esakal | सर्च-रिसर्च - शोध ‘मिडास टच’चा

बोलून बातमी शोधा

Luvian hieroglyphics

तुर्कस्तानातील कॅथलहोयूक येथील निओलिथिक काळातील अवशेष जगप्रसिद्ध आहेत. त्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये केला आहे. ब्राँझ आणि लोह युगातील अवशेषही येथे आढळले आहेत.  

सर्च-रिसर्च - शोध ‘मिडास टच’चा
sakal_logo
By
सुरेंद्र पाटसकर

मिडास राजाची गोष्ट लहानपणी आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकली असेल. सोन्याची एवढी हाव त्या राजाला होती, की कोणत्याही गोष्टीला हात लावला की ती सोन्याची होईल, असा वर तो मागून घेतो. शेवटी स्वतःच्या लाडक्या मुलीलाही तो स्पर्श करतो व ती सोन्याची होते. मग त्याला आपल्या कृतीचा पश्चात्ताप होतो... असा या गोष्टीचा आशय आहे. ग्रीक कथांमधील या मिडास राजाचे राज्य कधीकाळी खरोखरीच अस्तित्वात होते व त्याचे अवशेष शोधून काढण्यात संशोधकांना यश आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ओहिओ व शिकागो विद्यापीठातील पुरातत्व शास्त्रज्ञांचा एक गट गेल्या वर्षी तुर्कस्तानातील तुर्कमेन-कारोहोयूक भागात संशोधन करीत होता. कोनया या विस्तृत पठाराचा हा एक भाग आहे. तेव्हा त्यांना साधारणतः ७१०० वर्षांपूर्वीच्या कॅटलहोयूक (आत्ताचे तुर्कस्तान) या शहराचा शोध लागला. जुन्या वस्तीचे अनेक अवशेष त्यांना तेथे मिळाले. त्याचवेळी तेथून जवळच असलेल्या नदीच्या एका कालव्याच्या पाण्यातील चिखलातील एका दगडावर विविध आकृत्या कोरलेल्या दिसत आहेत, अशी माहिती काही स्थानिक नागरिकांनी संशोधकांना दिली. त्या वेळी आपल्या समोर काय येणार आहे, याची पुसटशी कल्पनाही त्या संशोधकांना नव्हती.

जेव्हा संशोधक त्या ठिकाणी गेले तेव्हा एक मोठा दगड चिखलात माखलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. त्यावर काहीतरी कोरलेले होते. अभ्यासाअंती ती लुविअन भाषेतील अक्षरे असल्याचे स्पष्ट झाले. ब्राँझ आणि लोह युगात ही भाषा वापरात होती. त्या चित्रलिपीचा इतर संशोधकांच्या साह्याने अर्थ लावण्यात आला तेव्हा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या फ्रिजिआचा म्हणजे ॲनातोलिया साम्राज्याचा पाडाव झाल्याचे त्यावर कोरण्यात आले होते.

फ्रिजिआवर विविध राजांचे राज्य होते. मिडास घराण्यानेही येथे राज्य केले होते. ज्या मिडास राजाची ‘गोल्डन टच’ची गोष्ट प्रसिद्ध आहे, त्याच मिडास राजाच्या काळातील ही घटना असल्याचा अंदाज संशोधकांनी दगडावरील चित्रलिपीवरून बांधला आहे. हारतापू राजाने मिडास राजाचा पराभव केला. मिडास राजाला त्याने बंदी केले होते, अशी माहितीही त्या चित्रलिपीतून पुढे आली. यातील आणखी महत्त्वाचा भाग असा, की या हारतापू राजाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल काहीही माहिती इतिहासात नोंदविली गेल्याचे संशोधकांना आढळले नाही. तुर्कमेन-कारोहोयूक ही हारतापू राजाची राजधानी असावी, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. पश्चिम आशियातील लोह युगातील एक महत्त्वाचा धागा अचानकपणे हाती लागला आहे, अशी प्रतिक्रिया शिकागो विद्यापीठातील पुरातत्व संशोधक जेम्स ऑनसबोर्न यांनी व्यक्त केली आहे. ज्या मिडास राजाची गोष्ट वर्षानुवर्षे ऐकली, त्या मिडास राजघराण्याची ऐतिहासिक माहिती यानिमित्ताने प्रथमच पुढे आली आहे. या भागात आता नव्याने संशोधन आणि उत्खनन हाती घेण्यात आले आहे. आता मिळालेली माहिती प्राथमिक आहे, असे गृहीत धरून पुढील उत्खनन सुरू करण्यात आले आहे. द तुर्कमेन-कारोहोयूक इंटेन्सिव्ह सर्व्हे प्रोजेक्टचा हा एक भाग आहे. याचे नेतृत्व जेम्स ओसबोर्न यांच्याकडे आहे. याव्यतिरिक्त अंकारातील ब्रिटिश इन्स्टिट्यूटमधील मायकेल मास्सा व ऑक्सफोर्ड विद्यापीठातील ख्रिस्तोफ बच्चूबेर यांच्या नेतृत्वाखाली कोनया रिजिनल अर्किऑलॉजिकल सर्व्हे प्रोजेक्ट सुरू आहे. पश्चिम आशियातील नागरीकरण, राज्यांची निर्मिती व विकास, याबाबतचा अभ्यास या दोन्ही प्रकल्पांतून करण्यात येणार आहे.

तुर्कस्तानातील कॅथलहोयूक येथील निओलिथिक काळातील अवशेष जगप्रसिद्ध आहेत. त्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये केला आहे. ब्राँझ आणि लोह युगातील अवशेषही येथे आढळले आहेत. त्यांचा एकत्रित अभ्यास आता सुरू करण्यात आला आहे.