळा स्थिर राहतो. डोळ्यांच्या पुढील भागात अश्रुपिंड, नासाश्रुवाहिनी आणि पापण्या असतात. अश्रुग्रंथींनी स्रवलेल्या अश्रूंमुळे डोळे सतत ओले राहतात. पापण्यांची उघडझाप कमी झाल्यास डोळे कोरडे पडू शकतात. डोळा तीन थरांनी बनलेला असतो. या थरांना श्वेतपटल, रंजितपटल आणि दृष्टिपटल म्हटले जाते. 

मानवी डोळ्याप्रमाणेच काम करणारा डोळा आता संसोधकांनी तयार केला आहे. यात प्रकाश ग्रहण करण्याचे काम इलेक्ट्रॉनिक सेन्सर करतात. हे सेन्सर टंगस्टन आणि अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आले आहे. दृष्टीपटलाचेच काम हे सेन्सर करतात. 

हाँगकाँग विद्यापीठातील प्राध्यापक झियोंग फान म्हणाले, अंशतः किंवा पूर्ण अंध असलेल्या व्यक्तिंना याचा उपयोग होऊ शकेल. कृत्रिम सेन्सरने ग्रहण केलेला प्रकाश मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम शरीरातील पेशींद्वारेच केले जाणार आहे. सर्व काही सुरळीत चालू राहिले तर येत्या पाच वर्षांत या कृत्रिम डोळ्याचे प्रत्यारोपण शक्य होऊ शकेल. पहिल्यांदा प्राण्यांवर आणि नंतर माणसांवरही याच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या कृत्रिम डोळ्याचा वापर यंत्रमानवांमध्ये ही करता येणार आहे. त्यामुळे यंत्रमानवांची क्षमता वाढण्यास मदत होईल. मानवी डोळ्यांप्रमाणेच हा डोळा काम करणार असल्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे. डोळ्यातील पडद्यावर फोटोसेन्सर लावणे ही या प्रक्रियेतील सर्वांत अवघड गोष्ट होती. यासाठी संशोधकांनी अॅल्युमिनियम ऑक्साईडच्या साह्याने अर्धगोलाकार डोळ्याचा आकार तयार करण्यात आला. त्यावर अत्यंत छोट्या आकाराची (नॅनो) छिद्रे तयार करण्यात आली. त्यात पेरोव्हस्काईटच्या नॅनोवायर बसविण्यात आल्या. सौरघटांमध्ये (सोलरसेल) पेरोव्हस्काईटचा वापर प्रकाश गोळा करण्यासाठी फोटोरिसेप्टर म्हणून केला जातो. पेरोव्हस्काईटच्या नॅनोवायरवर जेव्हा प्रकाश पडतो, तेव्हा त्याचा इलेक्ट्रिक संदेश कृत्रिम डोळ्यातील पडद्यामागच्या वायरपर्यंत पोहोचवला जातो. आणखी एक अर्धगोल भिंगासह अॅल्युमिनियमच्या साह्याने संशोधकांनी तयार केला आहे. तो डोळ्याच्या पुढच्या भागाचे काम करतो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संशोधकांनी हा कृत्रिम डोळा संगणकाला जोडून त्याच्या चाचण्या घेतल्या आहेत. हा डोळा १०० अंशांपर्यंतच्या कोनातील दृश्य पाहू शकत असल्याचे दिसून आले. सध्या कृत्रिम दृश्य पटलाला जोडलेल्या वायरची संख्या १०० आहे. त्यापेक्षा जास्त वायर जोडता येत नाहीत. म्हणजे या डोळ्याची क्षमता १०० पिक्सल एवढी आहे. आता यात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com