वणव्यांवर उपग्रहाद्वारे नजर

 योगिराज प्रभुणे
Friday, 20 March 2020

वनसंपदा उद्‌ध्वस्त करणाऱ्या काही प्रमुख कारणांपैकी वणवा एक आहे. यात फक्त जंगलातील वृक्षराजी भस्मसात होत नाही, तर तेथील परिसंस्थाही नष्ट होतात.

वनसंपदा उद्‌ध्वस्त करणाऱ्या काही प्रमुख कारणांपैकी वणवा एक आहे. यात फक्त जंगलातील वृक्षराजी भस्मसात होत नाही, तर तेथील परिसंस्थाही नष्ट होतात. वणवे लागण्यामागे हवामानातील झपाट्याने होणारे बदल असल्याचे काही सिद्धांतांमध्ये म्हटले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता लागणाऱ्या वणव्यांच्या वारंवारतेबरोबरच त्यांची तीव्रताही वाढली असल्याचे देशात लागलेल्या वेगवेगळ्या वणव्यांच्या अभ्यासातून दिसते. ही या सिद्धांताला मिळालेली पुष्टी आहे. वणव्यांची व्याप्ती, त्यांचा कालावधी वाढलेला यांचाही हवामानबदलाशी जवळचा संबंध असल्याचेही संशोधनातून पुढे येत आहे. आगीवर नियंत्रण हे पारंपरिक दृष्टिकोनातून जंगल व्यवस्थापनाचा एक भाग मानले जाते. पण आधुनिक काळात वारंवार लागणाऱ्या मोठ्या वणव्यांना नियंत्रित करण्यासाठी हा दृष्टिकोन पुरेसा पडत नाही. किंबहुना, यापुढे जाऊन पारंपरिक उपकरणे आणि वणवा नियंत्रणाची पद्धतीही निष्प्रभ ठरत आहे. त्यामुळे वारंवार लागणारे मोठे वणवे प्रभावीपणे शमविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापराची गरज आहे. खरेतर वणवा नियंत्रित करणे, हा पुढचा टप्पा झाला. त्यापूर्वी वणवा वाढतो आहे याची अचूक माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वणव्यांची सूचना उपग्रहाच्या माध्यमातून मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वणवा नियंत्रणाचा टप्पा प्रभावीपणे राबविता येतो. त्यात स्थानिकांचा सहभाग आणि वणव्यांबाबत जनजागृती महत्त्वाची असते. वणवा कुठे लागलाय आणि त्याची व्याप्ती किती आहे, याची उपग्रहाकडून आलेली माहिती राज्याच्या वनखात्याला देण्याची व्यवस्था उभारण्याचे काम २०१८ पासून सुरू झाले. उपग्रहाकडून माहिती येऊन वणवा विझवता येणार नव्हता. त्याच्या शास्त्रीय व्यवस्थापनासाठी आणि वणवे योग्य प्रकारे नियंत्रित करण्यासाठी देशव्यापी अभ्यास प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यातून धोरणांमधील त्रुटी समोर आल्या, तसेच वणवा नियंत्रणाच्या नव्या उपाययोजनांवरही प्रकाश पडला. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्‍स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ (नासा) आणि ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ (इस्रो) यांच्या मदतीने देशातील वणव्याचा इशारा देण्याची व्यवस्था उभारण्यात आली. त्यातून नेमक्‍या कोणत्या भागात वणवा लागला आहे, याची अचूक माहिती मिळण्याची यंत्रणा विकसित झाली. यातून मिळालेल्या माहितीवर ‘नासा’च्या अग्लोरिदमच्या मदतीने प्रक्रिया करता येऊ लागली. हा प्रक्रिया केलेला संदेश इलेट्रॉनिकली ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’ला (एफएसाय) पाठविण्यास सुरुवात झाली. तसेच हाच संदेश वन खात्यातील अधिकारी, कर्मचारी आणि नोंदणी केलेल्या प्रत्येकापर्यंत पोचण्याची व्यवस्था कार्यान्वित झाली. त्यातून वन खात्याच्या यंत्रणेतील शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत वणव्याचा संदेश वेगाने पोचू लागला. आता ‘एफएसआय फॉरेस्ट फायर अलार्म सिस्टिम’ विकसित झाली आहे. त्यामुळे वणव्याच्या माहितीसाठी केवळ स्थानिक नागरिकांवरचे वन खात्याचे अवलंबित्व कमी झाले. देशात २००४ ते २०१६ हे एक तप ‘एफएसआय फॉरेस्ट फायर अलार्म सिस्टिम’ फक्त ‘व्हर्शन १’ वापरत होते. त्यात माहितीवर वनअधिकाऱ्यांमार्फत प्रक्रिया होत असे. दिवसातून एखादा संदेश पाठवला जाई. पण २०१७ मध्ये माहितीवर आपोआप प्रक्रिया होईल, असे ‘व्हर्शन २’ विकसित करण्यात आले. त्यामुळे वणवा लागल्याचे दिवसातून सहा संदेश ‘एसएमएस’ आणि ई-मेलद्वारे थेट बीट पातळीवर पोचविता येऊ लागले. हे व्हर्शनही गेल्या वर्षी अपडेट करून आता तिसऱ्या आवृत्तीचे करण्यात आले आहे. यात मोठ्या वणव्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे वणवा नेमका कुठे पसरतो आहे याची अचूक माहिती वनखात्याला मिळू लागली. या नव्या तंत्रामुळे वनसंपदेचे संरक्षण करणारी नवी शक्ती मानवाला मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: View satellite imagery by satellite