esakal | सर्च रिसर्च  : मायक्रोप्लॅस्टिक पोहोचले पेशींपर्यंत! 
sakal

बोलून बातमी शोधा

सर्च रिसर्च  : मायक्रोप्लॅस्टिक पोहोचले पेशींपर्यंत! 

प्लॅस्टिक ओशन या वेबसाइटवरील माहितीनुसार दरवर्षी प्लॅस्टिकचा ३० कोटी टन कचरा तयार होतो. प्लॅस्टिकच्या कणांचा आकार ०.२ इंचांहून छोटा असतो, तेव्हा त्यांना मायक्रोप्लॅस्टिक असे म्हटले जाते.

सर्च रिसर्च  : मायक्रोप्लॅस्टिक पोहोचले पेशींपर्यंत! 

sakal_logo
By
सुरेद्र पाटसकर

पृथ्वीवर वाढत चाललेले प्लॅस्टिक कचऱ्याचे ओझे आणि त्याच्या छोट्या थोट्या कणांमुळे होणारे नुकसान हा चिंतेचा विषय आहे. प्लॅस्टिकचा माणसाला असलेला धोका आता कित्येक पटींनी वाढला आहे. प्लॅस्टिकचे अत्यंत सूक्ष्म कण (ज्यांना मायक्रोप्लॅस्टिक असे म्हटले जाते) मानवाच्या पेशींपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. 

अन्नपदार्थांचे सेवन, पाणी आणि श्वासोच्छावासातून आपल्या शरीरात प्लॅस्टिकच्या अत्यंत बारीक कणांचा शिरकाव होतो ही गोष्ट आपल्याला अनेक वर्षांपासून माहिती आहे. तरीही याकडे आपण फारसे गांभीर्याने पाहिलेले नव्हते. आता मात्र मायक्रोप्लॅस्टिकचे कण मानवी पेशींपर्यंत पोहोचल्याचे अॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून उघडकीस आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्लॅस्टिक ओशन या वेबसाइटवरील माहितीनुसार दरवर्षी प्लॅस्टिकचा ३० कोटी टन कचरा तयार होतो. प्लॅस्टिकच्या कणांचा आकार ०.२ इंचांहून छोटा असतो, तेव्हा त्यांना मायक्रोप्लॅस्टिक असे म्हटले जाते. तर कणांचा आकार ०.००१ मिलिमीटरपेक्षा लहान होतो, तेव्हा त्यांना नॅनोप्लॅस्टक कण म्हटले जातात. मानवाच्या पेशींमध्ये प्लॅस्टिकच्या अतिसूक्ष्म कणांचे अस्तित्व असल्याचे नव्या अभ्यासातून दिसून आले आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी माणसाचे फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड आदी अवयवांमधून पेशींचे नमुने गोळा केले. या सर्व नमुन्यांमध्ये पॉलिकार्बोनेट, पॉलिइथिलिन टेरासल्फेट, पॉलिइथिलीन आणि बिस्फेनॉल ए यांचे कण आढळून आले. बिस्फेनॉल ए हे अजूनही अन्नप्रक्रिया उद्योगात हे संयुग वापरले जाते. हृदयाशी संबंधित काही समस्यांचे मूळ हे बिस्फेनॉलमध्ये असल्याचे मानले जाते. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेने (एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी) बिस्फेनॉल ए हे प्राण्यांसाठी घातक असल्याचे जाहीर केले आहे. 

अॅरिझोना विद्यापीठातील या प्रकल्पावर काम करणारे संशोधक रॉल्फ हाल्डेन यांनी प्लॅस्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामांची माहिती दिली. ते म्हणाले, ``आपल्या शरीराव्यतरिक्त इतर सगळ्या ठिकाणी प्लॅस्टिक आहे, असे जर आपल्याला वाटत असेल तर हा आपल्या मूर्खपणा ठरेल. कारण आपल्या शरीरातही प्लॅस्टिक गेले आहे. प्लॅस्टिकच्या या कणांमुळे वंध्यत्व, शरीरावर सूज आणि प्राण्यांमध्ये कर्करोगही होऊ शकतो.`` 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मायक्रोप्लॅस्टिक आणि नॅनोप्लॅस्टिकचे कण आतड्यांपर्यंत पोहोचल्याचे शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून आढळून आले. या संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकन केमिकल सोसायटीच्या नियतकालिकात या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या प्लॅस्टिकच्या कणांचा शरीरातील प्रत्येक अवयवावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास आता करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकचे दुष्परिणाम माहिती झाल्यानंतरही प्लॅस्टिकचा जगभरातील कचरा दिवसेंदिवस वाढत आहे. या कचऱ्यापैकी जवळजवळ ८० टक्के प्लॅस्टिक जमिनीत जाते. तर उर्वरित समुद्रात जाते. जगभरातील सुमारे २००हून अधिक सागरी क्षेत्रे डेड झोन म्हणून शास्त्रज्ञांनी घोषित केली आहेत. 

समुद्राच्या खाऱ्या पाण्याची प्लॅस्टिकवर प्रक्रिया होऊन त्याचे तुकडे होतात. या तुकड्यांपासून डाळीच्या आकाराचे किंवा त्यापेक्षा लहान दाणेसदृश गोळे तयार होऊन ते समुद्राच्या तळाशी साचतात. मासे ते अन्न समजून खातात. प्लास्टिकचे हे सूक्ष्म गोळे मासे खातात. माश्यांच्या शरीरात नॅनोगोळ्यांच्या आकारात प्लॅस्टिक साठते. ते अतिसूक्ष्म गोळे माश्याच्या रक्तात शोषले जाऊन त्याच्या स्नायूत गोळा होतात. हे सागरी खाद्य जगभर खाल्ले जात असल्यामुळे अनेक लोकांच्या रक्तात हे प्लास्टिक भिनलेले आहे, अशीही माहिती गेल्या दोन वर्षांतील संशोधनातून पुढे आली आहे.