
सूक्ष्म धुलिकण पसरवून हवा प्रदूषणात हातभार लावणाऱ्या बांधकाम व अन्य उद्योगांतील हालचाली थंडावल्या. हवा प्रदूषित करणारे हे सर्व स्त्रोत लॉकडाउनमध्ये टप्प्याटप्प्याने थांबत गेले
जगभरात गेल्या तीस वर्षांत सुमारे 45 प्रकारचे विषाणू पक्षी-प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित झाले आहेत. त्यांचा संसर्ग कधी थेट माणसाला झाला, तर काही विषाणूंनी डासांच्या, किटकांच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात प्रवेश केला. कोरोना विषाणूंच्या कुटुंबातील नवीन "कोविड- 19' हा असाच प्राण्यांमधून माणसांत संक्रमित झालेला एक विषाणू. चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत 215 देशांमधील 41 लाखांहून अधिक जणांना झाला आहे. जगभरातील दोन लाख 83 हजारांवर रुग्णांच्या मृत्यूचे कारण ते ठरले. कोरोनाच्या विषाणूंच्या संसर्गाची साळखी तोडण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय शास्त्रीय आधारावर पुढे आला. जगातील विकसित देशांसह भारतासारख्या विकसनशील देशांनाही लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला. आता भारत चौथ्या लॉकडाउनच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकवीस दिवसांचे पहिले दोन आणि चौदा दिवसांचा एक अशा तीन लॉकडाउनचे 56 दिवस संपूर्ण देशात सक्तीच्या बंदचा अनुभव सर्वांनी घेतला. चालत्या गाडीचा ब्रेक करकचून दाबावा आणि ती क्षणार्धात जागेवर उभी राहावी, त्याप्रमाणे संपूर्ण देश जागच्या जागी उभा राहिला. सर्व व्यवहार थांबले. अभूतपूर्व अशी ही घटना आहे. याचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होताना दिसतो. याचा पर्यावरणावर नेमका कोणता आणि कसा परिणाम झाला, याचे काही निष्कर्ष आता पुढे येऊ लागले आहेत. प्रदूषणाची कमी झालेली पातळी हा त्यातील एक भाग आहे.
प्रदूषक घटकांच्या प्रमाणात घट
लॉकडाउनमुळे देशात कोट्यवधी वाहने जागेवर उभी आहेत. महामार्गांवरील माल, प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक वाहनांच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. रेल्वेगाड्या यार्डातच थांबल्या, तर विमानांची उड्डाणे थांबली. कारखान्यांची धुराडी बंद झाली. सूक्ष्म धुलिकण पसरवून हवा प्रदूषणात हातभार लावणाऱ्या बांधकाम व अन्य उद्योगांतील हालचाली थंडावल्या. हवा प्रदूषित करणारे हे सर्व स्त्रोत लॉकडाउनमध्ये टप्प्याटप्प्याने थांबत गेले. यात हवेत तरंगणारे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धुलिकण, नायट्रोजन ऑक्साइड या प्रदूषणाच्या महत्त्वाच्या निकषांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा निष्कर्ष "सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरन्मेंट' (सीएसई) ने केलेल्या अभ्यासातून निघाला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, बंगळूर, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांमध्ये 26 ते 60 टक्के या दररम्यान या प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी झाल्याचे विश्लेषणातून दिसते. सकाळ आणि संध्याकाळ वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या या शहरांमधील रस्त्यांवर आता शुकशुकाट दिसतो. इतर वेळी या शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण प्रत्येक तासाला बदलत असते. मात्र, लॉकडाउनमध्ये प्रदूषणाच्या पातळीत कोणताही चढ-उतार होत नव्हता. आपल्या शहरांमधील प्रदूषणाची पातळी आपण इतकी खाली आणू शकतो, हा संदेश या लॉकडाउनने दिला आहे. प्रदूषक घटक हवेत गेल्यानंतर ते परत हवेतून कमी होण्यासाठी नेमका किती वेळ लागतो, याच्या अभ्यासाचा वेळ शास्त्रज्ञांना सलग तीन लॉकडाउनमुळे मिळाला. त्यातून लॉकडाउनमुळे भविष्यात प्रदूषण कमी करण्याचे पर्याय नव्याने पुढे आले आहेत. त्या दृष्टीने आपण यापूर्वी गांभीर्याने विचार केला नव्हता. या पर्यायांचा वापर गेले 56 दिवस आपण करत आहोत. त्यातील पहिला प्रभावी पर्याय म्हणजे डिजिटल कनेक्टेडनेस. त्यातून अनावश्यक प्रवास आपण टाळू शकतो. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करू शकतो. प्रदूषणातील आपला वाटा कमी करता येऊ शकतो, असा एक धडा "कोरोना' उद्रेकातून आपल्याला मिळाला आहे. या काळात खऱ्या अर्थाने शुद्ध हवेची झुळूक अनुभवता आली. तेव्हा प्रदूषणरहित व्यवस्थेची ही नांदी ठरावी, अशी अपेक्षा आहे.