सर्च-रिसर्च : मंगळावर कवकांच्या भिंती आणि छत!

सुरेंद्र पाटसकर
Tuesday, 21 January 2020

अवकाशातील इतर ग्रहांवर व उपग्रहांवर वस्ती करण्याचे स्वप्न मानव पाहत आहे. चंद्र आणि मंगळावरील प्रयोगांपासून याची सुरुवात होऊ शकते. त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांपासून घरे तयार करता येतील का, याच्या चाचण्या सुरू आहेत....

पृथ्वीसारखी घरे कोणत्याही ग्रहावर उभारणे ही सध्यातरी अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे पर्यायी पदार्थांचा वापर कसा करता येऊ शकेल, यावर संशोधन सुरू आहे. अशा बांधकामासाठी कवक किंवा बुरशीही उपयोगी ठरू शकते. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा यावर प्रयोग करत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कवकांचा वापर करून अवकाशात घरे बांधण्याची कल्पना पहिल्यांदा २०१८मध्ये मांडण्यात आली. आता मात्र मायसेलिया कवक मंगळाच्या भूमीवर कसे उगवता येऊ शकेल, याच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. हे प्रयोग जर यशस्वी ठरले, तर भविष्यातील अवकाशवीर कवकांच्या साह्याने चांद्र अथवा मंगळभूमीवर राहण्यायोग्य घरे उभारू शकतील. म्हणजेच त्यांना घरे बांधण्यासाठी पृथ्वीवरून अवजड सामान यानातून घेऊन जाण्याची गरज पडणार नाही, तर अवकाशातच कवके उगवता येऊ शकतील. भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी हा क्रांतिकारी बदल ठरू शकेल. अवकाशयानातून कवके चांद्रभूमीवर घेऊन जायची. तेथे गेल्यानंतर त्यांना पाणी आणि वाढीसाठी योग्य वातावरण उपलब्ध करून द्यायचे. यासाठी प्रकाशसंश्लेषण करू शकणाऱ्या जिवाणूंची गरज भासेल. या जिवाणूंच्या मार्फत कवकांना आवश्यक पोषकमूल्येही मिळतील. कवकांची वाढ होऊ लागली, की त्यांना आकार देणे शक्य होईल. म्हणजेच एखाद्या विटेच्या आकारातही त्यांना वाढविता येऊ शकेल. अशा विटा एकत्र करून त्यापासून राहण्यायोग्य संरचना तयार करता येईल, अशी संकल्पना आहे.  या प्रयोगांबाबत बोलताना नासातील संशोधन लीन रॉथशिल्ड म्हणाल्या, ‘‘सध्या मंगळावर वसाहत करण्यासाठी जे संकल्पित घर आहे, त्याचे सर्व सामान विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या न्यायाने अवकाश यानातूनच घेऊन जावे लागणार आहे. सर्व सामान घेऊन जाण्याचा पर्याय खात्रीशीर समजला जातो. पण, त्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागणार आहे. त्याऐवजी मायसेलिया कवके तेथील भूमीवर उगवणे सोपे असू शकेल.’’

रॉथशिल्ड आणि त्यांचे सहकारी इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कन्सेप्ट प्रोग्रॅमवर काम करत आहेत. भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी घरे तयार करण्याचे काम त्या करत आहेत. मायसेलिया कवकापासून तयार करण्यात येणारे फर्निचर आणि घरे ही अवकाश मोहिमांसाठी क्रांतिकारी ठरू शकतील. अर्थात हा प्रकल्प अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. चांद्र अथवा मंगळभूमीवर कवकांची वाढ होईलच, याची खात्री देता येणार नाही.  चंद्र आणि मंगळ या दोन्ही ठिकाणी बर्फ असल्याचे सिद्ध झाले आहे. त्या भागात कवकांची वाढ करण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी आवश्यक पाणी त्यांना बर्फातून मिळू शकेल, तसेच जिवाणूही त्यावर वाढू शकतील, असे शास्त्रज्ञांना वाटते. तसेच जिवाणूंची वाढ झाली, की ते प्रकाशसंश्लेषणाच्या मार्फत माणसासाठी आवश्यक प्राणवायूही तयार करतील, असा विश्वास त्यांना आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर कवकाच्या भिंती आणि कवकाचेच छत तयार होईल. तसेच याचे प्रारूप तयार झाले की पृथ्वीवरही त्याचा वापर करून प्रयोग केले जातील.  चंद्रावरील घरांसाठी नासाने थ्रीडी प्रिंटेड हॅबिटेट चॅलेंज जाहीर केले आहे. त्या प्रकल्पांतर्गतही काही शास्त्रज्ञांचे संघ काम करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The walls and ceilings of the fungi on Mars